
आपल्या ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या पुस्तकात डॅनियल गोलमन यांनी एक रोचक किस्सा सांगितला आहे. हा किस्सा व्हिएतनाम युद्धाच्या काळातील आहे. व्हिएतनाम हा आपल्या आशिया खंडातील देश. तेथील बहुतांश प्रजा बौद्ध धर्मीय. या देशावर अमेरिकेने आक्रमण केले होते. अमेरिकन सैनिकांना व्हिएतनाम देशात जाऊन तिथल्या सैन्याशी लढायचे होते. हे व्हिएतनामचे युद्ध तब्बल वीस वर्षे चालले होते. त्या अमेरीकन सैनिकांत एक डेव्हिड बुश नावाचा सैनिक होता. या डेव्हिडने युद्धाच्या आरंभीच्या काळातील एक किस्सा नोंदवून ठेवला आहे. डेव्हिडची तुकडी त्या युद्धाच्या धुमश्चक्रीत एका भाताच्या शेतात दबा धरून गोळीबार करत होती. अचानक त्या शेताच्या बांधावरून सहा बौद्ध साधू ओळीने चालू लागले. अत्यंत शांतपणे ते सरळ गोळीबाराच्या दिशेने चालत होते. डेव्हिड लिहीतो, ‘ते ना उजवीकडे पहात होते, ना डावीकडे. ते सरळ नाकासमोर दृष्टी ठेवून चालले होते. ते दृश्य खरोखरच चमत्कारिक होते. आमच्यापैकी कोणीच त्यांच्यावर गोळी झाडली नाही. आणि जसे ते बांधावरून निघून गेले, तशी माझ्यातील युद्ध करण्याची इच्छाच मरून गेली. ही लढाई चालू ठेवावी असे मला वाटेना, कमीत कमी आजचा दिवस तरी लढू नये असे तीव्रपणे वाटले. आमच्यापैकी प्रत्येकालाच असे वाटले असणार; कारण प्रत्येकजण शांत होता. त्या दिवशी आम्ही लढाई केली नाही.’
गोलमनच्या पुस्तकातील हा किस्सा वाचताना माझ्या डोळ्यांसमोर शेताच्या बांधावरून शांतपणे चालत जाणारे ते अनामिक साधू उभे राहीले. मनःचक्षुंसमोर उभे राहिलेले ते दृश्य अनुभवताना माझ्याही मनात शांततेची लहर येऊन गेली. मला त्या सहा बौद्ध साधूंच्या स्थितप्रज्ञ अवस्थेची कमाल वाटली. स्वतःच्या मनावर सातत्याने काम करुन त्यांनी स्वतःला कल्पनातीत निर्भय बनवले होते.
पण या कथेतून गोलमनना मांडायचा मुद्दा मात्र वेगळाच आहे. तो मुद्दा म्हणजे त्या साधूंच्या तशा निर्भयतेने जाण्याचा सैनिकांवर काय परिणाम झाला याकडे लक्ष वेधणे! ते सैनिक चक्क लढायचे विसरले. त्यांनी त्या सहा साधूंवर गोळ्या चालवल्या नाहीतच शिवाय त्या दिवशी त्यांची युद्ध करण्याची खुमखुमी देखील गायब झाली. ते सहा साधू निर्भय होते, शांत होते कारण त्यासाठी त्यांनी साधना केली होती. पण युद्धासाठीच म्हणून व्हिएतनाममध्ये आलेल्या आणि तिथे बंदूका घेऊन असलेल्या सैनिकांच्या मनातील युद्धभावना कशी काय नाहीशी झाली? गोलमन लिहीतात, ‘कारण त्या सैनिकांना साधूंच्या भावनेचा संसर्ग झाला म्हणून!’
मी जेव्हा गोलमनच्या पुस्तकात ही गोष्ट वाचली तेव्हा मला गौतम बुद्धांशी संबंधित अंगुलीमालाच्या गोष्टीतले मर्म अचानक उमगले. अंगुलीमालाची गोष्ट शाळेत असताना मी वाचली होती. अंगुलीमाल एक क्रूर दरोडेखोर होता. तो लोकांना लुटत तर असेच शिवाय तो क्रूर होता. लोकांना ठार मारुन त्यांच्या प्रेताची बोटे तोडून तो त्या बोटांची माळ आपल्या गळ्यात घाली. म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल पडले होते. त्याला त्याचे क्रौर्य म्हणजे मोठा पराक्रम वाटे. एकदा भगवान गौतम बुद्ध अंगुलीमाल असलेल्या जंगलाच्या दिशेने निघाले होते. लोकांनी त्यांना अंगुलीमालाच्या धोक्यामुळे तिकडे न जाण्याचा सल्ला दिला. पण गौतम बुद्ध त्याच वाटेने पुढे गेले. अंगुलीमाल त्यांच्यासमोर अचानक उभा ठाकला. त्याच्या हिंसक अवताराला बघूनदेखील गौतम बुद्ध शांत होते. आतापर्यंत अंगुलीमालने असा शांत निर्भय माणूस पाहिला नव्हता. आतापर्यंत त्याने ज्या ज्या लोकांना लुटले होते ते त्याला बघताक्षणीच घाबरून गेले होते. त्यांनी लाचार होऊन त्याच्याकडे जीवनाची भीक मागितली होती. पण भगवान बुद्धांनी असे काहीच केले नाही. भगवान बुद्धांच्या चेहर्यावरील शांत भाव अजिबात बदलले नाहीत. त्यांना तसे शांत बघून अंगुलीमालातील हिंसक वृत्ती निमाली. बुद्धांच्यातील भावनेचा संसर्ग अंगुलीमालला झाला.
इथे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बुद्धांच्या भावनेचा संसर्ग अंगुलीमालला झाला, बौद्ध भिक्षुंच्या भावनेचा संसर्ग अमेरिकन सैनिकांना झाला. उलट झाले नाही. अंगुलीमालच्या भावनांचा संसर्ग गौतम बुद्धांना झाला नाही. अमेरिकन सैनिकांच्या भावनांचा संसर्ग बौद्ध साधूंना झाला नाही. याचाच अर्थ एका व्यक्तीच्या भावनांचा संसर्ग दुसर्या व्यक्तीला होतो आणि या संसर्गाची निश्चित अशी दिशा असते. ज्या व्यक्तीतील भावना दमदार असतात, शक्तीशाली असतात त्या व्यक्तीतून त्या भावना कमी तीव्र भावना असलेल्या व्यक्तीत जातात. गौतम बुद्धांच्या मनातील शांतीच्या भावना अंगुलीमालच्या मनातील क्रूरतेच्या भावनांपेक्षा शक्तीशाली होत्या. म्हणून त्यांचा संसर्ग अंगुलीमालला झाला. त्या सहा साधूंच्या भावना अमेरिकन सैनिकांच्या भावनांपेक्षा दमदार होत्या, म्हणून त्या सैनिकांत संक्रमित झाल्या.
ही जरी टोकाची उदाहरणे वाटत असली तरी भावनांचे संक्रमण होण्याचा आपल्याला देखील अनुभव येतो. काही व्यक्तींच्या सहवासात आल्हाददायक वाटते, तर काहींच्या संपर्कात नकारात्मक वाटते. भावनांचे असे आदानप्रदान नेहमीच जाणवते असे नाही, अनेकदा ते नेणीवेच्या पातळीवर घडून येते.
भावनांचे वहन कसे होते यासाठी करण्यात आलेल्या एका गमतीशीर प्रयोगाचे वर्णन गोलमननी केले आहे. या प्रयोगासाठी दोन- दोन व्यक्तींच्या जोड्या करण्यात आल्या होत्या. या जोडीतील एक व्यक्ती आपल्या भावना खूप जास्त प्रमाणात व्यक्त करणारी होती तर दुसरी व्यक्ती निर्विकार चेहर्याची होती. प्रयोगशाळेत आल्याआल्या या दोघांना विविध मनोभाव लिहीलेली यादी दिली जाई व त्यांना त्यांच्या मानसिक अवस्थेनुसार त्या यादीतील पर्यायांवर टीक करायचे असे. मग प्रयोग करणारा त्यांच्या नोंदी त्यांच्याकडून घेई आणि काही मिनिटांसाठी त्यांना तिथेच थांबायला सांगून निघून जाई. काही मिनिटांनी परत आल्यावर तो पुन्हा त्यांना मनोभाव नोंदवण्यासाठी यादी देई. या प्रयोगाअंती असे दिसून आले की भावनिकदृष्ट्या जास्त बोलक्या माणसाच्या भावना निर्विकार माणसात संक्रमित झाल्या होत्या.
पण भावनांचे संक्रमण होते कसे? उप्पसला विद्यापीठातील एका स्वीडिश शास्त्रज्ञाला असे आढळले की आपण जेव्हा एखादा रागीट चेहरा पाहतो किंवा हसतमुख चेहरा पाहतो तेव्हा आपल्याही चेहर्यावरील रेषा काहीशा बदलतात. आपण नकळत दुसर्या व्यक्तीच्या हावभाव, शारीरिक हालचाली, सूर वगैरेची नक्कल करत असतो. हे अनेकदा आपल्या लक्षातदेखील येत नाही. पण बघणार्याच्या चेहर्याच्या स्नायूंच्या विद्युत लहरी विशिष्ट विद्युतग्राहक उपकरणाद्वारे तपासल्या असता बदललेल्या आढळतात. असेच काहीसे निरीक्षण ओहियो विद्यापीठातील जाॅन कॅसिओपो यांनी नोंदविले आहे. त्यांना आढळले की स्वतःच्या नकळत व्यक्तीचा चेहरा समोरच्या माणसाच्या चेहर्याची नक्कल करतो. या नक्कलीचा परीणाम असा होतो की त्या माणसाच्या मनासारखी मनस्थिती बघणार्याच्या मनात देखील तयार होते. ही निरीक्षणे ‘भावना सांसर्गिक असतात’ या निष्कर्षाला पुष्टी देतात. हे फार महत्त्वाचे आहे. हे तत्त्वच संगतीचे महत्त्व अधोरेखित करते. तुमच्या भावनिक आरोग्यासाठी तुम्ही कोणाच्या संगतीत वावरता हे महत्त्वाचे आहे. आजच्या काळात हे आणखीनच महत्त्वाचे आहे कारण मनोरंजनाच्या नावाखाली अनेक विकृत भावनांना आपण सहजच बेसावधपणे सामोरे जात असतो. ते जाणीवपूर्वक टाळले पाहीजे. तिथे फाजील आत्मविश्वास उपयोगाचा नाही. असा फाजील आत्मविश्वासाचा दुष्परिणाम आमच्या मद्यपी रुग्णांमध्ये वारंवार आढळतो. दारु पिणे थांबवल्यानंतर बारमध्ये जाऊन आपल्या मद्यपी मित्रांसोबत फक्त साॅफ्ट ड्रिंक पिऊन आपल्या भावनिक कंट्रोलचे प्रदर्शन करण्याचा प्रयोग त्यांना हमखास तोंडावर पाडतो.
म्हणूनच आपल्याकडे सत्संगाला महत्त्व आहे. सत् म्हणजे चांगले व संग म्हणजे सोबत. जाणीवपूर्वक मनात शांत, प्रसन्न भावना निर्माण करतील असा सत्संग नियमित केला पाहिजे. अशा शांत प्रसन्न व्यक्तींना भेटणे शक्य नसेल तर स्वाध्यायावर भर दिला पाहीजे. आपले वाचन, श्रवण, चिंतन, मनन मनःशांती देणारे करायला पाहिजे.
……
– डाॅ.रुपेश पाटकर