
रानमाणसाचे त्रिवार अभिनंदन!
अस्सल कोकण ब्रॅण्ड “रानमाणूस” म्हणून ओळख मिळवलेले प्रसाद गावडे यांना यंदाचा युआरएल फाऊंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण गुरुवार, २९ मे रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे होणार आहे.
तळ कोकणचे सौंदर्य आणि ग्रामीण जीवनशैलीच्या संवर्धनाचा ध्यास
पर्यटनाच्या माध्यमातून तळ कोकणचे निसर्ग सौंदर्य आणि ग्रामीण जीवनशैलीचा अनोखा अनुभव देत, प्रसाद गावडेंनी संपूर्ण जगाचे लक्ष कोकणवर केंद्रित केले आहे. रोजगार आणि करिअरच्या शोधात शहरांकडे धावणाऱ्या कोकणवासियांना स्वतःच्या भूमीत राहून उज्ज्वल भविष्य घडवता येते, तसेच जगण्याचा खरा आनंदही लुटता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
स्वतः चांगल्या पगाराची इंजिनिअरची नोकरी सोडून कोकणच्या संस्कृती आणि पर्यावरणीय मूल्यांचे संवर्धन करण्याचा मार्ग स्वीकारत त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येक कोकणवासीयांना आपल्या भूमीची ओढ निर्माण झाली, तसेच अनेक युवकांनी हा मार्ग स्वीकारण्याची मानसिक तयारी केली आहे—हेच त्यांच्या कार्याचे मोठे फलित म्हणावे लागेल.
कोकणच्या खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि शेतीचा प्रचार
त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते कोकणातील खाद्यसंस्कृती, जीवनशैली आणि शेती याबद्दल माहिती देतात. त्यांचे कार्य कोकणच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे, तसेच त्यांनी स्थानिक प्रश्न प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडण्याचे कार्यही केले आहे.
त्यांचे अथक प्रयत्न आणि कोकणाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली योगदान निश्चितच गौरवास्पद आहे. त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा!