७५ – गोमंत गौरव श्री रमेश गांवस सर वाढदिवस विशेष-७५

आपल्या गोव्याचे सुपुत्र, राष्ट्र सेवा दल गोव्याचे कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात आघाडीवर असलेले कार्यकर्ते, समता आंदोलन व सामाजिक परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते, पर्यावरण रक्षक, जलस्त्रोत संवर्धक, सन २००६ च्या गोवा राज्य व २००७ च्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत शिक्षक, गेल्या वर्षीच्या दै. लोकमत पर्यावरण पुरस्काराचे मानकरी, निस्वार्थी समाज कार्यकर्ते गोमंत गौरव श्री रमेश गांवस सरांच्या पंच्चाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा.

सत्य व पर्यावरणासाठीचा संघर्ष: रमेश गांवस यांची वाटचाल

निसर्ग आणि सजीव यांच्यात सहजीवी नाते आहे; हे तत्व मान्य करून प्रत्येक सजीवाची संरचना उत्क्रांत होत गेली. मानव आणि निसर्ग यामध्ये समतोल राखणे हे सतत गतिमान असणाऱ्या माणसाकडून अपेक्षित आहे. परंतु, जेव्हा स्वार्थापोटी या तत्वाला बगल दिली जाते आणि मानवपुरस्कृत निसर्गविध्वंस आपल्या सीमा ओलांडतो, तेव्हा परम प्रकृतीच्या रक्षणासाठी रमेश गांवस सरांसारख्या साहसी, संवेदनशील, ध्येयवादी आणि प्रज्ञावंत माणसाला पुढे यावे लागते.
कधीकाळी गोव्यात अनिर्बंधपणे फैलावणाऱ्या खाण उद्योगाचे दुष्परिणाम, जलजीवन आणि वाढते प्रदूषण अशा गंभीर पर्यावरणीय विषयांवर वावरत, व्यापक पातळीवर न्यायालयीन तसेच सामाजिक स्तरावर यशस्वी लढा देत, गांवस सरांनी नेहमीच या विरोधात आपला बुलंद आवाज उठवला आहे.
१९६३ पासून आजतगायत गोव्यातील पुढारी खाण उद्योगाबाबत गाफील राहिल्यामुळे गोव्याचे झालेले प्रचंड नुकसान आणि निसर्गरम्य गोवा टिकवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांचा विनाश, वाढती लोकसंख्या आणि प्रकल्पांमुळे उद्भवणारे जलसंकट यांचे विदारक चित्र गांवस सरांनी आपल्या विपुल लेखनातून प्रभावीपणे मांडले आहे.
वाढत्या जलप्रदूषणामुळे नदींना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही ठिकाणी नदीपात्रात सोडलेले सांडपाणी आणि अमर्याद प्रदूषित पाणी नदीपात्रात वाहून जाण्यामुळे होत असलेल्या हानीवर कोणतेही निर्बंध नाहीत. एकेकाळी फॉर्मेलीनच्या प्रदूषणामुळे खवदळलेला गोवा अशा प्रकारच्या “स्लो पॉयझन”बाबत शांत कसा? असा खडा सवाल गांवस सरांनी वेळोवेळी उपस्थित केला आहे.
म्हादई नदी आणि पाणी संकटामुळे होणारे संभाव्य धोके, ज्यामध्ये म्हादई अभयारण्य, या नदीवर अवलंबून असणारे सहा तालुके, १९४ गावं आणि ४३,५०० हेक्टर वनविभागाचा समावेश होतो, यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गांवस सरांनी अपार प्रयत्न केले आहेत.
देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन म्हणजे रमेश गांवस! देशभक्ती म्हणजे केवळ गंगा स्नान नाही किंवा देशातील जमिनीवर नुसते प्रेम नाही. देश म्हणजे या देशातील लोक, त्यांचे सुखदुःख, नद्या, जलजीवन, भूमी, वायू, वृक्ष, पशुपक्षी—या सर्वांचे संरक्षण व विकास हीच खरी देशभक्ती, जी रमेश गांवस सरांच्या नसानसातून वाहते.
शोषणवादी लुटारू मनसुबे बाळगणाऱ्यांपासून देशाला वाचवायचे असेल तर फक्त भाषणांनी उपयोग नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि निसर्गाबद्दल संवेदना असणे आवश्यक आहे. व्यापक बदलासाठी एखाद्याला स्वतःला झोकून द्यावे लागते, सामाजिक आणि न्यायालयीन संघर्ष करावा लागतो.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधींनी दांडी येथे मिठाचा सत्याग्रह करून एक प्रतीकात्मक लढा उभारला, त्याचप्रमाणे रमेश गांवस सरांनी आपल्या तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध अभ्यासाच्या जोरावर विवेकबुद्धीचे एकाच वेळी ढाल आणि शस्त्र बनवून खाण व जलप्रदूषणाविरोधात गोव्याचे समर्थ नेतृत्व केले.
राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गांवस सरांनी अकॅडमिक अध्यापनाबरोबरच सामाजिक पातळीवर जनजागृती केली. त्यामुळे सर्वसामान्य माणूस सहजपणे त्यांच्याकडे ‘कागाळी’ घेऊन जाऊ शकतो. समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सरांनी साने गुरुजींच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य विद्यार्थ्यांवर प्रागतिक संस्कार रुजवले.
सर्वोच्च न्यायालयाचे निकष प्रमाण मानून खाणग्रस्त माणसाला दिशा व दृष्टी दिली आणि लढण्यासाठी भक्कम आधार प्रदान केला. सरांची उक्ती आणि कृती वेगळी नाही, त्यांचे विचार आणि राहणीमान परस्परपूरक आहेत.
समाजवाद जोपासत, अंधश्रद्धा निर्मूलन आणि प्रागतिक विचार पुढे ठेवत त्यांनी घालून दिलेले मापदंड नेहमीच आदर्श ठरतील. सामाजिक कार्याचे व्रत घेऊन चालणे सोपे नाही; निसर्गलूट रोखण्याच्या नादात अनेकांच्या डोळ्यात त्यांनी सल निर्माण केला.
पण, न डगमकता, परिणामांची पर्वा न करता, कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, प्रसंगी जीवावर उदार होऊन त्यांनी वसुंधरेच्या रक्षणासाठी समर्पित कार्य केले. त्यांच्या असाधारण धाडसामुळे समाजात अजूनही सत्याला स्थान आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले.
अशा पिळवणूक आणि शोषणाविरुद्ध त्यांनी घातलेला घणाघाती प्रहार समाजात आमूलाग्र बदल घडवून लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षीही सुस्वरे आळविती।।
सर, वरील तुकोबांच्या अभंगाप्रमाणे, गोमंतकातील निसर्गसंपन्नता अबाधित राखण्यासाठी फक्त पंचाहत्तरी नव्हे, तर शतकीय आयुष्याची आम्हाला अभिलाषा आहे.
श्री.ओंकार गोवेकर

(समाजकार्यकर्ते)
कासारवर्णे- पेडणे, गोवा
८८०६८९०१७९

  • Related Posts

    सावधान !

    मला आज जो विषय तुमच्याशी बोलायचा आहे, तो अतिशय गंभीर आहे. एक सायकीयॅट्रीस्ट म्हणून तो मला गंभीर वाटतोच, पण एका मुलीचा बाप म्हणून देखील गंभीर वाटतो. त्यासाठी मी तुमच्या पुढ्यात…

    चंगळवादाचे मानसशास्त्र

    (जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक चितन ! ) ‘चंगळवाद’ हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. एक ‘चंगळ’ आणि दुसरा ‘वाद’. यातील ‘चंगळ’ शब्दाचा अर्थ आहे सुखसाधनांची रेलचेल! आणि वाद शब्दाचा…

    You Missed

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    पोलीस निष्क्रियतेवर ‘रासुका’ची मात्रा!

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    बांबोळी ”ब्लॅकस्पॉट” सरकारनिर्मित

    06/11/2025 e-paper

    05/11/2025 e-paper

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    राजकीय दबावाने पोलिस खाते कोलमडले…

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग

    वोट चोरी : लोकशाहीलाच सुरूंग
    error: Content is protected !!