विरोधकांनी भानावर यावे

भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधकांना तडजोड करावी लागेल. आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून एकत्रित विचार करावा लागेल. हा एकत्रित विचार विरोधकांमध्ये यावा यासाठी त्यांना भानावर यावे लागेल, हे महत्त्वाचे आहे.

आत्ता विधानसभा निवडणुकीला केवळ एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. विरोधक ज्या तऱ्हेने वागत आहेत ते पाहता, राजकीय परिवर्तनाची आशा बाळगणाऱ्या जनतेची घोर निराशा होणे स्वाभाविक आहे. कालपरवापर्यंत विधानसभेत सरकारवर तुटून पडणारे विरोधक अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मात्र एकमेकांवरच तुटून पडू लागले. कुणी नरकासूराला एकत्र येऊन हात उंचावून एकजुटीची घोषणा करतात, तर कुणी कार्निव्हलच्या सोहळ्यात हात उंचावून पुढील सरकार आपलेच असेल अशी वल्गना करतात.
या एकजुटीकडे लोक आशेने पाहत असताना लगेचच एकमेकांवर चिखलफेक करणारे विरोधक पोरखेळ करतात असे दुर्दैवाने म्हणावे लागते. राजकारणात कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवून ठेवण्यापर्यंत पोरखेळ चालू शकतो; परंतु राजकीय यश मिळवण्यासाठी वैचारिक प्रगल्भता, संयम आणि व्युहरचना महत्त्वाची असते. केवळ रस्त्यावर उतरून किंवा उपोषण करून विषय सुटतात हा गैरसमज आहे. प्रसंगी हे करावे लागतेच, पण याचा अर्थ रस्त्यावर न उतरणारा किंवा उपोषणाला न बसणारा गोंयकार अप्रामाणिक आहे, हा समज निव्वळ मूर्खपणा आहे.
सोशल मीडियावर आपली वेगळी दहशत निर्माण करून हे लोक राजकीय नेरेटिव्ह तयार करू पाहतात. मात्र सोशल मीडियावरील ही रणनिती राजकारणात उपयोगाची नाही, याचा अनुभव त्यांनी घेतलाच आहे. तरीही पुन्हा तीच चूक करणार असाल तर लोक हे राजकीय पक्ष किंवा त्याच्या नेत्यांना गंभीरपणे कसे घेतील?
आमदार विजय सरदेसाई यांचे खरे तर कुणाकडेच सोपेपणे पटत नाही. काँग्रेस पक्षात त्यांनी अनेक वर्षे काम केले, पण तिथेही त्यांचे कट्टर शत्रू होते. त्यातूनच त्यांनी गोवा फॉरवर्ड पक्षाची स्थापना केली. इतके करूनही काँग्रेसकडून त्यांना सांपत्न वागणूक मिळू लागल्याने त्यांनी रागाने थेट भाजपाशी संधान साधले आणि सरकारात उपमुख्यमंत्रीपदासह नगर नियोजनासारखे वजनदार खाते मिळवले.
मनोहर पर्रीकर यांचे निधन झाल्यानंतर भाजपने पद्धतशीरपणे विजय सरदेसाई, रोहन खंवटे यांना बाजूला सारले. रोहन खंवटे हे धूर्त राजकारणी असल्याने त्यांनी जुळवून घेत थेट भाजपात प्रवेश केला. सुदिन ढवळीकर यांनीही सोयीस्करपणे भाजपची साथ देण्याचा व्यवहारी निर्णय घेतला. विजय सरदेसाई मात्र वैचारिक चक्रव्यूहात अडकले आणि आजतागायत विरोधातच राहिले.
भाजपला कोणत्याही परिस्थितीत राज्यात पुन्हा काँग्रेस डोके वर काढता कामा नये, असे वाटते. ही त्यांची राष्ट्रीय स्तरावरील रणनिती आहे. त्यामुळे इतर विरोधकांना चुचकारणे किंवा प्रसंगी छुपे फंडिंग देणे यात भाजप कमी करत नाही. दिल्लीतील काँग्रेसचा खात्मा आम आदमी पार्टीने ज्या तऱ्हेने केला, तो प्रयोग पाहता भाजपने अप्रत्यक्षपणे आपला प्रोत्साहन दिले असे अनेक राजकीय विश्लेषक मानतात.
गोव्यात आप, आरजीपी, गोवा फॉरवर्ड असे अनेक पर्याय भाजपकडे उपलब्ध आहेत, जे काँग्रेसला हानीकारक ठरू शकतात. काँग्रेसलाही याची जाणीव आहे. आजच्या घडीला कुणीही पक्ष काँग्रेसला आव्हान देतो, ही भाजपच्या छुप्या रणनितीची परिणती आहे. काँग्रेसकडे संघटनात्मक प्रबळ रचना नाही; असंघटीतपणा, विस्कळीतपणा हा काँग्रेसच्या पाचवीलाच पुरला आहे.
तरीही काँग्रेसकडे स्वतःची मतदारसंख्या आहे. दुर्दैवाने ही मतदारसंख्या कमी होत चालली आहे आणि ती सावरण्याचे प्रयत्न पक्षाकडून गंभीरपणे होत नाहीत. ही मतदारसंख्या इतर विरोधकांकडे गेल्यानंतर मतांची विभागणी होईल आणि अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा भाजपलाच होईल, हे गणित सरळ आहे.
साधारण व्यक्तीही हे राजकीय गणित समजू शकते, तर मग विरोधकांना अजूनही शहाणपण का येत नाही? हे शहाणपण येत नाही की हा विकत घेतलेला मूर्खपणा आहे, याचा विचार आता करावा लागेल. विरोधकांची कार्यपद्धती पाहता, भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यापेक्षा ते मर्यादित विचार करू लागले आहेत.
भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विरोधकांना तडजोड करावी लागेल. आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून एकत्रित विचार करावा लागेल. हा एकत्रित विचार विरोधकांमध्ये यावा यासाठी त्यांना भानावर यावे लागेल, हे महत्त्वाचे आहे.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure