मोरजी प्रकरणी पोलिसांवर प्रचंड दबाव
पेडणे,दि.१०(प्रतिनिधी)
मोरजी येथे पठारावर राजेश फडते याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी अखेर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होऊन चोविस तास उलटत आले तरी अद्याप गुन्हेगारांना पकडण्यासाठी काहीच हालचाली दिसत नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
पोलिसांवर प्रचंड दबाव
म्हापसा येथील रहिवासी तथा मोरजीचे एक जमीनदार माहिम देशपांडे यांनी आपले मित्र राजेश फडते याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची पोलिस तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत प्रतिम रेड्डी, ओमकार फाटक, श्री सुरेश आणि अन्य ४० ते ५० अज्ञात लोकांवर ठपका ठेवण्यात आला आहे. प्रतिम रेड्डी हे बडे बिल्डर आणि उद्योजक असून त्यांचे सरकारातील एका बड्या राजकीय नेत्याशी घनिष्ठ संबंध आहेत,असेही तक्रारदार देशपांडे यांनी म्हटले आहे. केंद्रातील अनेक राजकीय नेत्यांशीही त्यांचे संबंध असल्याने तात्काळ कारवाईबाबत पोलिसांवर दबाव आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. माहीम देशपांडे यांच्याविरोधातच तक्रार करून आता त्यांनाच या प्रकरणात गुंतवण्याची शक्यता निर्माण झाली असून तशा हालचाली सुरू असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
दोस्त बने दुश्मन
मोरजीत प्रतिम रेड्डी यांना आणण्यात माहिम देशपांडे यांच्यात हात होता. हे दोघेही जिगरी दोस्त होते आणि त्यांनी दोघांनी मिळून मोरजीतील जमिनींचे व्यवहार केले आहेत. रेड्डी यांच्या प्रकल्पाशेजारीच माहीम देशपांडे यांची जमीन आहे. प्रतिम रेड्डी यांनी आपले दिल्लीतील राजकीय संबंध वापरून इथे एका राजकीय नेत्याकडे सूत जुळवले आणि त्यात माहिम देशपांडे मागे पडल्याने आता दोघांत हे शत्रूत्व निर्माण झाल्याची चर्चा मोरजीत सुरू आहे.
‘२० हजारात मरासर धपके‘
मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या ६ आरोपींना तात्काळ फक्त २० हजार रूपयांच्या वैयक्तीक हमीवर सोडण्यात आल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एखाद्याला मरेपर्यंत मारहाण करून फक्त २० हजार रूपयात सुटका होत असेल तर यापुढे राज्यात कुणीच सुरक्षीत नाही,अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या अनुषंगानेच ‘गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राज्यात फक्त २० हजार रूपयांनी मरासर धपके घाला’ असे सांगणारा एक पोस्ट सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला आहे.