आप – काँग्रेसचे ‘केस्तांव’

सर्वाधिक काळ राज्यात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला विनासायास सत्ता मिळेल, असे वाटत असले तरी परिस्थिती बरीच बदललेली आहे.

भाजपचा पराभव करायचा असेल, तर विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. देशभरातील लोकांची ही भावना बनलेली असताना, विरोधकांतच सध्या सुरू असलेला कलगीतुरा जनतेची निराशा करणारा ठरत आहे. सर्वच विरोधक एकमेकांना भाजपची ‘बी टीम’ म्हणून हिणवत आहेत. विरोधी मतांची विरोधकांतच विभागणी झाली, तर संघटनात्मकदृष्ट्या एकसंघ असलेल्या भाजपला पराभूत करणे शक्य नाही, हे कुणीही नाकारू शकत नाही. ‘इंडिया आघाडी’ तयार करून लोकसभा निवडणुकीत भाजपचा अश्वारूढ काही प्रमाणात रोखण्यात यशस्वी ठरलेल्या विरोधकांना हे नवीन खूळ सुचले आहे, हेच समजण्यापलिकडे आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजपला पराभूत करण्यापेक्षा काँग्रेसची जागा मिळवण्याकडेच इतर सहकारी विरोधकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आपच्या गोवा प्रभारी आणि दिल्लीच्या माजी शिक्षणमंत्री आतिशी यांनी उघडपणे काँग्रेसवर शरसंधान चालवले आहे. राज्यात काँग्रेसचे विरोधी पक्षनेत्यांसह दोन तृतीयांश आमदार दोन वेळा भाजपमध्ये गेले, हा त्यांच्यासाठी युक्तिवादाचा प्रमुख मुद्दा ठरला आहे. काँग्रेसचे आमदार निवडून आले, तर ते भाजपमध्येच जाणार, हा मुद्दा लोकांच्या गळी उतरवून काँग्रेसची मते आपल्याकडे वळविण्याचा हा डाव विरोधकांच्या रणनितीचा भाग बनला आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने हा विषय गंभीरपणे घेणे अपेक्षित आहे, परंतु तसे गांभीर्य काँग्रेसमध्ये अजिबात दिसत नाही. वास्तविक काँग्रेसने भाजपविरोधात आघाडी घेणे गरजेचे आहे. विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असल्याने, आत्तापर्यंत काँग्रेसने राज्यातील सर्व मतदारसंघात फिरून आपली हवा निर्माण करण्याची गरज होती, पण त्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी ‘संविधान बचाव अभियान’ अंतर्गत काँग्रेसने काही मतदारसंघात दौरे केले, परंतु ते प्रभावी ठरू शकले नाहीत. उलट गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी वेगवेगळ्या मतदारसंघांचे दौरे करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधण्यात यश मिळवले. विधानसभेत आपल्या भाषणांत त्यांनी विविध मतदारसंघातील विषय मांडताना त्या त्या भागातील समस्यांना वाचा फोडून लोकांची सहानुभूती प्राप्त केली. विरोधी पक्षनेते याकामी कमी पडले, हे त्यांच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून आले. गोवा फॉरवर्ड अजूनही इंडिया आघाडीचा घटक असल्याचे मान्य करत असले, तरी काँग्रेसने इतर विरोधी पक्षांशी समन्वय साधण्याची गरज आहे, हे दिसत नाही. विजय सरदेसाई यांच्यासाठी फातोर्डा मतदारसंघात काँग्रेसचा पाठींबा आवश्यक आहे. ते काँग्रेसला फटकारू शकत नाहीत, हे आम आदमी पार्टीने हेरले आहे. आम आदमी पार्टीचे धोरण स्पष्टपणे काँग्रेसला डिवचण्याचे आहे. काँग्रेस अजूनही आपल्या गतवैभवात रममाण असल्याचे दिसते. सर्वाधिक काळ राज्यात सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला विनासायास सत्ता मिळेल, असे वाटत असले तरी परिस्थिती बरीच बदललेली आहे. विजय सरदेसाई यांनी पहिल्याच निवडणुकीत तीन आमदार निवडून आणले आणि सत्तेचे वाटेकरी बनले. यावेळीही किमान पाच आमदार निवडून आले, तर ते पुन्हा सत्तेचे भागीदार ठरू शकतात आणि त्यामुळे काँग्रेसचे वर्चस्व मान्य करणे त्यांच्यासाठी कठीण ठरू शकते.
काँग्रेसकडे राज्याचा चेहरा बनू शकेल असा नेता सध्या नाही आणि त्यामुळे ही कमतरता भरून काढून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गोवा फॉरवर्डसह आम आदमी पार्टी करत आहे. या एकंदर परिस्थितीत भाजप निर्धास्त आहे. विधानसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून आपली पत टिकवली, तर सत्तेसाठी लागणाऱ्या आकड्यांची बेगमी करणे त्यांना सहज शक्य होणार आहे. जोपर्यंत विरोधक आपले वैयक्तिक अजेंडे बाजूला ठेवून एका छत्राखाली एकत्र येत नाहीत, तोपर्यंत जनतेच्या मनात विरोधकांबाबत संशयाची भावना कायम राहणार आहे आणि अशा वेळी भाजपला ते सोयीचे ठरू शकते. हे भान विरोधकांनी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

  • Related Posts

    ते तिघे कोण ?

    मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नेतृत्वाच्या कार्यकाळातच हे प्रकार घडल्यामुळे त्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर येते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाचा योग्य तपास करून सत्य जनतेसमोर ठेवणे हे त्यांचे कर्तव्यच ठरते. सरकारी नोकऱ्यांसाठी…

    अरे हे चाललंय काय?

    इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब…

    You Missed

    ते तिघे कोण ?

    ते तिघे कोण ?

    पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

    पुजाच्या गौप्यस्फोटाने ‘मंत्री’ हादरले

    10/11/2025 e-paper

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    error: Content is protected !!