प्रदेशाध्यक्ष, खासदार मैदानात, आमदारांनी फिरवली पाठ
पणजी,दि.२३ (प्रतिनिधी)
‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावरून सत्ताधारी भाजप सरकारची नाचक्की करण्यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेल्या विरोधी काँग्रेस पक्षाने आज आपलीच नाचक्की करून घेतली. पक्षाने पुकारलेल्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे वगळता तिन्ही आमदारांनी पाठ फिरवल्याने पक्ष आणि विधीमंडळातील उभी फुट अखेर स्पष्ट झाली.
आझाद मौदानावर एकत्र
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कॅश फॉर जॉब प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी करत ही मागणी पूर्ण न झाल्यास आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केली होती. पक्षाने दिलेल्या मुदतीत सरकारने न्यायालयीन चौकशीकडे कानाडोळा केल्यानंतर अखेर २३ रोजी आंदोलनाची तारीखही निश्चित करण्यात आली. आज प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोवा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस तसेच पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आझाद मैदानावर एकत्र जमले. सरकारी नोकरी देण्यासाठी पैशांच्या या व्यवहारात भाजपचे नेते आणि पदाधिकारी सहभागी असल्याचा आरोप करून याची न्यायलयीन चौकशीबरोबरच सरकारी नोकऱ्यांसंबंधी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली. आझाद मैदानावरून मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनोवरील बंगल्यावर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलकांना पणजी पोलिस स्थानकावरून आगशी पोलिस स्थानकावर नेण्यात आले.
इंडिया आघाडीची पत्रकार परिषद
प्रदेश काँग्रेस पक्षाने आंदोलनाची घोषणा केल्यानंतर लगेच इंडिया आघाडीची एक बैठक फातोर्ड्यात आयोजित करण्यात आली. या बैठकीत काँग्रेसच्या तीन आमदारांसह इतर मिळून सर्व ७ आमदारांनी हजेरी लावली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून न्यायालयीन चौकशीची मागणी करण्यात आली. काल पुन्हा एकदा फक्त तीन आमदारांची पुन्हा एकदा बैठक होऊन त्यांनी पत्रकार परिषदेतून नोकर भरती प्रकरणावरून पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली. एवढे करूनही काँग्रेसचे आमदार तथा इंडिया आघाडीचे नेते काँग्रेसने बोलावलेल्या आंदोलनात सहभागी न झाल्यामुळे प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी आणि विधीमंडळातील दरी आणखी एकदा स्पष्ट झाली.
कार्यकारिणीचे अनेक सदस्य गैरहजर
पक्षाच्या आंदोलनाकडे आमदारांनी पाठ फिरवलीच पण त्याचबरोबर कार्यकारिणीच्या काही सदस्यांनीही गैरहजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. अमित पाटकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा ताबा घेतल्यापासून काँग्रेस पक्षातील एक गट बराच नाराज आहे. हा गट पाटकर यांच्याविरोधात वेगवेगळ्या कुरापती करत असल्याचीही चर्चा आहे. अमित पाटकर यांनी मात्र या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपल्यासोबतीला जे कुणी येतील, त्यांची साथ घेऊन पक्षाचे कार्य जोरात सुरू ठेवले आहे. महाराष्ट्राच्या निकालानंतर पक्ष संघटनेत बदल घडणार असल्याची चर्चाही आता नव्याने सुरू झाली आहे.