एका शिपायाचे कारनामे

हा शिपाईच म्हणे पेडणे जलस्त्रोत खाते चालवतो. या शिपायाची ताकद इतकी की तो जिथे बोट ठेवेल तिथे म्हणे वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून सही करतात.

जनतेला वेगवेगळ्या इव्हेंट, कार्यक्रम, मेळावे आदींमध्ये व्यस्त ठेवून सरकारी तिजोरीवर नियोजित डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे. जनतेच्या तिजोरीला मोठे भोक पडले असून त्यातून विकासकामांच्या नावाने हा पैसा खाजगी खिशांत भरण्याचा धंदाच सुरू आहे. विशेष म्हणजे या धंद्यातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची ओळख अमुक मंत्र्यांचा माणूस किंवा थेट मुख्यमंत्र्यांचा माणूस अशी करून मोठ्या दिमाखात वावरत आहे.
आता हे लोक खात्याचे वरिष्ठ अधिकारी, मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्या अपरोक्ष हे सगळे करत असावेत, असे अजिबात म्हणता येणार नाही. पण राज्याची तिजोरी पोखरण्याची ही वरून खालपर्यंतची वाळवी तयार झाली आहे की काय, असा प्रश्न पडावा.
विषय होता फक्त पेडणे तालुक्यातील तुये येथे खाजन शेतीचे नाले उपसण्यासाठीच्या जलस्त्रोत खात्याच्या निविदांचा. ही कामे न करताच कंत्राटदाराला पूर्ण रक्कम फेडण्यात आली. हे कसे घडले याचा शोध घेतला असता, प्रत्येक गावांत अशी कामे काढून केवळ नाममात्र ती कामे करून किंवा अनेक प्रकरणांत कामे पूर्ण झाली नसतानाही रक्कम कंत्राटदाराला फेडण्यात आल्याची प्रकरणे समोर येत आहेत.
विशेष म्हणजे पेडण्यातील ही सगळी कामे या खात्याचा एक शिपाई स्वतः करत आहे. हा शिपाईच म्हणे पेडणे जलस्त्रोत खाते चालवतो. या शिपायाची ताकद इतकी की तो जिथे बोट ठेवेल तिथे वरिष्ठ अधिकारी डोळे बंद करून सही करतात. दोन हजारांचा शर्ट आणि व्हडूलॅण्डचे बूट घालणारा हा शिपाई पेडणेतील जलस्त्रोत खात्याचा शहेनशाहच बनला आहे.
प्रारंभी हा शिपाई एका माजी उपमुख्यमंत्र्यांचा पक्का कार्यकर्ता. त्यांच्या सहवासातच त्याने राजकारण जवळून पाहिले. त्याच उपमुख्यमंत्र्यांनी मंत्री असताना त्याला जलस्त्रोत खात्यात शिपायाची नोकरी दिली. यानंतर या महाभागाने एका माजी जलस्त्रोत मंत्र्यांकडे संधान साधले आणि त्याच्याकडे कामे करू लागला. तिथे त्याने चांगला जम बसवला.
कंत्राटदार, अभियंते यांच्याशी चांगली मैत्री जमवली. वेगवेगळी कामे तयार करून त्यांची निविदा तयार करायची आणि ही कंत्राटे वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या नावे आपणच घ्यायची. या कंत्राटदारांना त्यांचा वाटा दिला जातो. विविध अधिकाऱ्यांना त्यांची बक्षिसी पाठवली जाते. ही बक्षिसी थेट मुख्यालयापर्यंत पोहोचवली जाते, जेणेकरून त्याला कुणीही हात लावू शकत नाही. एवढे त्याने आपले राजकीय वजन तयार केले.
या शिपायाचा आत्मविश्वास एवढा की तो कुणालाही जुमानत नाही. त्याचा एक दरारा खात्यात तयार झाला आहे.
सध्याच्या परिस्थितीत पेडण्याच्या एका आमदाराने त्याला आपल्याकडे ठेवले आहे. या शिपायाचे काम हे केवळ अशी कामे तयार करून द्यायचे. आता हा शिपाई आणि त्याचे सवंगडी हे आमदाराच्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही बंगल्यावर वारंवार दिसतात, अशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर दिसतात म्हटल्यावर त्याचे लागेबांधे अगदी वरपर्यंत आहेत, ही लोकांची भावना बनली आहे.
विशेष म्हणजे सगळेच पंच, सरपंच या शिपायाला घाबरून असतात. जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांना या शिपायाच्या कारनाम्यांची काहीच माहिती नाही, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनाही हा शिपाई माहित नाही, असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.
आता जलस्त्रोत खात्याचा हा शिपाई आणखी कुणाकुणाचा कमिशन एजंट म्हणून काम करतो याचा शोध घेतला तर सरकारी भ्रष्टाचाराची एक नवीनच कहाणी समोर येईल, हे मात्र नक्की.

  • Related Posts

    चटका लावणारी एक्झिट

    डॉ. केतन भाटीकर यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनाने फोंडा तालुक्यासह संपूर्ण गोवा हळहळला आहे. एका तरुण, ऊर्जावान, समाजाभिमुख आणि राजकीय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नेतृत्वाचा असा अचानक अंत…

    परवानगीचेही राजकारण

    ही केवळ परवानगी नाकारण्याची बाब राहिलेली नाही; तर लोकशाहीतील असहमतीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न म्हणून ती अधिक गंभीर बनत चालली आहे. गोव्यात सध्या एक विचित्र आणि धोकादायक वातावरण तयार होताना दिसत…

    You Missed

    15/05/2026 e-paper

    15/05/2026 e-paper

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    ‘नीट युजी २०२६’ फेरपरीक्षेची तारीख जाहीर

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    चटका लावणारी एक्झिट

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    Goa Loses Young Leader: Dr. Ketan Bhatikar Dies After Alleged Snakebite at Anmod

    14/05/2026 e-paper

    14/05/2026 e-paper