मी त्यासाठी नरकात जायला तयार आहे !

या देशात कसकशी माणसे होऊन गेली, याचे अनेकदा मला आश्चर्य वाटते. तामिळनाडूचे श्रीरामानुजाचार्य हे असेच एक अफलातून व्यक्तीमत्व. अकराव्या शतकात होऊन गेलेला हा वैष्णव संत. दीर्घायुष्य लाभलेला. एका आख्यायिकेनुसार तब्बल एकशेवीस वर्षांचे आयुष्य लाभलेला. पण दीर्घायुष्य हेच काही त्यांच्या वेगळेपणाचे वैशिष्ट्य नव्हे. त्यांच्या जीवनातील वैष्णव दीक्षा घेण्याचा प्रसंग मला नेहमीच रोमांचित करतो. मंत्रदिक्षा घेण्यात असे काय नाट्यमय घडणार, असे वाटणे साहजिक आहे. पण जे घडले ते चमत्कारिक नसले तरी अलौकिक जरूर होते.
वैष्णव संप्रदायाची मंत्रदिक्षा घेण्यासाठी ते त्याकाळातील प्रसिद्ध वैष्णव अधिकारी पुरूष असलेल्या ‘गोष्टीपूर्ण’ यांच्याकडे गेले. पण गोष्टीपूर्णांनी त्यांना ‘नंतर ये’ म्हणून सांगत परत पाठवले. असे तब्बल अठरावेळा त्यांनी केले. ते रामानुजांच्या सबुरीचीच जणू परीक्षा घेत होते. शेवटी रामानुजांच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन गोष्टीपूर्णांनी त्यांना मंत्र दिला. आणि मंत्राचे महात्म्य राखण्यासाठी कोणालाही तो न सांगण्याची आज्ञा केली. इथपर्यंत सगळे नेहमीसारखेच आहे. पण यानंतर रामानुजांनी जे केले ते मात्र अलौकिक होते. रामानुजाचार्यांनी काय केले? गुरूंच्या आश्रमातून बाहेर पडताच, जवळच्या मंदिराच्या गोपुरावर चढले आणि जवळपासच्या लोकांना त्यांनी हाका मारून गोळा केले. नंतर मोठ्या आवाजात गुरूंनी दिलेल्या वैष्णव मंत्राचा त्यांनी घोष केला. उद्देश हाच की या प्रभावी मंत्राचा सर्वांना लाभ व्हावा. ही गोष्ट आज जितकी सोपी वाटते तितकी ती सोपी नव्हती. ही गोष्ट अशा पार्श्वभूमीवर घडली होती जेव्हा शूद्रांना ज्ञानार्जनाचा हक्क नाकारण्यात येत होता. शूद्रांनी मंत्र ऐकू नयेत अशी आज्ञा प्रचलित होती.
साहजिकच ही गोष्ट जेव्हा त्यांच्या गुरूदेवांना कळली तेव्हा ते संतापले. ते रामानुजांना म्हणाले, “तुझ्या या कृत्याने तू नरकात जाशील!”
संतापलेल्या गुरूंचे पाय धरून अत्यंत विनयाने रामानुज म्हणाले, “या मंत्राच्या श्रवणाने शेकडो लोक जर स्वर्गात जाणार असतील तर मी एकटा नरकात जायला तयार आहे! माझ्यासाठी ही मोठीच कृपा असेल.” ही शब्द उच्चारणाऱ्या रामानुजांचा चेहरा कल्पनेने डोळ्यांसमोर आणून पहा. किती विशाल असेल रामानुजाचार्यांचे हृदय! दुसर्‍यांसाठी करुणेने काठोकाठ भरलेले. अशाच हृदयात भक्ती वास करते. हीच करुणा ‘विष्णुमय जग’ म्हणणाऱ्या आपल्या संत तुकोबारायांच्यात दिसते, हीच करूणा ‘वैष्णव जन तो तेने कहीए जे, जो पिड परायी जाने रे’ म्हणणार्‍या गुजराती संत नरसी मेहतांच्यात दिसते. अशा हृदयाचा परीणाम गोष्टीपूर्णांवरही झाला आणि त्यांनी आपल्या शिष्याला पोटाशी धरले.
ही आजकालची गोष्ट नव्हे. तब्बल हजार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे, जेव्हा वर्णाश्रम पद्धती कट्टरपणे पाळली जात असे, त्या काळातली. त्या काळात हा संत शूद्रांनादेखील मंत्र वाटत फिरत होता.
रामानुजाचार्य बुद्धीने प्रकांड पंडीत होते. रामानुज हे त्यांचे पाळण्यातील नाव पण त्यांच्या नावात जोडलेले आचार्य हे नाव त्यांच्या प्रस्थानत्रयीवरील भाष्यांमुळे प्राप्त झाले. ब्रम्हसूत्रांवर आदिशंकराचार्यांहून भिन्न मत मांडणारे, ‘विशिष्टाद्वैत’ मत प्रतिपादन करणारे ‘श्री’ भाष्य त्यांनी लिहीले.
त्यांच्या मनातील समानता दाखवणारा वर वर्णन केलेला प्रसंग हा काही एकमेव प्रसंग नाही. त्या आधी अगदी तरुण वयात असताना त्यांनी कांचीपूर्ण या शूद्र वर्णाच्या वैष्णव भक्तश्रेष्ठाला घरी बोलावून सेवा केली होती. कांचीपूर्णांचा शिष्य बनण्याची देखील त्यांनी तयारी केली होती.
रामानुजांच्या गृहस्थाश्रम सोडून संन्यास घेण्याला कारण ठरले त्यांच्या पत्नीचे जातीश्रेष्ठत्व प्रतिपादणारे सोवळेओवळे. त्यांच्या पत्नीला त्यांचे सर्व वर्णांच्या वैष्णवात मिसळणे आधीच पसंत नव्हते. त्यात एक प्रसंग घडला. श्रीरंग येथील वैष्णव मठाचे अनुयायी ‘महापूर्ण’ यांच्याकडून अलवार संतांची शिकवण समजून घेण्यासाठी रामानुजांनी त्यांना आपल्या घरी बोलावले. ते आणि त्यांच्या पत्नी रामानुजाचार्यांच्या घरी रहात असताना एक दिवस महापूर्ण यांच्या पत्नीच्या घागरीतील पाण्याचे शिंतोडे रामानुजांच्या पत्नीवर उडाले. त्या शिंतोड्यांमुळे आपले सोवळे बुडाले म्हणून त्या अदवातदवा बोलल्या. त्यामुळे काही न बोलता महापूर्ण आपल्या पत्नीसह श्रीरंगमला निघून गेले.
संन्यास घेतल्यानंतर रामानुजाचार्य श्रीरंगम् येथील मठाचे प्रमुख झाले. पण त्यांचा हा मठाचे प्रमुख असण्याचा काळ नेहमीच शांततेत गेला असे नाही. शैव संप्रदायाच्या कुलोत्तुंग नावाच्या चोल राजाच्या रोषाला निमित्त ठरल्यामुळे त्या राजाच्या कारकीर्दीत त्यांना मठ सोडून दूर जाऊन रहावे लागले. हा काळ त्यांनी मेळकोट येथे घालवला. याच काळात त्यांना दिल्लीच्या मुस्लिम राजाची एक कन्या शिष्या म्हणून लाभली.
त्यांची ज्ञानलालसा देखील जबरदस्त होती. त्यांना ब्रम्हसूत्रावरील भाष्यासाठी बोधायनाचे हस्तलिखित हवे होते. या हस्तलिखिताची एकमेव प्रत काश्मीरच्या शारदापिठात असल्याचे त्यांना समजले. ती मिळवण्यासाठी त्यांनी तब्बल तीन महिन्यांचा प्रवास करून काश्मिर गाठले. आजच्या गुगल सर्चच्या जमान्यात हजार वर्षांपूर्वी एखादे पुस्तक मिळवणे किती जिकीरीचे होते हे चटकन लक्षात येणार नाही. जवळपास सर्व प्रवास चालत करायचा. वाटेत रस्त्याशिवायच्या डोंगरदऱ्या, पुलाशिवायचे नदीनाले पार करायचे, हिंस्र श्वापदांनी भरलेली जंगले पार करायची. यासाठी किती दुर्दम्य इच्छाशक्ती हवी याचा निव्वळ विचारदेखील कठीण वाटतो.
वैष्णव संप्रदायाला ‘विशिष्टाद्वैताचे मजबूत तात्त्विक अधिष्ठान’ देणाऱ्या या संतास दीर्घायुष्य लाभले. आणि त्याने या आयुष्याचे अक्षरशः सोने केले. पूर्ण समाधानाने, पूर्ण जागृतीत त्यांनी इहलोकीची यात्रा पूर्ण केली.
……
डाॅ.रुपेश पाटकर

  • Related Posts

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    “महात्म्यांचा परस्परविरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती! तुमच्या-आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावं, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा.” जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारसमोर अभूतपूर्व संकट निर्माण झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र…

    गोव्याला प्रसिद्धी नव्हे,उत्तरदायी प्रशासन हवे! जॉन्सन डिसिल्वा

    सरकारवर टीका करणे म्हणजे गोव्यावर टीका करणे नव्हे. सरकारला प्रश्न विचारणारा नागरिक हा राज्याचा शत्रू नसतो. उलट, प्रश्न विचारणारे नागरिकच लोकशाही जिवंत ठेवतात. गोव्याला प्रसिद्धीची नव्हे, तर चांगल्या प्रशासनाची आणि…

    You Missed

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    Viriato Raises Land-Losers’ Rights at Konkan Railway Meeting

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    24/08/2026 e-paper

    कारापूरवासीयांची सुटका करा

    कारापूरवासीयांची सुटका करा

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    ‘मेटा’ची दिलगिरी; एक गाजवलेली, एक दडपलेली

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार

    गडकरींना काळे झेंडे दाखवणार