तातडीने गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी
गांवकारी, दि. १९ (प्रतिनिधी)
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दाबोळी विमानतळावरील आगमनावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या निषेध आंदोलनाप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी काँग्रेसने बुधवारी केली. या आंदोलनामुळे सुरक्षा प्रोटोकॉलचे गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप करत भाजपचे नेतृत्व ‘गुंडगिरी’ला प्रोत्साहन देत असल्याची टीका काँग्रेसने केली.
काँग्रेसचे प्रवक्ते अॅड. अमित पालेकर यांनी भाजप युवा अध्यक्ष तुषार केळकर आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनाचा निषेध केला. आंदोलकांनी शिवीगाळ करत लाऊडस्पीकर, झेंडे व काठ्यांचा वापर केला तसेच विमानतळाबाहेर पडताना खर्गे यांच्या वाहनाला घेराव घातल्याचा आरोप त्यांनी केला. खर्गे हे राज्याचे अतिथी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते असून त्यांना झेड प्लस सुरक्षा आहे, असे पालेकर यांनी सांगितले.
उच्च सुरक्षा क्षेत्रात आंदोलनाला परवानगी कशी?
अतिमहनीय व्यक्तीच्या उच्च सुरक्षा कवचातील परिसरात पोलिसांनी हे आंदोलन होऊ कसे दिले, असा सवाल पालेकर यांनी केला. गोवा पोलिसांनी याबाबत तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी करत दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे काँग्रेसने औपचारिक तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
आंदोलकांनी खर्गे यांच्या वाहनावर तसेच त्यांच्या सुरक्षा पथकाच्या दिशेने झेंडे, काठ्या आणि पुष्पगुच्छ फेकल्याचा आरोपही त्यांनी केला. “सामान्य तरुणांनी परवानगीशिवाय आंदोलन केले तर त्यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल होतात. मग भाजप युवा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा का दाखल केला जात नाही? भाजपसाठी वेगळी ‘न्याय संहिता’ आहे का?” असा सवाल पालेकर यांनी केला.
दामू नाईक युवकांना हेच संस्कार देतात ?
भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक यांनी या घटनेचा निषेध करण्याऐवजी आंदोलकांचे कौतुक केल्याचा आरोप करत, “भाजप गुंडांची फौज तयार करत असून, जनतेला कोणते संस्कार दिले जात आहेत?” असा सवाल पालेकर यांनी केला.
युवा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अर्चित नाईक यांनी आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून रस्त्यावर प्रवेश केला, परवानगीशिवाय लाऊडस्पीकरचा वापर केला आणि खर्गे यांच्या वाहनावर वस्तू फेकल्याचा आरोप केला. बेरोजगारी, अमली पदार्थांचा गैरवापर, तरुणांच्या आत्महत्या आणि कायदा-सुव्यवस्थेसारख्या प्रश्नांवर भाजप युवा मोर्चाने आंदोलन करावे, असे आव्हान त्यांनी दिले.
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी आंदोलनादरम्यान भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप केला. ‘वंदे मातरम्’ वादावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेसला देशभक्तीचे धडे घेण्याची गरज नाही, असे खलप यांनी स्पष्ट केले. सेवा दलाचे मुख्य संघटक राजन घाटे यांनीही काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन करत भाजपकडून देशभक्तीचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नसल्याचे सांगितले.





