काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

पणशीकर घराण्याचा सांस्कृतिक वारसा नव्या सुरांत

गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
मराठी रंगभूमीवरील दिग्गज नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या घराण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आता नव्या पिढीकडून वेगळ्या सुरांत पुढे जात आहे. प्रभाकर पणशीकर यांची नात आणि संस्कृत अभ्यासक तरंगिणी खोत यांची कन्या काश्मिरा खोत हिने स्वतंत्र गायिका आणि गीतकार म्हणून संगीतविश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.

‘द इंडियन म्युझिक डायरीज’ने काश्मिराच्या संगीतप्रवासावर प्रकाश टाकला आहे. पुण्यात वाढलेल्या काश्मिराला भारतीय शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी लाभली असली तरी तिने पॉप आणि रॉक संगीताची वाट निवडली. स्वतःचा शोध, प्रेम, नातेसंबंधांतील भावनिक गुंतागुंत आणि स्वतःचे अस्तित्व जपण्याची धडपड हे तिच्या गीतलेखनाचे प्रमुख विषय आहेत.

काश्मिराच्या या प्रवासामागे समृद्ध संगीतमय कौटुंबिक वातावरण आहे. गीतलेखन आणि संगीताचा वारसा तिला आजी अनुराधा खोत यांच्याकडून लाभला. वडील नरेंद्र खोत यांनी प्रख्यात तबलावादक उस्ताद अल्लारख्खा खानसाहेब यांच्याकडे तबलावादनाची तालीम घेतली, तर मामा पंडित रघुनंदन पणशीकर हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामवंत गायक आहेत. आई तरंगिणी खोत यांच्या संस्कृत प्रचार-प्रसारातील योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना २०२४चा ‘महाकवी कालिदास पुरस्कार’ प्रदान केला आहे.

वयाच्या १७व्या वर्षी ‘ओपन माइक’ कार्यक्रमांतून इंग्रजी गाणी सादर करण्यास सुरुवात केलेल्या काश्मिराने पुढे विविध बँडसोबतही काम केले. शालेय जीवनापासून कविता लिहिणाऱ्या काश्मिराच्या हातात २०१८ मध्ये गिटार आली आणि तिने स्वतःच्या चाली व गाणी तयार करण्यास सुरुवात केली. गिटारवादक आणि गायक मयंक कटारे यांच्या प्रोत्साहनानंतर तिचे ‘ब्रेक थ्रू’ आणि ‘कट टू द चेस’ यांसारखे स्वतंत्र ट्रॅक श्रोत्यांसमोर आले.

रॉक संगीताचा, विशेषतः ‘पर्ल जॅम’ आणि गायक एड्डी वेड्डेर यांच्या भावनिक अभिव्यक्तीचा तिच्यावर प्रभाव आहे. तिचे ‘वॉट विल बी’ हे गाणे प्रेम आणि नातेसंबंधांत स्वतःची ओळख हरवू नये, या विचाराभोवती फिरते. काश्मिरासाठी संगीत हे केवळ मनोरंजन नसून स्वतःला समजून घेण्याचे आणि भावना व्यक्त करण्याचे माध्यम आहे.

स्वतंत्र संगीत क्षेत्राचा भारतात विस्तार होत असला तरी नवोदित कलाकारांना अधिक व्यासपीठे आणि आर्थिक पाठबळ मिळण्याची आवश्यकता असल्याचे तिचे मत आहे.

गोमंतकाच्या सांस्कृतिक भूमीशी मुळे जोडलेल्या पणशीकर घराण्यात रंगभूमी, शास्त्रीय संगीत, गीतलेखन आणि संस्कृतची समृद्ध परंपरा आहे. याच वातावरणाचे संस्कार घेऊन काश्मिरा आता आधुनिक पॉप-रॉक संगीताच्या माध्यमातून आपल्या पिढीच्या भावना स्वतःच्या शब्दांत आणि सुरांत मांडत आहे. माध्यम आणि संगीताची भाषा बदलली असली तरी पणशीकर-खोत घराण्याचा कलात्मक वारसा नव्या सुरांत पुढे जात आहे.

  • Related Posts

    पाळोळे बांधकाम प्रकरणी ३९(ए) अंतर्गत अर्ज

    पश्चिम बंगाल सभापतींच्या गोवा भेटीचे रहस्य उघडगावंकारी, दि. २५ (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल विधानसभेचे सभापती रथिंद्र बोस यांच्या आर. बोस हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट प्रा. लि. कंपनीतर्फे पाळोळे-काणकोण येथील सर्व्हे क्रमांक १४८/६ मधील…

    चीनचे विनाशकारी ‘वॉटर बॉम्ब’!

    नेपाळमधील महापुरानंतर हिमनदीजन्य तलावांचा धोका चर्चेत; भारतासाठीही सतर्कतेचा इशारा नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार, सात जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला…

    You Missed

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    काश्मिरा खोतची स्वतंत्र संगीतविश्वात झेप

    28/09/2026 e-paper

    28/09/2026 e-paper

    काँग्रेस- आरजीपी युतीची दमदार पावले

    काँग्रेस- आरजीपी युतीची दमदार पावले

    इन्कलाब झिंदाबाद !

    इन्कलाब झिंदाबाद !

    कारापूर : कामबंद नोटिशीला आव्हान

    SIR Citizens’ Monitor Calls ECI Response an ‘Eye-Wash’, Demands Reopening or Scrapping of SIR in Goa

    SIR Citizens’ Monitor Calls ECI Response an ‘Eye-Wash’, Demands Reopening or Scrapping of SIR in Goa