माते ! हा अंगार प्रज्वलित ठेव !

केवळ देवदर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून किंवा हातात गंडे बांधून या भूमीप्रतीची प्रामाणिकता सिद्ध होणार नाही. गोंयकारांनी आपल्या अस्तित्वाचा अंगार कायम प्रज्वलित ठेवावा लागेल. तो शमला तर आपण संपलो, हे लक्षात ठेवा!

आज शिरगांवच्या श्री देवी लईराईच्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर ठिकाणचे देवीचे भक्तगण या जत्रोत्सवाला भेट देऊन देवीचा कौल घेतात.
जत्रोत्सवपूर्व व्रतस्थ धोंड अग्निदिव्यातून संचार करत जणू आपल्या भक्तीची आणि पवित्रतेची कसोटी लावतात. हा जत्रोत्सव इतर अनेक जत्रोत्सवांपेक्षा वेगळा आहे. या मातीशी आणि परंपरेशी घट्ट नाते अधोरेखित करणारा हा उत्सव विशेषतः शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी—गरीब, सामान्य बहुजन समाजाचा आहे.
श्री लईराई देवीच्या आस्थेने, भक्तीने आणि ओढीने हा भक्त स्वतःला इतका वाहून घेतो की हे काही दिवस तो स्वतःलाच विसरून जातो. एक अनोखी ताकद या भक्तांमध्ये संचारते, ज्यामुळे कित्येक अशक्य गोष्टीही सहज शक्य होतात.
सकाळ ते संध्याकाळ दारूत बुडालेल्या कित्येकजण, या व्रतस्थ काळात दारूच्या थेंबालाही हात लावत नाहीत. ताटात माशांची कढी नसेल तर घास गळ्याखाली न उतरवणारे व्रतस्थही या काळात शाकाहार स्वीकारतात.
आईच्या ओढीने अग्निदिव्य पार करण्याची जी आत्मशक्ती भक्तांमध्ये संचारते, ती अवर्णनीय आहे. श्री देवी लईराईचे लाखो भक्त तिच्यासमोर लीन होतात.
चारही बाजूंनी खनन व्यवसायाने वेढलेला शिरगांव गाव. पोर्तुगीज काळापासूनच खनिज संपत्तीचा शोध लागल्यामुळे निसर्गसौंदर्याचे विद्रूपीकरण झाले आहे.
श्री देवी लईराईच्या या भूमीत खनिज संपत्तीचा साठा आहे, हेच तिचे वैभव! देशाच्या विकासासाठी खनिज महत्वाचे असले तरी त्याच्या उत्खननाला मर्यादा हवी आहे.
श्री लईराई मंदिरासोबतच गावातील काही घरे आणि धार्मिक स्थळे ही खाण लीज क्षेत्रात आहेत.
राजकारणी ती बाहेर काढण्याचे आश्वासन देतात, मात्र प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचेही सांगतात. राजकारण हे पाच वर्षांचे असते, पुढे कोण कुठे असेल हे सांगता येणार नाही.
पण शिरगांवच्या मंदिरासह घरे आणि धार्मिक स्थळे लीज क्षेत्रातून बाहेर काढली नाहीत, तर भविष्यात हा विषय अधांतरीच राहणार आणि स्थानिकांच्या डोक्यावर कायम संकट राहणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे नेहमी अंत्योदय तत्त्वाचा उल्लेख करतात. तोच अंत्योदय घटक श्री देवी लईराईचा परमभक्त आहे.
आज या भक्तांना कुळ, मुंडकार, आल्वारा, बेरोजगारी, महागाई, आरोग्य, सामाजिक प्रश्न, व्यसनाधीनता अशा असंख्य संकटांना सामोरे जावे लागत आहे.
समाजाचा स्वाभिमान हा राजकीय व्यवस्थेची अडचण ठरू लागला आहे. त्यामुळे लाचारीच्या जाळ्यात अडकवून समाजाला कायम गुलामगिरीत ठेवण्याचा डाव सत्ताधारी घटक आखत आहेत.
गोव्याच्या जमिनींवर परप्रांतीयांचा डोळा आहे. विकासाच्या नावाने पंचतारांकित जुगार अड्ड्यांचा विस्तार सुरू आहे.
हे भयाण चित्र पाहून भविष्यात संस्कृती, परंपरा, वारसा कसा जपणार, याचा कुणी विचार केला आहे का?
केवळ देवदर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून किंवा हातात गंडे बांधून या भूमीप्रतीची प्रामाणिकता सिद्ध होणार नाही.
गोंयकारांनी आपल्या अस्तित्वाचा अंगार कायम प्रज्वलित ठेवावा लागेल. तो शमला, तर आपण संपलो, हे लक्षात ठेवा!

  • Related Posts

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    पर्यटनाचा अर्थ केवळ कॅसिनो, दारू आणि रात्रीची मौजमजा एवढाच मर्यादित असू शकत नाही. गोव्याची खरी ओळख त्याची संस्कृती, निसर्ग, वारसा, समुद्रकिनारे आणि स्थानिक जीवनशैली आहे. “नशामुक्त गोवा” ही घोषणा ऐकायला…

    हातात नारळ की नारळावर हात !

    जनतेला आज केवळ निवडणुकीपुरती युती नको आहे; तिला विश्वासार्ह, प्रामाणिक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय हवा आहे. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे.…

    You Missed

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    Rent-a-Bike permit renewals stuck since 2024: Tamankar seeks manual processing amid NIC software issues

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    Supreme Court Verdict a Wake-Up Call for BJP Government: Amit Patkar

    05/08/2026 e-paper

    05/08/2026 e-paper

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    काँग्रेस – गोवा फॉरवर्ड युती अडचणीत

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    नशेवर उभी अर्थव्यवस्था ?

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision