कृती समितीकडून लवकरच जागृती पत्रकांचे वाटप
पेडणे,दि.३(प्रतिनिधी)
माजी आरोग्य तथा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंजूर घेऊन घेतलेले तसेच निम्मे काम पूर्ण होऊनही पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत असलेल्या तुये जीएमसी संलग्नीत इस्पितळाचा विषय बराच तापणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात इस्पितळाचे उदघाटन करू,असा शब्द सरकारने दिला होता. तो शब्द खरा ठरण्याची परिस्थिती नसल्यामुळे आता कृती समिती आक्रमक बनली आहे.
स्थलांतर नको जीएमसी संलग्नीत सेवा हवी
तुये इस्पितळाच्या विषयावरून स्थानिक जनता आक्रमक झाली आहे. यासंबंधी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्यासोबत कृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनाही या विषय माहित आहे. तुयेचे सामाजिक इस्पितळ नव्या इमारतीत स्थलांतर करून लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा डाव सरकार आखत असल्याची माहिती मिळाली आहे. कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेल्या नव्या इमारतीत जीएमसी संलग्नीत इस्पितळच सुरू व्हायला हवे,असा निर्धार समितीने केला आहे.
भाजप सरकारकडूनच पार्सेकरांची अप्रतिष्ठा
राज्यात भाजपची संघटना वाढावी तसेच पक्षाचे सरकार सत्तेवर येण्यासाठी ज्या काही लोकांनी आपले महत्वाचे योगदान दिले, त्यात लक्ष्मीकांत पार्सेकरांचा समावेश आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि नंतर मुख्यमंत्री असताना त्यांनी जीएमसी संलग्नीत इस्पितळ प्रकल्पाची भेट पेडणे तालुक्याला दिली होती. जीएमसीमध्ये जागा वाढविण्याच्या प्रस्तावाचा एक भाग म्हणून या इस्पितळाची योजना तयार केली होती. पार्सेकरांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्याच भाजप सरकारकडून आता या योजनेला पाने पुसण्याचे काम सुरू आहे. गेली दहा वर्षे हा प्रकल्प रखडत असल्याने भाजपकडूनच पार्सेकरांची या विषयावरून होत असलेली अप्रतिष्ठा अनेक मुळ भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे.
भूरूपांतरात मश्गूल आरोग्यमंत्री
राज्याचे नगर नियोजनमंत्री या नात्याने विश्वजीत राणे यांच्याकडून पेडणे तालुक्यात आणि विशेष करून मांद्रे मतदारसंघात भूरूपांतराचा सपाटाच सुरू आहे. नगर नियोजनमंत्री या नात्याने काम करत असताना आरोग्यमंत्री म्हणून त्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याची टीका पेडणेवासीयांनी केली आहे. पेडणे तालुक्यात मोपा विमानतळ तसेच किनारी भागातील पर्यटन उद्योग या अनुषंगाने तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज इस्पितळाची गरज आहे, परंतु सरकार या विषयाबाबत नेमके का मागे कचरते आहे, यावरून अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.