2 ऑक्टोबर रोजी आगरवाडा- चोपडेत जनउठाव
पेडणे,दि.२५(प्रतिनिधी)- सांकवाळ गावांतील भूतानी प्रकल्पाविरोधात तेथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या मोर्चाच्या यशस्वी आयोजनानंतर आता पेडणेतील आगरवाडा- चोपडेवासीयांचा हुरूप वाढला आहे. चोपडे डोंगरमाथ्यावरील जमीनीच्या भूरूपांतराविरोधात २ ऑक्टोबर रोजी गांवात जनउठाव होणार आहे.
आगरवाडा- चोपडे नागरिक समितीने हा निर्णय घेतला आहे. आगरवाडा- चोपडे गांवच्या मुळावरच हे भूरूपांतराचे संकट ओढवले आहे. शापोरा नदीच्या किनाऱ्यावर हा गांव वसला असून या डोंगराच्या पायथ्याशी या गांवची लोकवस्ती वसली आहे. या डोंगरावर बांधकामे झाली आणि या डोंगराची नैसर्गिक रचना बदलण्यात आली तर केरळातील वायनाडसारखे संकट ओढवून हा गांवच उध्वस्त होण्याचा धोका ग्रामस्थांना सतावत आहे.
गुंतवणूकीसाठी गांवचे बळी देणार काय?
गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याच्या नावाने सरसकट जमीनींचे रूपांतरण सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर यांनी आपल्या एका जागृती व्हिडिओतून यासंबंधीची सविस्तर माहिती दिली आहे. आगरवाडा- चोपडेची सध्याचे लोकवस्ती क्षेत्र २,८४,५१२ चौ.मीटर आहे. या क्षेत्रात संपूर्ण गांव वसला आहे. आता सरकारने केवळ दीड वर्षांत सुमारे ३,८६,३७६ चौ.मी जमीनीचे रूपांतर करून या गावांवरच नांगर फिरवण्याचा घाट घातला आहे. या रूपांतरीत क्षेत्रात बांधकाम झाले तर या गांवची ओळख तर मीटणारच पण हा गांव पूर्णतः परप्रांतीयांच्या कब्ज्यात जाणार आहे, अशी भीतीच समितीने व्यक्त केली आहे.
पेडणेवासीयांना आवाहन
आगरवाडा-चोपडेवासीयांच्या या गांव रक्षण चळवळीला पेडणे तालुक्यातील समस्त नागरिकांनी पाठींबा द्यावी आणि या जनउठाव कार्यक्रमाला सहकार्य करावे,असे आवाहन समितीने केले आहे. पेडणेकरांनी एकमेकांच्या मदतीला धावूनच आता हा तालुका सांभाळावा लागणार आहे,असेही समितीने कळवले आहे.