पैशाच्या लोभाचे कारण काय….?

‘डॉक्टर, माणसाला पैशाची किती आवश्यकता असते?’ एखाद्या अध्यात्मिक माणसाला प्रश्न विचारावा तसा त्याने मला हा प्रश्न केला.

अलिकडे होते असे की मी सतत छोट्यामोठ्या पोस्ट लिहीत असल्याने लोकांना उगीचच असे वाटते की याला बहुधा भरपूर ज्ञान असावे. त्यात आत वयाचे अर्धशतक पूर्ण केल्यामुळे लोकांना मी जेष्ठ वाटू लागलोय. असे त्यांना नुसतेच वाटले असते आणि त्यांनी दुरूनच कौतुक केले असते तर प्रश्न नव्हता. पण त्यांना वाटते की जीवनाच्या गहन प्रश्नांची उत्तरे मला ठाऊक असतील. परवाच एकाने मला प्रश्न केला, ‘डाॅक्टर, माणसाला पैशाची किती आवश्यकता असते?’ एखाद्या अध्यात्मिक माणसाला प्रश्न विचारावा तसा त्याने मला हा प्रश्न केला.
मी म्हटले, ‘माणसाला पैशाची आवश्यकता नाही. माणसाला त्याच्या गरजा भागण्याची आवश्यकता असते. आजच्या जमान्यात अशी काही सामाजिक रचना बनलीय की प्रत्येक गोष्ट मिळवताना मध्ये पैसा आडवा येतो. पूर्वी वस्तू विनिमय (बार्टर पद्धत) होता, तेव्हा पैशाची जरूरी नव्हती. अगदी अलीकडेपर्यंत भारताची स्वयंपूर्ण गाव रचना होती तेव्हा लोकांना पैशाची कुठे गरज होती? आता हा पैसा जिथे-तिथे उभा राहिल्यामुळे तो अपरिहार्य असल्याचे वाटू लागलेय. त्यामुळे नैसर्गिकरीत्या माणसाला पैशाची गरज नाही तर मुलभूत गरजा भागण्याची गरज आहे. त्या गरजा भागण्यासाठी आजच्या भांडवलशाहीच्या काळातच केवळ पैशांची गरज वाटते आहे. पण किती पैशांची गरज असते, या तुमच्या प्रश्नाचे ठोस उत्तर देणे कठीण आहे. अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या किमान गरजा भागतील इतके पैसे लागतील.’
‘पण माणसाचा पैशाचा मोह तर कधी संपतच नाही. तुम्ही फक्त अन्न, वस्त्राची गरज म्हणालात, पण गंमत म्हणजे जे जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते अन्न स्वस्त आहे आणि जीवन जगण्यासाठी काहीही उपयोग नसलेल्या सोने चांदी वगैरे गोष्टी महाग आहेत, हे विचित्रच आहे नाही का?’ त्याने आणखी एक अध्यात्मिक वाटावा असा प्रश्न पुढे केला.
‘त्यात विचित्र काय? मला वाटते आपण दोन वेगवेगळ्या गोष्टींची गल्लत करतो आहोत. प्रत्येक वस्तूला तिचा उपयोग असतो. त्या उपयोगाला आपण उपयोग मुल्य म्हणू. पण वस्तू विकली जात असताना ती किती रुपयाला खरेदी व्हावी हे ती निर्माण करण्यात किती श्रम खर्च झालेत यावर असते. याला विनिमय मुल्य म्हणू. तेव्हा उपयोग मुल्य वेगळे आणि विनिमय मुल्य वेगळे!
आता तुमच्या पहिल्या प्रश्नाकडे येऊ. माणसाला पैशाचा मोह का होतो, त्याकडे येऊ. मला सांगा, तुम्हाला तांदूळ, गहू, कापड वगैरेचा साठा करायला आवडेल की पैशांचा?’
‘अर्थातच पैशांचा!’
‘का?’
‘कारण तांदूळ, गहू किंवा कापड एका कमाल मर्यादेपलीकडे साठवून मी काय करु? या वस्तू काही काळानंतर खराब होणार. त्यामुळे त्या एका मर्यादेपर्यंतच साठवता येतील. आणि त्या साठवून मला त्याचा नंतर उपयोग काय? पण पैशाचे तसे नाही. एकतर पैसा इतर वस्तूंसारखा खराब होत नाही आणि दुसरे म्हणजे त्यापासून हवे ते मिळवता येते!’
‘पैशापासून हवे ते मिळवता येते हेच पैशाच्या मोहाचे कारण आहे! पैशाला कोणतेही ठराविक उपयोग मुल्य नाही, पण त्याच्या बदल्यात हवे ते उपयोग मुल्य असलेली वस्तू मिळवता येते. गंमत अशी आहे की पैसा ही अशी एकमेव गोष्ट आहे जिला गुणात्मक अमर्यादपणा (Qualitative unlimited) आहे. पण तिला संख्यात्मक मर्यादा (Quantitative limited) आहे. त्यामुळे पैसा दिसला की हा अंतर्विरोध उभा राहतो! आणि या अंतरविरोधाचे निराकरण करण्याचा एकमेव मार्ग माणसाला दिसतो, तो म्हणजे त्याच्या संख्यात्मक मर्यादेवर (Quantitative limitedness) मात करणे. त्यामुळे ज्याच्याकडे दहा रुपये आहेत, त्याला शंभर रुपये मिळवावेसे वाटतात. शंभर असतील त्याला हजार. हजार असतील त्याला दहा हजार, दहा हजार असतील त्याला लाख. हे असेच चालू रहाते. कारण पैशाची संख्यात्मक वाढ कितीही केली तरी तो गुणात्मकतेप्रमाणे अमर्याद होऊ शकत नाही.’
‘हा गुणात्मक- संख्यात्मक अंतर्विरोधाचा मुद्दा डोक्यावरून गेला,’ तो म्हणाला.
आता त्याला समजवावे कसे हा प्रश्न मला पडला. त्यावर विचार करता करता मला रामकृष्ण परमहंसांनी सांगितलेली एक गोष्ट आठवली.
‘एकदा एक न्हावी लाकूडफाटा आणायला गावाजवळच्या एका जंगलात गेला होता. एका झाडाखाली तो बसला असताना झाडातून आवाज आला. त्याने घाबरून इकडे तिकडे पाहिले, तेव्हा त्याला अभय देत तो आवाज म्हणाला, ‘मी या झाडावर राहणारा यक्ष आहे. तू आज माझ्याकडे पाहुणा आला आहेस. तुला मी एक भेट देऊ इच्छितो!’
‘कोणती?’ कुतूहलाने न्हाव्याने विचारले.
‘मी तुला सोन्याच्या मोहरांनी भरलेली सात रांजणे भेट देतो!’
सोन्याच्या नाण्यांनी भरलेली सात रांजणे म्हटल्यावर न्हाव्याला अत्यानंद झाला.
‘पण त्या सोन्याचा उपयोग करण्यासाठी एक अट आहे. यापैकी सहा रांजणे पूर्ण भरलेली आहेत. पण सातवे रांजण अर्धेच भरलेले आहे. ते तू जेव्हा भरशील तेव्हाच तुला ते सर्व सोने वापरता येईल.’
ही अट त्या न्हाव्याला क्षुल्लक वाटली. साडेसहा रांजणे मिळणार असतील तर अर्धे रांजण कसेही करून भरुन काढू असा त्याने विचार केला. यक्षाने ती सातही रांजणे त्याच्या घरी पोचती केली.
न्हाव्याने पहिल्या दिवसापासून ते सातवे अर्धे रांजण भरायला सुरवात केली. त्याने त्याच्या बायकोकडे असलेले दागिने वितळवून त्याच्या मोहरा बनवून त्या रांजणात टाकल्या. तो आता कमालीची काटकसर करु लागला आणि साठलेल्या मजूरीतून सोने खरेदी करून त्या रांजणात टाकू लागला. तो न्हावी राजाचा न्हावी होता, त्यामुळे त्याला पगार चांगला होता. पण ते सातवे रांजण भरण्याच्या ध्येयाने पछाडल्यामुळे तो अर्धपोटी राहून बचत करु लागला. त्यामुळे त्याची प्रकृती खंगू लागली. राजाने त्याला त्याच्या खंगत जाण्याचे कारण विचारले. पण तो थोडेच या रांजणांविषयी राजाशी बोलणार होता. राजाला त्याची आर्थिक परिस्थिती कठीण झाल्याचे वाटल्याने राजाने त्याचा पगार वाढवला. पण तरीही त्या न्हाव्याच्या प्रकृतीत फरक पडेना.
एकदिवस तो राजाची हजामत करायला आला असता राजाने त्याला विचारले, ‘तुला ती यक्षाची सात रांजणे तर नाही ना मिळालीत?’
न्हाव्याला राजाच्या या अनपेक्षित प्रश्नाने धक्का बसला.
राजा म्हणाला, ‘मलाही जंगलात त्या यक्षाने ती रांजणे घेऊन जाण्याबाबत सांगितले होते. पण त्याच्या त्या सातवे रांजण भरण्याच्या अटीमागचा धूर्त हेतू लक्षात येताच मी त्याची रांजणे घ्यायला नकार दिला. ‘सातवे रांजण भरणे’ हा सापळा (trap) होता. ती साडेसहा रांजणे वापरायला मिळतील या आशेने माणूस अडकतो. पण रांजण कधीच भरले जात नाही आणि माणसाचा पैशाचा मोह कधी थांबत नाही!’
…..
डॉ. रूपेश पाटकर

  • Related Posts

    ॥ श्री मल्लिकार्जुन प्रसन्न ||

    काणकोणचा श्री मल्लिकार्जुन देव अडवट सिंहासनाधिश्वर महापती जत्रोत्सव आणि देवस्थानचा दैवी चमत्कार शिर्षारान्नी उत्सवनिमित्त कण्वमुनींच्या वास्तवाने पुनीत झालेली भूमी म्हणजे काणकोण. पार्वतीच्या विरहाने व्याकुळ झालेले श्री शंकर तिला शोधत शोधत…

    मन माझ्यात तू ठेव !

    एकदा आपण देवाला जाऊन मिळालो की जसे समुद्रात मिसळणार्‍या नदीचे होते तसे होते. समुद्राला मिळालेली नदी मग नदी राहत नाही, ती समुद्रच बनून जाते. मग मी उरत नाही. फक्त तोच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    25/03/2025 e-paper

    25/03/2025 e-paper

    अधिवेशन म्हणूनच गरजेचे

    अधिवेशन म्हणूनच गरजेचे

    तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन

    तवडकरांनी घातले सरकारच्या डोळ्यात अंजन

    24/03/2025 e-paper

    24/03/2025 e-paper

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    अखेर ‘टीसीपी’ ची चोरी पकडली

    पाण्यासाठी दाही दिशा

    पाण्यासाठी दाही दिशा
    error: Content is protected !!