विठ्ठला, या देवभूमीला सांभाळ !

अन्याय, पर्यावरणाचा विनाश आणि समाजहिताच्या विरोधात उभ्या राहिलेल्या शक्तींच्या सावलीत उभी राहून केलेली भक्ती ही भक्ती नसून आत्मवंचना ठरते.

गोव्यातील कारापूर येथे उभारल्या जात असलेल्या वादग्रस्त हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाविरोधातील जनआंदोलन शंभर दिवसांच्या उंबरठ्यावर उभे आहे. हा केवळ एका प्रकल्पाविरोधातील संघर्ष नाही; तर आपल्या मातीचे, पर्यावरणाचे, जलस्रोतांचे, गावसंस्कृतीचे आणि पुढील पिढ्यांच्या भविष्याचे रक्षण करण्यासाठी सुरू असलेली लोकचळवळ आहे. अशा वेळी संपूर्ण गोव्याने या लढ्याच्या पाठीशी उभे राहणे अपेक्षित असताना एक छायाचित्र समाजाला अस्वस्थ करून गेले.
कारापूरलगतच्या सर्वण गावातील वारकरी संप्रदायाच्या भाविकांचे पंढरपूर वारीसाठी सज्ज झालेले वाहन दिसले. त्या वाहनावर हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे नाव झळकत होते. हे वाहन कंपनीने पुरस्कृत केले असावे, अशी चर्चा सुरू झाली. सत्य काहीही असो; पण या घटनेने एक गंभीर प्रश्न समाजासमोर उभा केला आहे. ज्या कंपनीविरोधात गावकरी आपल्या भूमीच्या रक्षणासाठी लढत आहेत, त्याच कंपनीची मदत स्वीकारून विठ्ठलाच्या दर्शनाला जाणे, ही भक्ती नेमकी कोणत्या मूल्यांची आहे?
गोव्याचा इतिहास अशा घटनांनी भरलेला आहे. खाण कंपन्या असोत , बेकायदेशीर खडी-चिरे व्यवसाय करणारे असोत किंवा पर्यावरणाचा विध्वंस करून संपत्ती उभारणारे उद्योगपती असोत. गावात प्रवेश करताना प्रथम मंदिरांना देणगी, उत्सवांना मदत आणि धार्मिक कार्यक्रमांना प्रायोजकत्व देण्याची परंपरा त्यांनी जोपासली. त्यानंतर मात्र त्याच गावातील डोंगर उध्वस्त झाले, नद्या गाळाने भरल्या, शेती उद्ध्वस्त झाली आणि गावकऱ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. इतिहासाने वारंवार दिलेला हा धडा आपण अजूनही शिकलेलो नाही, हे अधिक वेदनादायी आहे.
वारकरी संप्रदाय हा केवळ धार्मिक प्रवाह नाही; तो सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांनी अभंगातून समाजाला विवेक, समता, प्रामाणिकपणा आणि अन्यायाविरोधात उभे राहण्याची शिकवण दिली. त्यांनी कधीही पापाच्या पैशावर धर्म उभा करण्याचा उपदेश केला नाही. उलट त्यांनी ढोंग, दांभिकता आणि अन्यायावर कठोर प्रहार केला.
आज आपण त्यांच्या शिकवणीचा खरा अर्थ विसरत चाललो आहोत का? भ्रष्टाचारातून, पर्यावरणाच्या विनाशातून किंवा समाजाच्या हक्कांवर गदा आणून मिळवलेल्या पैशातून मंदिरांना देणग्या दिल्या जातात. त्या देणग्यांमुळे पाप धुतले जाते, असा समज निर्माण केला जातो. समाजही अशा देणग्यांचे स्वागत करतो. पण पापाच्या पैशातून उभारलेली भक्ती विठ्ठलाला मान्य असेल का? हा प्रश्न प्रत्येक श्रद्धाळूने स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे.
विठ्ठल हा राजवाड्यांचा देव नाही. तो शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, वंचितांचा, सामान्य माणसाचा देव आहे. पंढरपूरची वारी ही केवळ चालण्याची परंपरा नाही; ती सत्य, समता, करुणा आणि विवेकाच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा आहे. जर या वारीच्या नावाखाली आपण समाजहिताला तिलांजली देत असू, तर आपल्या पावलांना पंढरीचा मार्ग लाभेल; पण आपल्या विचारांना संतांचा मार्ग लाभेल का?
वारीसाठी मदत घेण्यात कोणालाही आक्षेप असू शकत नाही. पण ती मदत कुणाकडून येते, तिच्यामागे कोणते हितसंबंध आहेत आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो, याचाही विचार होणे तेवढेच आवश्यक आहे. अन्यथा भक्तीचा उत्सव नकळत प्रतिमा व्यवस्थापनाचा आणि पाप धुण्याचा सोहळा बनू शकतो.
कारापूरचे आंदोलन केवळ त्या गावाचे नाही. उद्या अशीच वेळ कोणत्याही गावावर येऊ शकते. म्हणूनच हा संघर्ष प्रत्येक गोमंतकीयाचा आहे. आणि म्हणूनच अशा वेळी सामाजिक व आध्यात्मिक नेतृत्वाने अधिक सजग राहणे आवश्यक आहे.
आज प्रश्न एका वाहनावरील नावाचा नाही. प्रश्न आहे आपल्या संवेदनांचा. प्रश्न आहे आपल्या विवेकाचा. प्रश्न आहे आपण संतांची परंपरा पुढे नेत आहोत की केवळ तिचा देखावा करत आहोत?
विठ्ठलाच्या चरणी पोहोचण्यासाठी पायी चालणे पुरेसे नसते; त्यासाठी अंतःकरणही निर्मळ असावे लागते. अन्याय, पर्यावरणाचा विनाश आणि समाजहिताच्या विरोधात उभ्या राहिलेल्या शक्तींच्या सावलीत उभी राहून केलेली भक्ती ही भक्ती नसून आत्मवंचना ठरते.
आज प्रत्येक गोमंतकीयाने स्वतःला एकच प्रश्न विचारण्याची गरज आहे—आपण विठ्ठलाच्या दिशेने चाललो आहोत, की पापाच्या पैशाने तयार केलेल्या वाटेवरून विनाशाच्या दिशेने? या प्रश्नाचे उत्तरच गोव्याचे भविष्य ठरवणार आहे.

  • Related Posts

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    मात्र खरी कसोटी आता समाजाचीच आहे. राजकीय आरक्षण हे समाजाला सत्तेच्या वाटचालीत सहभागी करून घेणारे वरदान ठरावे की वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा, गटबाजी आणि मतभेदांमुळे शाप ठरावे, हे समाजधुरिणांनी ठरवायचे आहे.…

    रोजगार: आभास आणि वास्तव

    विधानसभेत सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांत मंडळाअंतर्गत प्रत्यक्ष उभारलेल्या उद्योगांमध्ये केवळ १,५११ गोमंतकीयांना रोजगार मिळाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य पर्यावरण परिणाम मूल्यांकन प्राधिकरणाने वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका औषधनिर्मिती…

    You Missed

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    राजकीय आरक्षण : शाप की वरदान ?

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    पर्यावरणस्नेही सर्वसमावेशक विकास साधा

    14/08/2026 e-paper

    14/08/2026 e-paper

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    एसटी आरक्षणासाठी म्हार्दोळात एल्गार; २०२७ मध्ये चार जागा आरक्षित करण्याची ‘उटा’ची मागणी

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Goa Congress Top Brass Meets Venugopal; Kharge Visit Takes Centre Stage Ahead of 2027

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure

    Panchayat Fails to Act in 30 Days; Deputy Director to Take Over Powers Against Verla-Canca Structure