सर्वत्र शोधमोहीम सुरू; दोघांवरही गुन्हा नोंद
पणजी,दि.१३(प्रतिनिधी)
जमीन हडप प्रकरणी अटक करण्यात आलेला तसेच खून, खूनी हल्ला आणि फसवणूकीचे देशभरात सुमारे १५ गंभीर गुन्हे दाखल झालेला सिद्दीकी उर्फ सुलेमान खान शुक्रवारी पहाटे गुन्हा शाखेच्या कोठडीतून पसार झाला. त्याला पसार होण्यात मदत केलेला आयआरबीचा पोलिस शिपाई अमित नाईक हा देखील बेपत्ता असल्याने पोलिसांची धावपळ सुरू झाली आहे.
पहाटेचा साधला डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना आज शुक्रवारी पहाटे २.३० ते ३.०० च्या सुमारास घडली. संशयित पोलिस शिपायाने आधी सुलेमानला कोठडीतून बाहेर काढले. नंतर सुलेमानला आपल्याच दुचाकीवर बसवून ते दोघे पसार झाले. पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमाने दोघांचा माग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.
हुबळीत झाली होती अटक
वेगवेगळ्या गुन्हेगारी प्रकरणात सामील असलेले सुलेमान खान हा गेली चार वर्षे फरार होता. अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नातून त्याला हुबळी येथे अटक केली होती. देशभरात एकूण १५ गुन्हे त्याच्यावर नोंद असून गोव्यात ७, दिल्लीत १, हैदराबादमध्ये ४ व पुणे येथे ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. म्हापसा, बेळगाव सारख्या ठिकाणी संशयिताने जमीन खरेदी-विक्रीमध्ये फसवणूक केलेली आहे. त्याने अनेक महिलांशी मैत्री करून त्यांच्या नावे बँक खाती खोलून तो त्यांचा वापर करीत होता,असेही पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. संशयिताकडे बोगस वाहन चालक परवाने आणि पॅन कार्ड सापडले आहेत.
गवंडी, कंत्राटदार ते लँड डीलर
मुळ कर्नाटकातील शिमोगा इथल्या सुलेमानचा जन्म म्हापशात झाला. सुरूवातीला गवंडी, हळूहळू कंत्राटदार आणि मग जमीन व्यवहारात जाऊन ते बडा डीलर बनला. बनावट मुखत्यारपत्र, मालमत्तेची खरेदीस विक्री पत्रे तयार करण्यात तो माहिर होता. त्याने वकिल, नोटरी, सरकारी अधिकारी, राजकारणी अशी एक आपली टोळीच तयार केली होती,असेही सांगण्यात येते.
राज्यभरातील पोलिस सतर्क
सुलेमान खान आणि पोलिस शिपाई अमित नाईक यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी राज्यभरातील पोलिस यंत्रणांना सतर्क केले आहे. विमानतळ, रेल्वे, बसस्थानक तसेच चेकपोस्ट यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. शेजारील राज्यांतील पोलिसांकडेही संपर्क साधला आहे. सुलेमानला पळून जाण्यात मदत केलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल,अशी माहिती आयजीपी वर्षा शर्मा यांनी सांगितले. पोलिस कोठडीतून पलायन केल्याप्रकरणी सुलेमान आणि अमित यांच्याविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. हा पूर्वनियोजित कट होता की ही गोष्ट अकस्मात घडली, याचाही शोध पोलिस घेत आहेत.
विरोधकांची टीका
सरकार पोलिसांचा वापर केवळ विरोधकांवर कारवाई करण्यासाठी वापरत आहेत. हा प्रकार पोलिस यंत्रणेची निष्क्रियता वेशीवर टांगणारा ठरला आहे. गुन्हेगार आणि पोलिसांचे साटेलोटे हा गंभीर विषय बनत चालला आहे. गुन्हा शाखेच्या पोलिस अधिक्षकांवर कारवाईची मागणी आपचे निमंत्रक एड.अमित पालेकर यांनी केली तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनीही पोलिसांच्या निष्क्रियतेवर ताशेरे ओढले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही सरकार पोलिसांचा वापर विरोधकांवर दडपण आणण्यासाठी करत असून गुन्हेगारांसाठी रान मोकळे झाल्याची टीकाही त्यांनी केली.