हे ड्रग्स गोव्याची प्रतिमा धुण्यासाठी भाजपच्या वॉशींग मशीनमध्ये डिटर्जंट म्हणून वापरणार होते काय, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे.
गोव्याच्या पर्यटनाची नियोजनबद्ध बदनामी सुरू आहे. काही सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्स हे काम करत आहेत, अशी टीका राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. यंदाच्या नाताळ आणि नवीन वर्षाच्या मौसमात गोव्याचे पर्यटन फुल्ल होते, असे मुख्यमंत्री सांगतात. स्पर्धात्मक युगात प्रतिस्पर्ध्यांवर अशी कुरघोडी करणे हे काही नवीन नाही परंतु स्पर्धेत टीकून राहण्यासाठी अशा कुरघोड्यांना प्रत्यूत्तर किंवा चोख जबाब देण्याची तयार आपल्याकडे असायला हवी. तशी तयारी आपल्याकडे आहे,असे अजिबात दिसत नाही. पर्यटनाची बदनामी होते आहे हे सांगण्यासाठी पर्यटन उद्योगातील प्रतिष्ठीत मंडळी पुढे येण्याची गरज आहे. टीटीएजी, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आदी संघटनांनी याबाबत बोलायला हवे. हॉटेल फुल्ल होती हे हॉटेलवाल्यांनी सांगितले असते तर ते योग्य ठरले असते. तात्पर्य खाण उद्योगाप्रमाणेच आपले पर्यटन अनियंत्रित होत चालले आहे. याला कारण म्हणजे राजकीय स्वार्थ, हप्तेबाजी आणि प्रत्येक गैरव्यवहार, बेकायदा व्यवसायातून मिळणारा चिक्कार पैसा ही आहेत, हे खेदाने म्हणावे लागते.
राज्याच्या पर्यटनाची हमी देणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचे गृहमंत्री देखील आहेत. गृह मंत्रालयाचे राज्यभरातील पर्यटन उद्योजकांकडून कलेक्शन असते आणि हे कलेक्शन पोलिसांमार्फत केले जाते,अशी चर्चा सुरू आहे. अर्थात हे काही नवीन नाही. ही पूर्वापारपासूनची परंपरा आहे पण ती सुरू आहे आणि त्याचे प्रमाण वाढले आहे. कायदे, नियम, अटी, शर्तींचे पालन करून पैसा मिळवता येत नाही आणि त्यामुळेच या हप्त्यांच्या बदल्यात या सर्व गोष्टींना फाटा देण्याचा परवानाच मिळत असल्याचा समज पसरला आहे. पोलिस, पर्यटन, अग्निशमन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, सीआरझेड, पंचायत, मंत्री, आमदार अशी भली मोठी जंत्रीच असते त्यांना प्रसाद पाकळी लावूनच पर्यटन उद्योजकांना आपला व्यवसाय करावा लागतो. ही प्रसाद पाकळी लावण्यातच त्याचे श्रम वाया जातात आणि हे सगळे करून हाती काहीच शिल्लक उरत नसल्यामुळे मग आपोआपच अन्य मार्गांचा स्वीकार करावा लागतो आणि खर्च आणि नफा कमवावा लागतो हे वेगळेपणाने सांगण्याची गरज नाही.
आपले पर्यटन सांभाळणे ही काळाची गरज आहे. पर्यटनाचा खाण उद्योग झाला तर गोव्याची परिस्थिती कठीण बनणार आहे. पण खाणींप्रमाणेच पर्यटन हा देखील सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे असे समजणाऱ्यांना काय करणार. पर्यटनाची बदनामी होऊ नये असे वाटणे योग्य आहे परंतु त्यासाठी आपल्याकडे योजना काय आहे. सनबर्न महोत्सवात मृत्यूमुखी पडलेला करण कश्यप हा २६ वर्षीय युवक आयआयटी टॉपर होता. कळंगुट येथे एका शॅकमध्ये मारहाण झाल्याने मरण पावलेला रवी तेजा हा सॉफ्टवेअर कर्मचारी होता. मग गोव्यात फालतू पर्यटक येतात असे आपण कसे म्हणू शकतो. गत वर्षी १० कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आले. अलिकडेच नाताळ आणि न्यू इअरच्या काळात ठिकठिकाणी तीन ते साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. हे सगळे कशाचे द्योतक आहे. हे ड्रग्स गोव्याची प्रतिमा धुण्यासाठी भाजपच्या वॉशींग मशीनमध्ये डिटर्जंट म्हणून वापरणार होते काय, याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे.
ही बदनामी रोखण्यासाठी पहिली गोष्ट हवी ती प्रामाणिकता. केवळ राजकीय नेतेच नव्हे तर आम्ही प्रत्येकाने वैयक्तीक स्वार्थ आणि पैशांचा हव्यास सोडून राज्याच्या हीताला प्राधान्य दिले तरच ही परिस्थिती सुधारू शकते अन्यथा खाणींनंतर पर्यटनाचे दिवाळे होण्यास अजिबात वेळ लागणार नाही.