नेतृत्वाच्या विषयावरून तीन दिवसांत फतवा
गांवकारी, दि. ९ (प्रतिनिधी) – पणजी
काँग्रेस पक्षाच्या गोव्यातील सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी काल समाजमाध्यमांवर टाकलेल्या दोन पोस्टमुळे पक्षातील अंतर्गत कलहाबाबत संभ्रम निर्माण झाला असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीही पसरली आहे. पक्षातील मतभेद मिटवून एकी साधण्याऐवजी प्रभारीच जर आगीत तेल ओतू लागल्या, तर काँग्रेसचे भवितव्य धोक्यात येईल, असे निष्ठावान कार्यकर्ते आता उघडपणे बोलू लागले आहेत.
दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी गोव्यातील नेतृत्वाकडे लक्ष दिल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया डॉ. निंबाळकर यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. मात्र, ही प्रतिक्रिया उपहासात्मक टीप्पणी तर नव्हे का, असा सवाल काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. पक्षातील दोन्ही गटांना एकत्र आणण्यासाठी प्रभारी आणि सह-प्रभारीकडून कोणतेही ठोस प्रयत्न झालेले नाहीत. कदाचित त्यांनी हा विषय दिल्लीतील नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असावा, परंतु दिल्लीतील नेत्यांनी त्यांना वेळ दिला नसावा. त्यामुळेच आता दिल्लीतील नेत्यांनी गोव्यासाठी वेळ दिला, याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे काय, असा प्रतिसवाल काँग्रेसजन करत आहेत.
या राजकीय जेवणावळीचे रहस्य काय?
दिल्लीतील बैठकीकडे राज्यातील सर्व काँग्रेसजनांचे लक्ष लागून राहिले असताना, डॉ. निंबाळकर यांनी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार कॅप्टन विरियोतो फर्नांडिस, आमदार कार्लुस फरैरा आणि माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासोबत दुपारी जेवण घेतानाचा फोटो समाजमाध्यमांवर टाकला. या फोटोला “राजकीय जेवण” असे संबोधले गेल्यामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. या बैठकीचा नेमका निष्कर्ष काय लागला, हे स्पष्ट न करता अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जात असतील, तर कार्यकर्त्यांनी त्याचा अर्थ काय घ्यावा, असा प्रश्न विचारला जात आहे.
गोव्यातील नेत्यांनी हायकमांडसोबत “वन टू वन” चर्चा केली, असा दावा डॉ. निंबाळकर यांनी केला आहे. मात्र, त्याच संदेशात त्यांनी नेत्यांनी काय बोलले यावर अप्रत्यक्ष भाष्य केले आहे. जर चर्चा “वन टू वन” होती, तर त्याचा तपशील डॉ. निंबाळकरांना कसा कळला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रभारी माणिकराव ठाकरे आणि आमदार एल्टन डिकोस्ता हे कालच्या बैठकीत उपस्थित नव्हते, असे फोटोंवरून दिसून येते.
काँग्रेस पक्षाने आता ही थट्टा थांबवून प्रत्यक्ष कामाला जोमाने सुरुवात करायला हवी. जोपर्यंत लोकांचा विश्वास संपादन केला जात नाही, तोपर्यंत सत्ता काबीज करणे कठीण आहे. पक्षाच्या नेतृत्वाने कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना कामाला लावणे गरजेचे आहे, असे मत आता व्यक्त होत आहे.






