बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण

गांवकारी, दि. २३ (प्रतिनिधी) : गोव्यातील उत्पादन प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या बिसलेरी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या गुणवत्तेबाबत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नोटीस बजावल्याच्या वृत्तानंतर बिसलेरी इंटरनॅशनल कंपनीने स्पष्टीकरण जारी केले आहे. बिसलेरीचे पाणी पिण्यास पूर्णपणे सुरक्षित असून, कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेत कठोर गुणवत्ता नियंत्रण पाळले जात असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

मुंबई येथून सोमवारी, २३ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात कंपनीने म्हटले आहे की, एफएसएसएआयने ३० सप्टेंबर २०२५ रोजी गोव्यातील बिसलेरी उत्पादन प्रकल्पातून पाण्याचे सहा नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी पाच नमुने निर्धारित सर्व निकषांनुसार योग्य आढळले. मात्र, सहाव्या नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण प्रतिलिटर १२ मायक्रोग्रॅम आढळले. निर्धारित मर्यादा प्रतिलिटर १० मायक्रोग्रॅम असल्याने या नमुन्याबाबत प्रश्न उपस्थित झाला.

या चाचणीच्या निष्कर्षाविरोधात कंपनीने अपील केल्यानंतर एफएसएसएआयने २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संबंधित नमुना फेरतपासणीसाठी संदर्भ प्रयोगशाळेकडे पाठविला. या प्रयोगशाळेच्या अहवालात ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे आढळले. मात्र, त्याच नमुन्यात पॉलीन्यूक्लिअर अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएच) या घटकांची उपस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली.

दोन प्रयोगशाळांच्या निष्कर्षांमध्ये तफावत आढळल्याने या प्रकरणात अधिक स्पष्टता आवश्यक असल्याची भूमिका बिसलेरीने घेतली. त्यानंतर कंपनीने एफएसएसएआयने मान्यता दिलेल्या स्वतंत्र प्रयोगशाळेत त्याच नमुन्याची पुन्हा तपासणी करून घेतली. या स्वतंत्र तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचे स्पष्ट झाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

स्वतंत्र प्रयोगशाळेचा अहवाल २ फेब्रुवारी २०२६ रोजी औपचारिक पत्रासह एफएसएसएआयच्या पश्चिम विभागीय कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणात प्राधिकरणाकडून कोणताही पुढील पत्रव्यवहार प्राप्त झाला नसल्याने हे प्रकरण निकाली निघाल्याचे कंपनीने गृहीत धरले होते.

दरम्यान, अलीकडे प्रसिद्ध झालेल्या नोटिशीची प्रत कंपनीला ई-मेलद्वारे किंवा प्रत्यक्ष स्वरूपात प्राप्त झालेली नाही. तसेच एफएसएसएआयच्या संकेतस्थळावरही संबंधित नोटीस शोधून काढता आलेले नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

बिसलेरी कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. उत्पादन प्रक्रियेत दहा टप्प्यांची शुद्धीकरण पद्धत अवलंबली जाते. तसेच पाण्याच्या गुणवत्तेसाठी ९० हून अधिक चाचण्या केल्या जातात. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार पाणी पुरविण्याची बांधिलकी कंपनीने पुन्हा व्यक्त केली आहे.

एफएसएसएआयसोबत नियमानुसार सहकार्य करून या प्रकरणातील सर्व शंकांचे निरसन करण्याची तयारीही कंपनीने दर्शविली आहे.

एफएसएसएआयकडून खटला चालविण्यास मंजुरी

दरम्यान, एफएसएसएआयने संबंधित पाण्याचा नमुना असुरक्षित ठरवून बिसलेरी इंटरनॅशनलविरोधात कायदेशीर कारवाई करण्यास मंजुरी दिली आहे. फेरतपासणीत पीएएच घटक आढळल्याने नमुना असुरक्षित असल्याची प्राधिकरणाची भूमिका आहे. त्यामुळे कंपनीच्या स्वतंत्र चाचणीतील निष्कर्ष आणि नियामक प्राधिकरणाचे निष्कर्ष यांच्यातील मतभेद कायम आहेत.

या प्रकरणात अंतिम निर्णय काय होतो आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेबाबत एफएसएसएआय पुढे कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    Five decades of iron ore mining in Sirigao village of Bicholim taluka have caused extensive environmental destruction, serious health risks, and economic losses estimated at a staggering ₹4,000 crore. An environmental appraisal highlights contaminated water, destroyed livelihoods, and health risks as direct consequences, with total damage and restoration costs amounting to approximately 60% of the revenue generated from mining.

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    ४५ दिवस दिला पोलिसांना गुंगारा ———……………………………………….. गांवकारी,दि.२३(प्रतिनिधी) राज्य अबकारी आयुक्तपदाचे बनावट नियुक्तपत्र तयार करणे तथा नोकरी देण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेला अजित कामत शंखवाळकर हा अखेर ४५…

    You Missed

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    50 Years of Mining Leave Sirigao With ₹4,000 Crore Environmental and Social Debt: Study

    बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण

    बिसलेरीचे पाणी पिण्यास सुरक्षित; एफएसएसएआयच्या नोटिशीवर कंपनीचे स्पष्टीकरण

    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    दिलेश तेली याला ओमानमधून सुरक्षित मायदेशी आणण्याचे प्रयत्न

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    श्री रुद्रेश्वर देवस्थान समितीवर यशवंत माडकर यांच्या पॅनेलचे वर्चस्व

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    अजित कामत शंखवाळकर अखेर शरण

    सरकारी कार्यालये कालबाह्य?

    सरकारी कार्यालये कालबाह्य?