राजकीय दरोडेखोरांचे कारनामे आपल्या गोव्याला संकटांच्या खाईत लोटणार आहेत आणि अशावेळी या दरोडेखोरांचे कारनामे लोकांसमोर आणण्याची जबाबदारी मीडियाला पहारेकरीच्या नात्याने निभवावी लागणार आहे. मीडियावाल्यांनो जागते रहो…
भाजपच्या संघटनात्मक निवडणूकांची प्रक्रिया सुरू आहे. पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहेच परंतु त्याचबरोबर राज्यातील भाजपलाही नवा प्रदेशाध्यक्ष तथा नवी पक्षसंघटना प्राप्त होणार आहे. पक्षसंघटना हीच भाजपची खरी ताकद आहे. या पक्षसंघटनेच्या बळावरच भाजपने आत्तापर्यंत झेप घेतली आहे. देशातला सर्वांत मोठा पक्ष बनण्याचा मान प्राप्त केलेल्या भाजपचे आता डोहातून अथांग सागरात परिवर्तन झाले आहे. सहजिकच या अथांग सागरात मोठ मोठे मासे डेरेदाखल झाल्याने डोहातील बारीक माशांना कुणीच विचारत नाही आणि त्यांना भक्ष करण्याचेही सत्र सुरू आहे. जुने आणि नवे हा वाद सगळ्याच मोठ्या पक्षांना सतावत असतो. भाजपसमोरही ते मोठे आव्हान बनले आहे, परंतु पक्षनेतृत्वाची संघटनेवर पकड घट्ट असल्यामुळे ही सगळी पेल्यातील वादळेच ठरली आहेत.
गोव्यातील भाजपच्या संघटनात्मक निवडणूकांवरून बरीच चर्चा सुरू आहे. ही चर्चा केवळ माध्यमांतच सुरू आहे. उघडपणे पक्षविरोधी किंवा आक्रमक पवित्रा घेऊन पक्षनेतृत्वाला आव्हान देण्याचे धाडस कुणातच नाही. केवळ मीडियाच्या आधारे एकमेकांना चुट्टीचा साप दाखवण्याचा प्रकार सुरू आहे. संघटनात्मक फेररचनेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या या गोष्टींना मीडीयाने किती महत्त्व द्यावे आणि आपल्या पेपरची किती जागा द्यावी याला काहीतरी मर्यादा असण्याची गरज आहे. या बातम्यांत किंवा चर्चेत लोकहीत काहीच नाही. लोकांना अशा या अंतर्गत राजकीय चर्चांत गुंतवून ठेवून छुपी कारस्थाने सुरू आहेत आणि त्याकडे माध्यमांचेही लक्ष जात नसेल तर ते दुर्दैवी म्हणावे लागेल. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. इंग्रजीत त्याला वॉच डॉग असे म्हटले जाते, म्हणजेच सरकारवर पाळत ठेवणारा कुत्रा. हा पाळत ठेवणारा प्राणी कधी पाळीव बनला हेच कळले नाही, असेही अनेकांचे म्हणणे आहे.
राज्याचे पर्यटन नियंत्रणाबाहेर जाऊ लागले आहे. कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. बिल्डर लॉबी आणि भूमाफियांची दादागिरी सुरू आहे. राजकीय चर्चांत किंवा घडामोडीत कुठेच सहभागी नसलेले नगरनियोजक मंत्री विश्वजीत राणे यांचे खाते भूरूपांतराच्या जाहिरातींवर जाहिराती प्रसिद्ध करत आहे. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवण्याचे सोडून भाजपचा मंडळ अध्यक्ष कोण होणार आणि प्रदेशाध्यक्षपदी कुणाची निवड होणार ह्यात मीडिया गुंतून राहत असेल तर ते दुर्भाग्यच म्हणावे लागेल. मीडियाने आपली लोकोपयोगी भूमिका विसरता कामा नये. राजकीय दरोडेखोरांचे कारनामे आपल्या गोव्याला संकटांच्या खाईत लोटत आहेत. अशावेळी या दरोडेखोरांचे कारनामे लोकांसमोर आणण्याची जबाबदारी मीडियाला पहारेकरीच्या नात्याने निभवावी लागणार आहे. मीडियावाल्यांनो जागते रहो…