
समाज अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालला आहे. “मला काय त्याचे?”, “मला काय मिळणार?” अशी मानसिकता बळावत चालली आहे आणि त्यामुळे समूह, ग्रामसंस्था यांसारख्या संकल्पनाच कमकुवत होत आहेत.
आज सकाळी धारगळ–पेडणे येथे म्हापसा हायर सेकंडरीमध्ये जाण्यासाठी महामार्गावर बससाठी उभ्या असलेल्या कु. ऋषभ उमेश शेटये या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर अज्ञात व्यक्तींनी अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आणि त्यामुळे संपूर्ण गोवा हादरून गेला. या हल्ल्यात ऋषभ ३० टक्के भाजला असून त्याच्यावर गोवा मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचार सुरू आहेत. बऱ्याच काळानंतर राज्यात अॅसिड हल्ल्याची घटना घडली असून विशेष म्हणजे हा हल्ला एका अल्पवयीन मुलावर झाला आहे.
पेडणेचे आमदार प्रविण आर्लेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, पालकांसोबत झालेल्या चर्चेचा हवाला देत, हा हल्ला प्रेमप्रकरणातून झाला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. प्रेमप्रकरणातून मुलींवर अॅसिड हल्ल्याचे प्रकार पूर्वी घडले आहेत, पण येथे हा हल्ला एका १७ वर्षीय मुलावर झाला आहे, ही बाब अधिकच गंभीर आहे. त्यामुळे या घटनेचा कायद्याच्या आणि सामाजिक दृष्टिकोनातून सखोल विचार आणि चर्चा होणे अत्यावश्यक आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थात, सर्व गुन्हे पोलिसांनी रोखावेत, ही अपेक्षा वास्तववादी नाही. पण गुन्हे घडत असल्यामुळे सरसकट पोलिसांनाच दोष देण्यात काही अर्थ नाही. समाज म्हणून आपली जबाबदारी काय, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. आपल्या डोळ्यांदेखत जे प्रकार घडत आहेत, त्याकडे आपण मुकाट्याने पाहतो आणि गप्प राहतो. “आपल्याला काय त्याचे?” या मानसिकतेतून प्रत्येकजण स्वतःला या विषयांपासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे संकट कधीतरी आपल्या दारात येऊन उभे राहील, याचा साधा विचारही कोणी करत नाही. व्यसनाधीनता, ड्रग्जचा वाढता प्रसार यामुळे राज्यातील अनेकांचे कौटुंबिक जीवन उध्वस्त झाले आहे. या पीडितांपासून स्वतःला वेगळे ठेवून आपण सुरक्षित राहू, असा विचार करणाऱ्यांना हे समजत नाही की ही कीड भविष्यात सगळ्यांनाच पोखरणार आहे. पत्रकार म्हणून जेव्हा समाजमाध्यमांवर व्यसनाधीनता, ड्रग्ज, रस्ते अपघात यासारख्या विषयांवर भाष्य करणारे पोस्ट्स किंवा जागृतीपर व्हिडिओ शेअर केले जातात, तेव्हा त्याला फारसा प्रतिसाद मिळत नाही. समाजाने या सगळ्या गोष्टी गृहीत धरून टाकल्या आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील किनारी भागांना भेट दिल्यास किंवा अनेक परिचितांच्या घरी गेल्यास या समस्यांचा सुगावा लगेच लागतो. लोकांनी आता या गोष्टींबाबत चिंता करणेच सोडून दिले आहे. “चिंता करून काहीच होणार नाही”, “हे तर नियतीचं फळ आहे” अशा विचारांनी समाज निष्क्रियपणे सगळं स्वीकारत पुढे जात आहे. १७ वर्षीय मुलावर प्रेमप्रकरणातून अॅसिड हल्ला होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. इतक्या लहान वयात प्रेमप्रकरण इतक्या टोकाला जाणे हे समाजातील मूलभूत समस्यांचे द्योतक आहे. कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर जागृती, मार्गदर्शन, समुपदेशन यावर भर देण्याची नितांत गरज आहे. आज सगळीच क्षेत्रं राजकारणाने व्यापून टाकली आहेत आणि त्यामुळे समाजाची बौद्धिक वाढ खुंटली आहे. समाज अधिकाधिक आत्मकेंद्रित होत चालला आहे. “मला काय त्याचे?”, “मला काय मिळणार?” अशी मानसिकता बळावत चालली आहे आणि त्यामुळे समूह, ग्रामसंस्था यांसारख्या संकल्पनाच कमकुवत होत आहेत. बिगरराजकीय स्तरावर सामाजिक एकोपा, संवाद आणि चर्चा होणे ही काळाची गरज आहे. समाजातील विवेकी, विचारवंत लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची समाजात कदर होत नाही, उलट त्यांची खिल्ली उडवली जाते, अशी धारणा बळावत आहे. पण आत्तापर्यंतच्या समाजसुधारकांनी आणि समाजधुरीणांनी हे सगळं सहन करत समाजाला दिशा दिली आहे. त्यांच्या आदर्शावर चालत समाजजागृतीची मशाल अधिक प्रज्वलित करण्याची वेळ आता आली आहे.