प्रश्न एवढाच आहे की, प्रामाणिकपणा हा गुण न राहता तोच जर करिअरसाठी अडथळा ठरत असेल, तर दोष व्यक्तींचा नाही, तर व्यवस्थेचा आहे.
गोवा पोलिस दलाला देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक असलेला प्रेझिडेंट्स कलर्स पुरस्कार मिळणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. दोनापावला येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. शिस्त, सेवा, कर्तव्यनिष्ठा आणि दीर्घकाळाची उल्लेखनीय कामगिरी यांची दखल घेणारा हा पुरस्कार गोवा पोलिसांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र, या झगमगाटाच्या प्रकाशात पोलिस दलातील काही अस्वस्थ करणाऱ्या वास्तवांकडे डोळेझाक करता येणार नाही.
पोलिस दलाची प्रतिमा गेल्या काही काळात अनेक कारणांनी मलिन झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पाच पोलिसांवर निलंबन आणि बदलीची कारवाई करण्याची वेळ आली. त्याआधी पोलिस अधिकारीच आरटीआय कार्यकर्त्यांच्या नावाने खोट्या तक्रारी करून आपल्या सहकाऱ्यांना लक्ष्य करत असल्याचे प्रकरण गाजले. गोवा पोलिस आणि राखीव पोलिस दलामधील ज्येष्ठतेच्या वादापासून ते विविध प्रश्नांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची वेळ येण्यापर्यंत अनेक घटना दलातील अंतर्गत अस्वस्थता दाखवून देतात.
सर्वात गंभीर प्रश्न आहे तो पोस्टिंगच्या संस्कृतीचा. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी अडगळीत पडतात, तर संधीसाधू अधिकारी मोक्याच्या पोस्टिंग मिळवून मिरवतात, अशी भावना जर दलातील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली असेल, तर ती व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा आहे. पोलिस ठाण्यांच्या पोस्टिंगसाठी पैशांची बोली लागते आणि बोली स्वीकारणाऱ्यालाच मनासारखी पोस्टिंग मिळते, अशी चर्चा जर खुलेआम होत असेल, तर तिची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांसाठी हप्ते गोळा करणारी टोळी म्हणून पोलिसांची प्रतिमा निर्माण होणे हे तर लोकशाही व्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर आहे.
याचा अर्थ संपूर्ण पोलिस दल भ्रष्ट आहे, असा अजिबात नाही. या खात्यात आजही असंख्य प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि धाडसी अधिकारी-कर्मचारी आहेत. प्रश्न एवढाच आहे की, प्रामाणिकपणा हा गुण न राहता तोच जर करिअरसाठी अडथळा ठरत असेल, तर दोष व्यक्तींचा नाही, तर व्यवस्थेचा आहे.
ड्रग्स, वेश्याव्यवसाय, मद्यधुंद गुंडगिरी आणि दादागिरीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांची असली, तरी सरकारची धोरणेच जर या प्रवृत्तींना खतपाणी घालत असतील, तर पोलिसांकडून चमत्काराची अपेक्षा करणे अन्यायकारक ठरेल.
प्रेझिडेंट्स कलर्स हा गौरव आहे; तो आत्मपरीक्षणाची संधीही आहे. स्टेडियममध्ये मिळालेला सन्मान आणि रस्त्यावर सामान्य नागरिकाला जाणवणारा पोलिसांचा अनुभव यांच्यातील अंतर मिटले, तरच या पुरस्काराला खरा अर्थ प्राप्त होईल. अन्यथा पदक छातीवर चमकेल; पण पोलिस दलाच्या प्रतिमेवरील डाग तसेच राहतील.







