जनतेला बदल हवा असेल तर त्या बदलाला सक्षम राजकीय पर्याय देण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी केवळ नाराजी पुरेशी नाही; त्यासाठी विरोधकांमध्ये विश्वास, एकजूट आणि ठोस कृती आवश्यक आहे.
———————————————–
गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससमोर अनेक आव्हाने उभी आहेत. दोन वेळा विरोधी पक्षनेत्यांसह दोन तृतीयांश आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा अनुभव पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात येणारे उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ राहतील, याची खात्री करणे काँग्रेससाठी मोठे आव्हान ठरणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे आमदार पुन्हा फोडण्याची हॅट्ट्रिक भाजप करणार, अशा चर्चांना जाणीवपूर्वक हवा देऊन पक्षाच्या संघटनेत अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत भाजपने काँग्रेसला राजकीय कोंडीत पकडण्याची रणनीती आखली असताना हे चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी काँग्रेसवर आहे.
अलीकडेच प्रुडंट मीडिया आणि गोवा विद्यापीठाच्या व्यवस्थापन शाखेने केलेल्या सर्वेक्षणातून राज्यातील ६५ टक्के जनतेला सरकारमध्ये बदल हवा असल्याचा निष्कर्ष समोर आला. हा निष्कर्ष भाजपसाठी चिंतेचा, तर विरोधकांसाठी आशादायी आहे. मात्र, सरकारविरोधातील जनमत म्हणजे विरोधकांचा विजय, असे समीकरण सरळसोट नाही. या नाराजीचे रूपांतर मतपेटीत करण्यासाठी विरोधकांना एकत्रित रणनीती आखावी लागेल.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सुमारे ३३ टक्के मते मिळाली होती. उर्वरित मते विविध विरोधी पक्षांमध्ये विभागली गेली. विरोधकांच्या मतांचे हे विभाजनच भाजपच्या पथ्यावर पडले. यावेळीही विरोधी मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून होऊ शकतो. मात्र, तृणमूल काँग्रेसची राज्यातील पीछेहाट, आरजीपीमधील फूट आणि आम आदमी पक्षाची घटलेली ताकद पाहता विरोधकांच्या मतांचे विभाजन घडवून आणणारे राजकीय पर्याय मर्यादित झाले आहेत. ही बाब भाजपसाठी चिंतेची ठरू शकते.
अशा परिस्थितीत निवडणुकीच्या तोंडावर तिसऱ्या राजकीय पर्यायाची निर्मिती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध पक्षांमध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले नेते एखाद्या नव्या व्यासपीठावर एकत्र येऊ शकतात. गोवा विकास पार्टीची पुन्हा सुरू झालेली सक्रियता आणि गोवा काँग्रेसच्या नोंदणीचा प्रलंबित प्रश्न या घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे. असा तिसरा पर्याय उभा राहिल्यास त्याचा फटका भाजपपेक्षा विरोधकांनाच अधिक बसू शकतो. त्यामुळे काँग्रेसला या राजकीय हालचालींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत होणारी बैठक महत्त्वाची ठरणार आहे. गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीच्या विरेश बोरकर गटासोबत सुरू असलेल्या आघाडीच्या चर्चेला आता निर्णायक स्वरूप देण्याची गरज आहे. आघाडीबाबत अनिश्चितता कायम राहिल्यास कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होईल आणि निवडणुकीच्या तयारीवर परिणाम होईल.
केवळ भाजपविरोधी वातावरणाचा फायदा मिळेल, या अपेक्षेवर काँग्रेसला विसंबून राहता येणार नाही. पक्षाला विश्वासार्ह उमेदवार, स्पष्ट निवडणूक कार्यक्रम आणि सक्षम संघटनात्मक बांधणी यांची जोड द्यावी लागेल. गोव्याच्या राजकारणात उमेदवाराचे वैयक्तिक जनसंपर्क आणि प्रतिमा निर्णायक ठरतात. त्यामुळे उमेदवारीचे निर्णय वेळेत घेऊन संभाव्य उमेदवारांना जनतेपर्यंत पोहोचण्याची संधी देणे आवश्यक आहे.
जनतेला बदल हवा असेल तर त्या बदलाला सक्षम राजकीय पर्याय देण्याची जबाबदारी विरोधकांची आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी केवळ नाराजी पुरेशी नाही; त्यासाठी विरोधकांमध्ये विश्वास, एकजूट आणि ठोस कृती आवश्यक आहे. दिल्लीतील बैठकीतून काँग्रेसने निर्णायक दिशा ठरवली, तरच भाजपचे चक्रव्यूह भेदण्याची संधी पक्षाला मिळू शकेल. अन्यथा बदलाच्या अपेक्षेने पाहणाऱ्या जनतेचा कौल पुन्हा विभागला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.







