
गोवा मुक्ती चळवळीतील पहिला हुतात्मा बाळा राया मापारी यांची आज १८ रोजी पुण्यतिथी. त्यांचे स्मरण गोव्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यानिमित्त….
गोवा मुक्ती लढ्यातील शेवटच्या निर्णायक पर्वाचा इतिहास रोमांचक आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या व पोर्तुगीज सत्तेविरुद्ध प्राणपणाने लढलेल्या राष्ट्रप्रेमींचा तो इतिहास आहे. १९४२ नंतर भारतातील चले जाव चळवळीला आलेले यश-अपयश यांची शहानिशा करण्याची पाळी क्रांतिकारी विचारवंतांवर आली. पुढील रणनिती आखण्यासाठी क्रांतिकारी विचारवंत कामाला लागले होते. विसावा घेण्याचे ते दिवस नव्हतेच मुळी. डॉ. राम मनोहर लोहिया, डॉ. टी.बी. कुन्हा, ज्युलियाँव मिनेझीस यांच्या गाठीभेटी गोव्याबाहेर तसेच जर्मनीतही होत होत्या पाश्चात्य विचारसरणीतले स्वातंत्र्य, पूर्ण स्वातंत्र्याच्या जोरावर समता व विश्व बंधुत्व आणण्यासाठी परकीय गुलामगिरीच्या बेड्या तोडणे अपरिहार्य होतेच, पण त्यासाठी पोषक वैचारिक बैठक घालून देण्याची जबाबदारीही होती. त्या जबाबदारीच्या जाणिवेतून ज्युलियाँव मिनेझीस यांच्या घरी लोहिया उतरले होते. ते पर्यटक म्हणून आले नव्हते.
गोव्यातील तत्कालीन सामाजिक, राजकीय व बौद्धिक परिस्थिती पाहून ते अचंबित झाले. आपल्या मित्रांसह पोर्तुगीज सत्तेविरुद्ध जलद कृती आखण्याचा बेत ते करत होते. पण आमच्याकडून हे होणार नाही, कसे शक्य आहे, त्यासाठी किमान काही महिने लागतील, एवढे म्हणता म्हणता गोंयकार ‘पॅज’ आहेत, पर्यंत मजल गेल्याची नोंद सापडते. डॉ. लोहियांना पॅज शब्दाचा अर्थ गोंयकारांकडून कळला तेव्हा ते संतापलेच. पॅज यानी निकम्मे? असा त्यांचा खडा सवाल होता. ते काही नाही, १८ जूनला मडगावात सभा होणार म्हणजे होणार, या इराद्याने त्यांनी सहकाऱ्यांना पत्र लिहून सभेसाठी बोलावले. मंगळवार १८ जून १९४६ च्या संध्याकाळी जे काय घडले त्या दिवसाची पवित्र आठवण म्हणून आपण हा दिवस गोवा क्रांती दिवस म्हणून साजरा करतो. ज्यांचे स्मरण होते, त्यांना मरण नाही, असे आमचे लोककवी डॉ. मनोहरराय सरदेसाय म्हणतात.
डॉ. लोहियांच्या मडगावच्या सभेसाठी वर्तमानपत्रांतून झालेली जागृती, खास मित्रांना झालेला पत्र व्यवहार याव्यतिरिक्त एक जन संवेदना जागविण्याचे कार्य बेचाळीसच्या चलेजाव चळवळीतल्या काही क्रांतिकारी मास्तरांनी केले होते. अस्नोडा, शिरगांव परिसरात लोकाश्रयावर चालणाऱ्या मराठी शाळांचे शिक्षक क्रांतिकारी चळवळीतून आलेले. भारत मुक्तीचा आणि पर्यायाने गोवा मुक्तीचाही ध्यास घेतलेल्या या मास्तरांनी मराठी प्राथमिक शिक्षण व मराठी नाटक या माध्यमातून राष्ट्रचेतना जागविण्याचे पोषक कार्य सुरू ठेवले होते. डॉ. लोहियांच्या सभेसाठी हे वातावरण प्रेरणादायी ठरले. त्यातूनच तळागाळातील बहुजन समाजातील कुमार, युवकांना राष्ट्रीयत्वाचे धडे देताना पोर्तुगीज जुलमी सत्तेविरुद्ध लढण्याची प्रेरक चेतना मिळाली. त्याचा परिपाक म्हणून बाळा राया मापारी या अस्नोड्यातील तरुणानेही आझाद गोमंतक दलात भरती होऊन सशस्त्र क्रांतीसाठी कंबर कसली. घरचा कुठलाही आर्थिक, बौद्धिक वारसा, संपदा नसतानाही मास्तरांच्या राष्ट्रीय विचारांच्या चिथावणीने निर्धास्तपणे गोवा मुक्तीच्या होमखंडात उडी घेतली. भाटकरशाहीची शोषण परंपरा, दोनवेळच्या जेवणाचीही मारामार, पोर्तुगीज सत्तेला चढलेला माज, पोर्तुगीज सत्तेशी असलेले स्वार्थी लोकांचे लांगुलचालन अशा कित्येक प्रश्नांना सामोरे जाताना स्वयंभूपणाची जाणीव बाळा राया मापारी यांच्यात निर्माण झाली. आझाद गोमंतक दलाचे कार्यकर्ते म्हणून रण माजविणाऱ्या या युवकांनी पोर्तुगीज शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्थेलाच सुरुंग लावला. त्यासाठी लागणारे प्रशिक्षण गोवा कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमाभागात जाऊन घेतले व नियोजनबद्ध रितीने पोर्तुगीजांचे तळ, चौक्या लुटू उद्ध्वस्थ करण्याचेही निर्भीड काम हाती घेतले. पोर्तुगीज अशा लोकांना तॅरोरीश्त संबोधायचे.
१९४६ ची क्रांतिकारी सभा झाल्यानंतर आलेली थोडीशी मरगळ झटकून या क्रांतिकारी लोकांनी समाजात जनजागृती निर्माण केली. हे करताना मये, अस्नोड्यातील गावांत विविध प्रकारे पोर्तुगीज सत्तेविरुद्ध स्पष्टपणे निषेध तर झालाच, पण त्यावेळच्या काही घटनाही ऐतिहासिक होत्या. त्यात शेतकऱ्यांचा उठाव हा मातीशी नातं सांगणारा होता. मयेतर फिरंग्यांची राजवट ही भूमिपुत्रांना पिक पिकावळीच्या बाबतीतही छळणारी होती. बाळा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फिरंग्यांचे भाट म्हटल्या जाणाऱ्या मयेतील आंबे जबरदस्तीने झाडावरून काढून लोकांना वाटले. जुलूमशाही आणि गुलामगिरी विरुद्ध उठवलेला तो मुक्तीचा आवाज होता. मये, अस्नोडा परिसरातील फिरंगी भाटकारशाही मोडीत काढताना सामाजिक शोषणाविरुद्ध त्यांनी लढा दिला. स्वाभिमान जागृत ठेवला. भाटकारशाही प्रवृत्तीविरुद्ध जाहीर आवाज उठवला. मये गावात भजनाच्या माध्यमातूनही स्वातंत्र्य जागृतीची मोहीम स्थानिक तसेच परिसरातील भजन कलाकारांनी राबवली. भक्तीतून राजकीय मुक्तीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.
भारत सरकारने पोर्तुगीज गोव्याची केलेली आर्थिक नाकाबंदी ही काही स्वार्थी लोकांसाठी (कदाचित काळाबाजार करण्यासाठी) फायद्याची ठरली. त्या वृत्तीतून लाचखोरी, खुशामती, चहाड्या, खबर पोहोचविणे, फितुरी करणे अशा स्थानिक प्रवृत्तीमुळेही निःस्वार्थीपणे वावरणाऱ्या सशस्त्र क्रांतिकारी लोकांना बऱ्याच कष्टांना तोंड द्यावे लागले, अस्नोडा येथील पोलीस चौकी लुटून शस्त्रांचा उपयोग स्वातंत्र्यासाठी करणाऱ्या बाळा राया मापारी या निर्भीड युवकाला पोर्तुगीजांच्या अमानुष छळाला तोंड द्यावे लागले. पोर्तुगीज सत्ता व स्थानिक भाटकारशाहीने चालविलेला छळ, भूक, उपासमार, प्रचंड गरीबी, अशा कित्येक समस्यांना तोंड देत गोवा मुक्तीचा लढा देणाऱ्या बाळा राया मापारी यांचा अमानवी छळ पोर्तुगीजांनी केला. जय हिन्द, भारत माता की जय, या जोडीलाच मिळालेली श्री लईराईमाता की जय.. ही आदिमायेची शक्ती या मागे होती. तरीही फितुरीने दगा दिलाच. मये, शिरगांव, अस्नोडा, शिवोली भागात त्यांनी दहशत माजवली. क्रांतिकारी दलाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून त्यांनी शेतकऱ्यांचा उठाव केला. मोहन रानडेंसारख्या जाज्ज्वल्य राष्ट्रप्रेमींची साथ त्यांना होतीच. शिवोली गावातल्या त्यांच्या केंद्रातूनही त्यांच्या कारवाया सुरूच होत्या. शिवोलीत जीवन मुक्त महाराजांनी स्वातंत्र्याची ‘होमखंड’ परंपरा निर्माण केलेली. फितुरीमुळे बाळा राया मापारी पकडले गेले, पण बाळाचा स्वाभिमान, देशनिष्ठा याला तोड नव्हती. अमानुषपणे त्यांना बेदम मारहाण झाली. ओळख पटण्या पलीकडे त्याना मारण्यात आले शेवटच्या क्षणी सुद्दा त्यांनी आपले तोंड उघडले नाही तसेच आपल्या सहकाऱ्यांची नावे उघड केली नाही. अमानुश मारहीणीक बाळा राया मापारी याना हौतात्म्य प्राप्त जाले. बाळा राया मापारी यांची पत्नी इंद्रावतीवर त्यांचा मोठा घाला होताच. गोव्याच्या मुक्ती लढ्यातील शेवटच्या निर्णायक पर्वातील बाळा राया मापारी यांचे हौतात्म्य हे गोव्याच्या मुक्तीचळवळीतील इतिहासाचे प्रेरणादायी पर्व आहे. पहिला हुतात्मा बाळा राया मापारी यांचे स्मरण हे गोव्यासाठी प्रेरणादायी आहे. बाळा राया मापारी यांची कन्या शिवोली येथे अत्यंत गरीब अवस्थेत जीवन सारते आहे. त्यांच्या कमवत्या मुलाचे काही महिन्या पुर्वी आकस्मीक निधन झाले. सून व लहान नात असा हा परिवार जिवनाशी संघर्श करीत आहे. अस्नोडा येथील बगल रस्त्याला हुतात्मा बाळा राया मापारी यांचे नाव दिलेले आहे. बाळा राया मापारी यांचे निरंतर स्मरण व्हावे म्हणूनही काही करता येईल का?
• राजधानीत बाळा राया मापारी यांचा पुतळा असावा.
• बाळा राया मापारी यांचे कायम स्वरूपी स्मारक असावे.
• बाळा राया मापारी यांचे विधानसभेत तैलचित्र लावावे.
• सगळ्या माध्यमांच्या प्राथमीक अभ्यासक्रमात बाळा राया मापारी यांचा पाठ असावा.
• गोवा पुराभीलेख संग्रहालयात मुक्ती लढ्याचा इतिहीस संग्रहीत असावा.
• बाळा राया मापारी यांची जयंती/ पुण्यतिथी सरकारी पातळीवर व्याकप स्वरूपात साजरी व्हावी.
- डॉ. प्रकाश वजरीकर