
मी जो हिंदू धर्म पाळतो आणि तुला मी जो शिकवलाय, त्या धर्माचा जाती व्यवस्था भाग नाही, लोकांना श्रेष्ठ कनिष्ठ मानणे हा भाग नाही.”
“बाबा, तुम्हाला असे वाटत नाही का की आपला धर्म मुळातच विषमतावादी आहे? गीतेत भगवान म्हणतात की मीच वर्ण तयार केले. देवानेच जर लोकात विषमता तयार केली असे आपला देव स्वतःच म्हणत असेल तर तो धर्म विषमतावादी नाही का झाला?” मी विचारले.
“तू अर्धेच वाचतोस. वर्ण आपण केले असे भगवंतांनी म्हटले आहे, पण वर्णावर्णात उच्चनीच भेद माना असे म्हटलेले नाही. उलट त्याच गीतेत भगवान सांगतात की जो माणूस विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, चांडाळ, गाय, हत्ती, कुत्रा या सगळ्यांकडे समानतेने पाहतो तोच तत्त्वज्ञ, ” बाबा म्हणाले.
“पण बाबा, ही फक्त तात्विक चर्चा झाली. धार्मिक माणसे सर्वांकडे समतेने कुठे पाहत होती? ब्राह्मण आणि चांडाळ यांना समतेने कोण वागवत होते?” मी विचारले.
“तुला मागच्या महिन्यात टीव्हीवर लागलेला ‘आदी शंकराचार्य’ हा सिनेमा आठवतो का? त्या आदी शंकराचार्यांच्या जीवनातील एक प्रसंग तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा आहे,” बाबा म्हणाले. “कोणता?” “हा प्रसंग शंकराचार्य काशीत राहत असतानाचा आहे. एका दुपारी आपल्या शिष्यांसमवेत ते गंगा स्नानाला जात होते. त्यावेळी समोरून एक चांडाळ जातीचा माणूस येत होता. त्याला बघून शंकराचार्य म्हणाले, ‘दूर हो’. चांडाळ ही अस्पृश्य मानण्यात येणारी जात होती. आणि त्यावेळपर्यंत शंकराचार्य जातिभेद मानत होते. म्हणून त्याचा आपल्याला विटाळ होऊ नये म्हणून त्यांनी त्याला ‘दूर हो’ म्हटले. त्यावर त्या चांडाळाने त्यांना विचारले, ‘कोणी कोणापासून दूर व्हावे? जडद्रव्याने जडद्रव्यापासून की चैतन्याने चैतन्यापासून? गंगेच्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब असो की माझ्या घराजवळच्या नाल्यातील पाण्यात पडलेले प्रतिबिंब असो, ती दोन्ही प्रतिबिंबे एकाच सूर्याची असतात ना? सोन्याच्या भांड्यातील आकाश आणि मातीच्या मडक्यातील आकाश एकच असते ना? ब्रम्हदेवापासून शुल्लक मुंगीपर्यंत एकच चैतन्य विराजमान असते ना आचार्य? मग अजूनही तुम्हाला हा ब्राह्मण आणि तो चांडाळ हा भ्रम का वाटतो?’ त्याच्या या प्रश्नांनी शंकराचार्य भानावर आले. त्यांनी चक्क त्या चांडाळाला गुरू मानत त्याच्या पाया पडले. त्यांनी त्याची स्तुती गात पाच श्लोक रचले.
ते पाच श्लोक ‘मनीषा पंचक’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ही गोष्ट काय सांगते? अद्वैत वेदांताचे तत्त्वज्ञान मानणार्या माणसाने व्यावहारिक जीवनात देखील जातीय भेदाभेद मानू नये. एवढेच नव्हे तर कोणताच भेद मानू नये. जे जे लोक जातीय भेदभाव किंवा इतर कोणताही भेदभाव मानतात, ते धार्मिक नाहीत, हे लक्षात ठेव. इतरांचे कशाला, मी स्वतःच कट्टर धार्मिक आहे, हे तू जाणतोस. मी रामकृष्ण परमहंसांची भक्ती करतो. स्वामी विरेश्वरानंद माझे गुरू आहेत. माझ्या वर्तनात तुला कधी विषमता दिसली का? मी कधी जातीप्रथेचे समर्थन केलेय का? धर्म हा चित्तशुद्धीचा मार्ग आहे. दुसऱ्यांना तुच्छ लेखून चित्तशुद्धी कशी होईल? मी जो हिंदू धर्म पाळतो आणि तुला मी जो शिकवलाय, त्या धर्माचा जाती व्यवस्था भाग नाही, लोकांना श्रेष्ठ कनिष्ठ मानणे हा भाग नाही.”
– डॉ. रुपेश पाटकर
8q6u4p