वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सरकारची प्रतिमा मलीन
गांवकारी, दि. १० (प्रतिनिधी)
म्हापसा दरोडा प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने बंगळुरू येथून तिघांना ताब्यात घेतल्याची सुवार्ता पसरली असतानाच, कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या हणजूण येथील हॉटेलात चोरी झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. “चोर शिरजोर आणि पोलिस कमजोर” अशी अवस्था निर्माण झाल्याने सरकारची मोठ्या प्रमाणावर नामुष्की होत आहे.
म्हापसा गणेशपुरी येथील एका डॉक्टरच्या घरावर दरोडा पडल्याने दोनापावला येथील दरोड्याच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. पोलिस यंत्रणेचा किंचितही धाक चोरांवर राहिलेला नसल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते. त्यामुळे विरोधकांसह समाजातील विविध घटकांकडून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आमदार मायकल लोबो यांच्या हॉटेलात एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून रोख रक्कम आणि काही सामान चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय वळपे-विर्नोडा येथे एका घरातून सुमारे आठ लाख रुपयांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी कोंडलवाडा आणि तुये येथेही अशाच प्रकारच्या मोठ्या चोरीच्या घटना घडल्या असून, त्या अद्यापही तपासाच्या अधीन आहेत.
चोरी, घरफोड्या, मोबाईल चोरी आणि आता चक्क दरोडे टाकण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने पोलिस यंत्रणा पूर्णतः कोलमडल्याचे चित्र दिसत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
विकास कोसळतोय?
सत्तरी येथील नव्यानेच दुरुस्त केलेल्या शाळेच्या वर्गातील पंखा कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली होती. हे कमी म्हणून की काय, आज शुक्रवार, दि. १० रोजी सांगे येथील उच्च माध्यमिक विद्यालयात फॉल्स सिलिंग कोसळल्यामुळे पाच विद्यार्थी जखमी झाले आहेत. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी मडगाव येथे हलविण्यात आले आहे.
या दोन्ही घटनांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “या सरकारच्या कुठल्याही गोष्टीबाबत जनता सुरक्षित नाही,” अशी टीका काँग्रेस पक्षाने केली आहे.
जेनिटो अडचणीत
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी आज जेनिटो कार्दोझ यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिरदोन येथे २००९ मध्ये घडलेल्या एका प्रकरणात दोन व्यक्तींच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने जेनिटो कार्दोझ यांना दोषी ठरविण्यात आले होते. त्यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने तो निर्णय कायम ठेवत त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे आदेश दिले आहेत.
रामा काणकोणकर प्रकरणात जेनिटो यांना जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, शिरदोन प्रकरणामुळे त्यांच्यावर आणखी एक संकट ओढवले असून, त्यांच्या कोठडीची मुदत काही काळ वाढण्याची शक्यता आहे.





