रामा काणकोणकर प्रकरणाचा तपास उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे
गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी)
गोवा पोलिस खात्यात एक कर्तबगार आणि धाडसी अधिकारी म्हणून ओळख असलेले उपअधीक्षक सुदेश नाईक यांच्याकडे रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाच्या तपासाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात आता एट्रॉसिटी कायद्याचे कलमही जोडण्यात आले आहे.
एकीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांकडून या हल्ल्यामागील मास्टरमाईंडच्या अटकेची मागणी होत असताना, पोलिस मात्र या प्रकरणात राजकीय मास्टरमाईंड नसल्याचा दावा करत आहेत. रामा काणकोणकर यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला असून, त्यात राजकीय मास्टरमाईंडचा उल्लेख कुठेही नसल्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हल्लेखोरांकडून हल्ल्यावेळी व्यक्त झालेले उद्गार हे एका राजकीय नेत्याच्या समर्थनार्थ असल्यामुळे राजकीय मास्टरमाईंडच्या सहभागाचा तपास व्हायलाच हवा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
एट्रॉसिटी कायद्याचे कलम लागू झाल्यामुळे अटकेत असलेल्या आरोपींची अडचण अधिक वाढणार आहे.
सुदेश नाईक यांच्यापुढे आव्हान
पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक यांची पोलिस खात्यात एक कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख आहे. विशेषतः राजकीय दबावाला झुगारून काम करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य उल्लेखनीय आहे. पणजी पोलिस स्थानकावर झालेल्या हल्ल्यावेळी त्यांनी “सिंघम” शैलीत राजकीय नेत्यांना दिलेली अद्दल अजूनही लोकांच्या स्मरणात ताजी आहे. राजकीय नेत्यांच्या मागे हुजरेगिरी करणाऱ्या अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या तुलनेत सुदेश नाईक यांचे वेगळेपण जनतेला भावते.
रामा काणकोणकर प्रकरणाचा तपास त्यांच्या हाती देण्यात आल्यामुळे ते निश्चितपणे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या मास्टरमाईंडचा शोध लावतील, तसेच वाढत्या गुंडगिरीचा निपटारा करतील, अशी जनतेची अपेक्षा आहे.
जेनिटोच्या जामीन अर्जावर १० रोजी सुनावणी
रामा काणकोणकर हल्ला प्रकरणातील मुख्य सूत्रधार जेनिटो कार्दोझो याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्याच्या या अर्जावर शुक्रवार, दि. १० रोजी सुनावणी होणार आहे. जेनिटोने स्वतः हा हल्ला आपण घडवून आणल्याची कबुली पोलिसांना दिल्यामुळे त्याला जामीन मिळणार की नाही, याबाबत अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.





