पेडणेत कार रेसिंगचे राजकारण तापणार

जीत आरोलकरांचे समर्थन तर प्रविण आर्लेकरांचा सावध पवित्रा

गांवकारी, दि. २४ (प्रतिनिधी)

मुरगांववासियांनी पिटाळून लावलेली फॉर्म्युला-४ कार रेसिंग स्पर्धा आता पेडणे तालुक्यात मोपा येथे आयोजित केली जात आहे. यासंबंधी सरकारने स्थानिकांना अजिबात विश्वासात घेतलेले नाही. या इव्हेंटच्या तयारीचे काम जोरात सुरू असून सरकारच्या दोन्ही आमदारांकडून काहीच वाच्यता झालेली नाही. मोपातील कार रेसिंगचे राजकारण आता तापण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार रेसिंग मोपात आयोजित होणार असल्याची घोषणा केली. पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी याबाबतीत काहीच माहिती नसल्याचे पत्रकारांना सांगितले, तर मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हे या स्पर्धेच्या समर्थनात आहेत. “ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण अनेकदा इतरत्र जातो,” असेही ते म्हणाले. दोन दिवसांच्या या स्पर्धेमुळे राज्याला महसूल मिळेल तसेच अनेक पर्यटक, स्पर्धक आणि चाहते याचा आनंद लुटतील, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ही रेसिंग नेमकी कुठे आयोजित होईल, स्थानिकांना या स्पर्धेचा त्रास होईल का किंवा या स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिकांना व्यावसायिक संधी मिळणार का, या प्रश्नांची उत्तरे कुणीच दिलेली नाहीत. एवढी मोठी स्पर्धा पेडणेत आयोजित होत असताना कुणालाच विश्वासात घेण्याची गरज सरकारला वाटू नये, याचा अर्थ पेडणेकरांना गृहीत धरूनच सगळा कारभार चालणार आहे काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
जीएमआर–राज्य सरकारातील कराराचे उल्लंघन
मोपा विमानतळ परिसरात ही स्पर्धा भरविणे म्हणजे मोपा विमानतळ सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन, सार्वजनिक सुरक्षेच्या तत्त्वांचे उल्लंघन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ रोजी गोवा सरकार व जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (जीजीआयएएल) यांच्यात झालेल्या सवलत करारातील अनेक बंधनकारक तरतुदींचे उल्लंघन असल्याचा दावा ज्ञानेश्वर वरक यांनी केला आहे.
यासंबंधी वरक यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव, वाहतूक व विमान वाहतूक खाते, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, DGCA आदी सर्व संबंधित खाती व मंत्रालयांना ही तक्रार पाठवली आहे. या करारातील कलम ५.१४ नुसार कन्सेशनायरला विमानतळ प्रकल्पाच्या व्याप्तीबाहेरील कोणत्याही व्यवसायिक उपक्रमात सहभागी होण्यास स्पष्ट मनाई आहे. व्यावसायिक स्ट्रीट रेसिंग फेस्टिव्हल आयोजित करणे किंवा परवानगी देणे हे विमानतळ संचालनाशी संबंधित नसलेले स्वतंत्र व्यवसायिक कार्य असून, हे कलम ५.१४ मधील “एकमेव उद्देश” या तरतुदीचे थेट उल्लंघन असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
पेडणेकर खड्ड्यात आणि रेसिंगवर पैसा
पेडणे तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रोज खड्ड्यांतून लोकांना प्रवास करावा लागत आहे. हे खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याऐवजी राज्य सरकार या रेसिंग स्पर्धेवर कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे. हा खर्च देखील केवळ तात्पुरता असेल. या पैशांतून उभारण्यात येणाऱ्या सुविधांचा लोकांना वापर करता येणार नाही. पर्यटनाच्या नावाखाली सरकार खर्च करीत असलेला पैसा वसूल केला जाईल खरा, परंतु लोकांना खड्ड्यात ठेवून पर्यटनाच्या नावाखाली सुरू असलेली ही चैन नेमकी समर्थनीय आहे काय, असा सवाल पेडणेतील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.

  • Related Posts

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    Senior Aam Aadmi Party leader Francis Coelho has resigned from AAP Goa, citing political disagreement over alliance strategy ahead of the 2027 Goa Assembly elections and questioning the formation of a separate Opposition front.

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    मडगांवात २२ तर म्हापशात २३ रोजी संवाद गांवकारी,दि.२१ (प्रतिनिधी) गोव्याची जमीन, पर्यावरण, शेती आणि नियोजनाशी संबंधित विविध प्रश्नांवर जनसहभाग अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘इनफ इज इनफ’ गोवा चळवळीचे निमंत्रक तथा…

    You Missed

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    Francis Coelho Quits AAP Goa, Questions Separate Opposition Front Ahead of 2027 Polls

    21/09/2026 e-paper

    21/09/2026 e-paper

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    उड्डाणपुलाच्या त्रुटींचे उत्तरदायित्व कोण घेणार ?

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    न्या. फेर्दिन रिबेलो स्वयंसेवी संस्था आणि तरूणांशी संवाद साधणार

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    `गोंय राखण यात्रा’ उद्यापासून

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals

    Yash Fadte Goes Down Fighting in PSA Aramis Club Open Quarterfinals