दुचाकींना एलिव्हेटेड कॉरिडॉरवर बंदी
———————————————————————–
गांवकारी,दि. २४(प्रतिनिधी)
पर्वरी येथील उड्डाणपूल आणि गिरी एलिव्हेटेड कॉरिडॉरवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) वाहनचालकांसाठी महत्त्वाची वाहतूक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सूचनेनुसार एलिव्हेटेड कॉरिडॉरवर दुचाकी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, पणजी, म्हापसा तसेच करासवाडा-पेडणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याने यासंबंधीची सूचना जारी केली आहे. वाहनचालकांनी निश्चित केलेल्या मार्गांचाच वापर करावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पणजीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकींसाठी सक्तीचा बाहेर पडण्याचा मार्ग
गिरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या डाव्या बाजूने म्हणजेच पणजीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी टिकलो पेट्रोल पंपापूर्वी बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एलिव्हेटेड कॉरिडॉरवर दुचाकींना बंदी असल्याने दुचाकीस्वारांनी याच ठिकाणाहून बाहेर पडणे बंधनकारक असेल.
मात्र, चारचाकी वाहनांसाठी टिकलो पेट्रोल पंपानंतर उड्डाणपुलावर प्रवेश करण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पणजीच्या दिशेने जाणाऱ्या चारचाकी वाहनांना या प्रवेशमार्गाचा वापर करता येणार आहे.
म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी सर्व्हिस रोड
गिरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या उजव्या बाजूने म्हणजेच म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही स्वतंत्र वाहतूक व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे. म्हापशाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी आरआरएसएम कार्यालयासमोरील बाहेर पडण्याच्या मार्गाचा वापर करून गिरी किंवा म्हापशाकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडवरून पुढे जावे, असे सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
करासवाडा आणि पेडणेकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र प्रवेश
करासवाडा आणि पेडणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी जलसंपदा खात्याच्या (डब्ल्यूआरडी) प्रकल्पासमोर प्रवेशमार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी निश्चित केलेल्या प्रवेशमार्गाचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे.
वाहनचालकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे
पर्वरी आणि गिरी परिसरातील उड्डाणपुलावरील वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांना एलिव्हेटेड कॉरिडॉरचा वापर करता येणार नसल्याने त्यांनी पर्यायी मार्गांची माहिती घेणे आवश्यक आहे.
वाहनचालकांनी चुकीच्या प्रवेशमार्गाचा किंवा बाहेर पडण्याच्या मार्गाचा वापर टाळावा, तसेच निर्धारित वाहतूक व्यवस्थेचे पालन करावे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याने आवाहन केले आहे.





