काँग्रेसच्या युवा शक्तीची कसोटी

अन्यथा ही युवा रत्ने फक्त राजकीय संग्रहालयात ठेवून त्यांचे प्रदर्शन मांडले जाईल. जर पक्षाने त्यांना सक्रिय भूमिका दिली, तर चित्र बदलण्यास अजिबात वेळ लागणार नाही.

आम आदमी पार्टीचे माजी गोवा प्रदेशाध्यक्ष एड. अमित पालेकर यांचा काँग्रेस प्रवेश धडाक्यात पार पडला. या सोहळ्याला प्रदेशाध्यक्षांपासून ते विरोधी पक्षनेते, तिन्ही आमदार, प्रभारी, सहप्रभारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. फक्त दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस अनुपस्थित राहिले. मात्र, त्यांच्या विजयासाठी पालेकर यांच्या अध्यक्षतेखालील आप आणि गोवा फॉरवर्ड पक्षाने काँग्रेससोबत एकत्र काम करून विजय मिळवून दिला होता, हे विसरता येणार नाही.
अमित पालेकर या रूपाने काँग्रेसला एक उच्चशिक्षित, बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणारा, सर्व भाषांवर प्रभुत्व असलेला आणि हुशार युवा कार्यकर्ता मिळाला आहे. याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. फोंड्यातून डॉ. केतन भाटीकर आणि आता सांताक्रुझातून अमित पालेकर या दोन सुशिक्षित युवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश ही सकारात्मक लक्षणे आहेत.
आजचा युवा काँग्रेसपासून दूर गेलेला आहे. त्याला पुन्हा पक्षाशी जोडणे हे मोठे आव्हान आहे. केवळ सत्ता किंवा उमेदवारीच्या आकर्षणाने नव्हे, तर काँग्रेसच्या विचारधारेने युवक पक्षाशी जोडले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाजप आणि त्याच्याशी निगडित संघटनांनी देशभरात धार्मिक द्वेष, खोटा प्रचार आणि आभासी चित्र उभे केले आहे. हे रोखण्यासाठी युवाशक्तीचा सहभाग आवश्यक आहे.
सुदैवाने काँग्रेसकडे केंद्रीय स्तरावर राहुल गांधी, राज्य स्तरावर अमित पाटकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांसारखे तडफदार युवा नेते आहेत. ही युवा फौज भाजपच्या सत्तेला आव्हान देऊ शकते, असा आशावाद निर्माण झाला आहे.
गोव्यातील राजकारण हे नातेसंबंध, परिचय आणि मित्रपरिवाराशी जोडलेले असल्याने कुणालाही थेट शत्रू बनवणे कठीण जाते. त्यामुळे संशय घेण्याची वृत्ती अधिक बळावते. पालेकर यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या भूतकाळाचा संदर्भ देऊन टीका होईल, पण पक्षाने पुढे पाहून दिशा ठरवणे गरजेचे आहे.
काँग्रेसने निष्ठा आणि नीतिमत्तेचा गोंधळ निर्माण करण्याऐवजी युवकांना जबाबदारी दिली पाहिजे. अन्यथा ही युवा रत्ने फक्त राजकीय संग्रहालयात ठेवून त्यांचे प्रदर्शन मांडले जाईल. जर पक्षाने त्यांना सक्रिय भूमिका दिली, तर चित्र बदलण्यास अजिबात वेळ लागणार नाही.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हे स्वतः युवा नेते आहेत. त्यांनी पक्षातील या सगळ्या युवा फौजेला सोबत घेऊन संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्षाची घट्ट बांधणी करण्याची गरज आहे. हे करत असताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची साथ घेतली तर ते अधिक प्रभावी ठरू शकेल. पक्षातील अंतर्गत हेवेदावे आणि वाद यांना तूर्त मुठमाती देण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षात अजूनही काही घटक विरोधकांनी पेरले आहेत जे कायम ही अंतर्गत ठिणगी पेटत राहावी यासाठी कार्यरत असतात. ही ठिणगी बुजवून पक्षाने एकजुटीची आणि एकसंघतेची मशाल पेटवण्याची गरज आहे.
प्रदेश युवा काँग्रेसची टीम अज्ञातवासात गेली आहे. या टीमला नवसंजीवनी देण्याची गरज आहे. या टीमसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्याची गरज आहे. सुनील कवठणकर यांसारख्या युवा नेतृत्वाला पक्षाने अधिक मोकळीक आणि संधी देण्याची गरज होती. महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. प्रतिक्षा खलप ह्या देखील युवा नेत्या आहेत. अशा तऱ्हेची कणखर युवा टीम असेल तर पक्षाला सत्ता खेचून आणणे अजिबात कठीण नसेल.
आता राहिली प्रामाणिकता आणि निष्ठा. प्रत्येकाजवळ या दोन्ही गोष्टी आहेत असे समजूनच पुढे जाणे रास्त ठरेल. एकमेकांवर संशय घेण्यात काहीच अर्थ नाही. शेवटी आपले भवितव्य हे आपले कर्मच ठरवणार आणि आपले कर्म हीच आपली समाजातली ओळख बनणार. काही गोष्टी या नियतीवर सोडून देण्यातच अधिक चांगले असते.
राज्यातील भाजपची सत्ता उलथवून लावणे इतकेच नव्हे तर गोव्याचा सांभाळ आणि गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी काँग्रेसकडे योग्य नेतृत्व आहे ही सकारात्मक जाणीव जनतेत निर्माण झाली तर बदल शक्य आहे हे निश्चित.

  • Related Posts

    १६१ दिवसांच्या लढ्याला विसावा

    पण कारापूरने गोव्याला एक संदेश दिला आहे, सत्ता मोठी असू शकते, पैसा मोठा असू शकतो; मात्र आपल्या मातीसाठी उभा राहिलेला सामान्य माणूस त्याहून मोठा असतो. १६१ दिवसांनंतर कारापूर-सर्वण येथील हाऊस…

    संयमाची परीक्षा घेऊ नका !

    आता राजकीय पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. गोव्याच्या बाजूने उभे राहायचे की गोव्याच्या लुटीच्या बाजूने ? गोवा आज निर्णायक वळणावर उभा आहे. एका बाजूला विकासाच्या नावाखाली जमिनींचे व्यवहार, मोठमोठे प्रकल्प, काँक्रीटची…

    You Missed

    1526–2026: 500 Years of the Foral

    1526–2026: 500 Years of the Foral

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…: गोमंतकीय भूमीपुत्राचे गणरायाला भावनिक साकडे

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    गणा धाव रे… गोव्याला पाव रे…

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    Kejriwal’s Goa Visit Sparks Political Buzz; Major Announcement Today at 3 PM

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    आरजीपीच्या नव्या राज्य कार्यालयाचे उद्घाटन

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’

    ‘गोवा विकू देणार नाही’; काँग्रेसची २७ दिवसीय ‘गोंय राखण यात्रा’