काँग्रेसला “आप”शकुन !

निवडणुकांसाठी लागणारे फंडिंग तयार करण्याची कुवत आपमध्ये आहेच आणि त्याच जोरावर काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांना मागे टाकून राज्यात भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनण्याची पक्षाची व्यूहरचना असल्याचे स्पष्ट दिसते.

फोंडा पोटनिवडणूक जाहीर झाली. एरवी उमेदवारी निवडीवरून नेहमीच शेवटच्या क्षणापर्यंत लोकांची उत्कंठा वाढवणाऱ्या काँग्रेसने सर्वांत प्रथम आपला उमेदवार जाहीर केला. मगो पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. केतन भाटीकर यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. फोंड्याचे दावेदार राजेश वेरेकर यांनी स्वतःहून माघार घेत भाटीकरांना पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे काम सोपे झाले. भाजपसमोर उमेदवारीचा पेचप्रसंग निर्माण झाला आहे खरा, परंतु मगो भाजपसोबत असल्यामुळे विजयाबाबत भाजप निसंदिग्ध आहे. आता काँग्रेस पक्ष इतर विरोधकांना आपल्यासोबत कसा आणतो हे पाहणे सर्वांसाठी महत्त्वाचे ठरले आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या सर्व विरोधी पक्षांच्या युतीची नांदी फोंडा पोटनिवडणुकीत घडेल, अशी अनेकांची इच्छा आहे. आता ही खरोखरच नांदी ठरते की युतीच्या शक्यतेची भैरवी, हे देखील स्पष्ट होईल.
काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला खरा, परंतु विरोधकांना विश्वासात घेण्याची गरज पक्षाला भासली नाही. इतका आत्मविश्वास असण्यासारखी परिस्थिती निश्चितच नाही, मग ही चूक का घडावी? पक्षाचे नेते अजूनही मागील चुका किंवा राजकीय अपयशातून काहीच धडा घेत नाहीत, असेच यातून दिसून येते. २०२२ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर होता. चौथ्या स्थानावर आरजीपी आणि पाचव्या स्थानावर आप पक्ष होता. आरजीपीसोबत युतीचे संकेत काँग्रेसने दिले असले तरी ते विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या बाजूने सांगितले जातात. पक्षाध्यक्ष अमित पाटकर हे विजय सरदेसाईसोबत गोवा फॉरवर्डकडे सोयरीक करण्यासाठी इच्छुक आहेत. दिल्लीतील आम आदमी पार्टीने काँग्रेससोबत युती करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी आपचे दोन आमदार वेन्झी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा हे स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि आरजीपीसोबत युतीसाठी अनुकूल आहेत.
फोंड्याची पोटनिवडणूक जाहीर होताच आपचे राष्ट्रीय संयोजक अचानक गोव्यात दाखल होतात. मद्य घोटाळ्यात कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवल्याने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. ते फोंड्यात फिरायला जातात आणि फोंड्यातील एका गटाचा पक्षप्रवेशही करून घेतात. दुर्दैवाने गीतेश नाईक यांना आप पक्षाने प्रवेश दिला, पण गीतेश नाईक यांची पार्श्वभूमी खाण घोटाळ्याशी संबंधित आहे. मात्र जिथे भाजप आणि काँग्रेसमध्ये खाण घोटाळ्याचे प्रमुख सूत्रधारच असताना या बिचाऱ्या बारीक कंत्राटदाराला आप पक्षात प्रवेश देण्यात काय गैर आहे, असा विचार अरविंद केजरीवाल यांनी केला असेलही. आता आपच्या या हालचाली उघडपणे काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणाऱ्या आहेत. अर्थात, आम हा गोव्यात काँग्रेससाठी अपशकुनी ठरण्याचीच अधिक शक्यता या घडामोडीतून दिसून येते.
दिल्लीसारख्या ठिकाणी जिथे विधानसभेत ७० जागा आहेत, तिथे आपण काँग्रेसचा सफाया केला. १९९८ ते २०१३ पर्यंत १५ वर्षे दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. ही सत्ता आपण उलथवून लावली. नुसती उलथवूनच नव्हे तर गेल्या तीन निवडणुकांत काँग्रेसला दिल्लीत एकही जागा जिंकता आलेली नाही आणि सत्ता आपकडून भाजपकडे गेली आहे. गोव्यासारख्या राज्यात चिकटून राहिल्यास काँग्रेसची जागा निश्चितच घेता येईल, असे आपला प्रकर्षाने वाटते. या इराद्यानेच आपण आता आपली सगळी नजर गोव्याकडे वळवली आहे. भाजपला टक्कर देण्याची कुवत फक्त आपमध्ये आहे हे लोकांना पटवून द्यायचे. निवडणुकांसाठी लागणारे फंडिंग तयार करण्याची कुवत आपमध्ये आहेच आणि त्याच जोरावर काँग्रेससह इतर प्रादेशिक पक्षांना मागे टाकून राज्यात भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनण्याची पक्षाची व्यूहरचना असल्याचे स्पष्ट दिसते. या एकूणच व्यूहरचनेत काँग्रेससाठी “आप”शकुनाची ही चाहूलच म्हणावी लागेल.

  • Related Posts

    भविष्यातील संकटाचे सुतोवाच

    स्थानिकांच्या बेकायदा व्यवसायांना राजकीय संरक्षण देणे हा उपाय नाही. त्यांच्या पारंपरिक निवास आणि उदरनिर्वाहाला कायदेशीर चौकट देणे हा खरा उपाय आहे. अन्यथा आज मोरजीत जे घडत आहे, ते उद्या संपूर्ण…

    रस्ते अपघात राज्य आपत्तीच !

    पूर, वादळ किंवा भूकंपाप्रमाणेच रस्ते अपघातही दररोज जीव घेत आहेत. मग या संकटाकडे तातडीच्या आपत्तीप्रमाणे का पाहिले जात नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय मनोहर सप्रे यांनी…

    You Missed

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    वकिलावरील हल्ला म्हणजे न्यायव्यवस्थेलाच आव्हान; ‘ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन कायदा’ लागू करा : काँग्रेस

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    १५२ पेपरफुटींच्या आरोपींसाठी भाजप बनला आश्रयस्थान; २५ विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना केंद्र सरकार जबाबदार : गिरीश चोडणकर

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    डिचोलीत शैक्षणिक क्षेत्रात नवा विश्वविक्रम; आत्माराम गांवकर यांच्या १०३ पुस्तकांचे एकाच दिवशी प्रकाशन

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    CM Must Act Before It’s Too Late Over Karapur-Sarvan Protest: Girish Chodankar

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    Veteran Congress Leader Eduardo Faleiro Backs GPCC’s Fight to Protect Goa

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला

    भाटकार, वकीलावर मोरजीत प्राणघातक हल्ला