
धर्माची प्रतिके वेगळी असतील, स्तोत्रे वेगळी असतील, मूर्त्या वेगळ्या असतील, पण गाभा एकच! विष्णुमय जग!
आम्ही शाळेत असताना मनोरंजनाचे साधन म्हणजे टीव्हीचे एकमेव चॅनल दूरदर्शन. त्यावर रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत काही मालिका असत. त्या मालिका आजच्यासारख्या डेलीसोप म्हणतात तशा नव्हत्या. त्यात एक मालिका होती ‘कथासागर’ नावाची. पण या मालिकेच्या प्रत्येक भागात स्वतंत्र कथा दाखवली जाई. दर्जेदार लेखकांच्या कथा असत. त्यातील एक कथा होती टाॅलस्टाॅयची. त्यावयात ती कथा मला फारशी समजली नाही, पण मनातून कधी पुसलीही गेली नाही. बरे ती मनोरंजक होती असेही नाही.
एक चांभार होता. दुर्दैवाने त्याची बायको अकाली वारली आणि नऊदहा वर्षांचा होईपर्यंत एकुलता एक मुलगाही वारला. चपले शिऊन स्वतःचा उदरनिर्वाह चालवणारा तो छोट्याशा झोपडीत दिवस कंठत असे. एक दिवस झोपी जात असताना त्याला अचानक देवाचा आवाज आला की ‘उद्या मी तुझ्याकडे येईन!’ आपण झोपेत तर नाहीना म्हणून त्याने स्वतःला चाचपडून पाहीले. तो आवाज त्याला इतका स्पष्ट ऐकू आला होता की त्याला त्याची खात्री वाटली. दुसर्या दिवशी भल्या पहाटे तो उठला. साक्षात परमेश्वर येणार या अढळ विश्वासाने त्याने झोपडी झाडून लख्ख केली. देवाच्या बसण्यासाठी व्यवस्था केली. आल्यावर देवाला काही खायला द्यावे म्हणून त्याने शेजारच्या गवळ्याकडून दूध आणून तापवून ठेवले.
तो रस्त्याकडे डोळे लावून देवाची उत्कंठेने वाट बघू लागला. सकाळच्या वेळी थंडीने कुडकुडत कामावर जाणारा नेहमीचा झाडूवाला त्याला दिसला. ‘आज जरा थंडी जास्तच पडलीय. त्यात माझा कोट फाटलाय. पण काय करणार, मुकादमाने वेळेत पोचण्यात अजिबात हयगय करायची नाही म्हणून कालंच दम दिलाय,’ झाडूवाला दारात बसलेल्या चांभाराला म्हणाला. चांभाराने त्याला ‘जरा थांब’ म्हणत थांबवले आणि तो झोपडीत गेला. त्याच्या कपाटातील एक कोट घेऊन तो बाहेर आला. ‘हा मी दोन वर्षांपूर्वी घेतलेला कोट आहे. माझा जुना कोट अजून चारपाच वर्षे चालेल,’ असे म्हणत त्याने त्या कुडकुडणाऱ्या झाडूवाल्याला तो कोट देऊन टाकला.
हळूहळू सूर्य वर आला. देव केव्हा येईल, याची त्याला आता जास्तच उत्कंठा लागली होती. तितक्यात एक बाई तान्ह्या मुलाला घेऊन घरासमोरून चालली होती. तिचं मुल रडून उच्छाद करत होते. ती त्याला शांत करण्याची पराकाष्ठा करत होती, पण ते काही केल्या शांत होत नव्हतं. उपाशी मुल नुसते खेळवून शांत थोडेच होणार. ‘दोन दिवस झाले. घरात खायला दाणा नाही,’ ती आई म्हणाली. चांभाराने तिला ओसरीवर बसवले आणि देवासाठी आणलेल्या दूधातील वाटीभर दूध त्याने बाळाला पाजायला दिले. बाळाला दूध पाजून चांभाराला दुवा देत ती निघून गेली. आता दुपार झाली. देव केव्हाही येईल या आशेने त्याने सकाळपासून काही खाल्ले नव्हते. वाट पहात बसला असताना त्याला डुलकी लागली. पण कोणाच्यातरी ओरडण्यामुळे त्याला जाग आली. काय झाले म्हणून बघायला तो आवाजाच्या दिशेने गेला. फळे विकणारी बाई ‘चोर चोर’ म्हणून एका तेराचौदा वर्षांच्या मुलाला मारत होती. ‘लहान आहे तो. भूक लागली म्हणून तुझे फळ त्याने घेतले असेल. मी देतो त्याचे पैसे,’ असे म्हणत चांभाराने कनवटीचे नाणे त्या फळवाल्या बाईला दिले. आपला पोरगा जीवंत असता तर असाच दिसला असता या विचाराने त्या चांभाराच्या डोळ्यात पाणी आले.
हळूहळू संध्याकाळ झाली. चांभार देवाची वाट बघून थकून गेला. देवाला भेटल्यावरच जेवावे म्हणून दिवसभर तो उपाशी राहीला होता. त्याला आता कालच्या आवाजाचा संशय येऊ लागला. वय झाल्यामुळे आपण भ्रमिष्ट तर झालो नाही ना असा तो विचार करु लागला.
तिन्हीसांज झाली. काळोख पडला. चांभाराने झोपडीत दिवा पेटवला. ‘असा देव थोडाच माणसांना दर्शन देतो. मीच वेड्यासारखी त्याच्या दर्शनाची आस लावून बसलो,’ स्वतःवर नाराज होत तो पुटपुटला. पण तितक्यात त्याला पुन्हा तोच कालचा आवाज आला. ‘मी आज तुझ्याकडे तिनदा आलो. मी थंडीने गारठलो होतो. तू मला तुझा कोट दिलास. मी भूकेने व्याकूळ होतो. तू मला दूध पाजलेस. मी गरीबीने लाचार होतो, चोर ठरवला जात होतो, तेव्हा तू माझी सोडवणूक केलीस!” चांभार सद्गदित झाला.
मला माहिती आहे की ही कथा काल्पनिक आहे. टाॅलस्टाॅयच्या मनात जन्मलेली आहे. पण टाॅलस्टाॅयच्या मनात ही कथा स्फुरण्याचे कारण मात्र त्याची प्रतिभा हे नाही. त्याचे कारण त्याचे स्वतःचे चमत्कारिक जीवन आहे. खरतर टाॅलस्टाॅय हा गडगंज श्रीमंत सरदाराचा मुलगा. वयाच्या तिशीपर्यंत ऐशारामी रंगेल जीवन जगलेला. पण तिशीत जीवनाविषयी गंभीर विचार करुन सर्व सोडून स्वेच्छेचे श्रमिक जीवन स्विकारलेला. त्याच्या सर्व अनमोल साहित्यिक कृती या त्याच्या वैयक्तीक बदलानंतर स्फुरलेल्या.
पण रंजल्यागांजलेल्यात देव बघणारा टाॅलस्टाॅय मात्र ना एकमेव आहे, ना पहिला आहे. ईशावास्य उपनिषदापासून याचाच ध्वनी आसमंतात घुमतो आहे. ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतचा भागवत संप्रदाय हेच सांगणारा आणि हेच जगणारा आहे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांनी शिकवलेला धर्मही तोच आहे! धर्माची प्रतिके वेगळी असतील, स्तोत्रे वेगळी असतील, मूर्त्या वेगळ्या असतील, पण गाभा एकच! विष्णुमय जग!
……
– डाॅ.रुपेश पाटकर