
हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’
‘पडत्या फळाची आज्ञा’ ही म्हण तुम्ही ऐकली असेल. ती कशी आलीय, याचा कधी विचार केलात का? शाळेत असताना कधीतरी आमच्या गुरुजींनी या म्हणीचा रोचक उगम आम्हाला सांगितला. रामायणातील प्रसंग आहे. सीतेला शोधत-शोधत हनुमान रावणाच्या लंकेत पोहोचला. तिथे अशोकवनात त्याला सीता भेटली. भारतातून उड्डाण करून तो लंकेत पोहोचला होता. खूप लांबचा प्रवास झाला होता. त्याला कडकडून भूक लागली होती. सीतेला ज्या अशोकवनात ठेवण्यात आले होते, तेथील वृक्ष फळांनी लगडलेले होते.
हनुमानाने विचारले, ‘माई, मी या झाडांवरची फळे खाऊ का?’ सीतामाई म्हणाली, ‘झाडांची फळे तू तोडू नकोस. फळे तोडणे योग्य नाही. जी फळे जमिनीवर पडलेली आहेत, तीच तू घे!’
हनुमानाने नम्रपणे मान डोलवली आणि तो एकेक झाड गदागदा हलवू लागला. सीतेने विचारले, ‘अरे अरे, हे काय करतोस?’ हनुमान म्हणाला, ‘तुमच्या आज्ञेचे पालन! मी फळे तोडत नाही, पडलेलीच घेणार आहे!’ सीतामाई म्हणाली, ‘तू माझ्या आज्ञेचे फक्त शब्द घेतलेस. माझ्या आज्ञेमागचा भाव नाही घेतलास. तुझे कसे रे होणार? प्रभू भावग्राही आहेत. तू त्यांचा भक्त रे कसा होणार?’
गुरुजींकडून ही गोष्ट ऐकताना खूप मिश्कील वाटली. मी घरी गेल्यावर बाबांना ही गोष्ट सांगितली. बाबा म्हणाले, ‘हाच तर हनुमानाला मिळालेला गुरुपदेश आहे!’
गुरुजींनी गोष्ट सांगताना मला त्यात निव्वळ गंमत वाटली होती, पण बाबा त्यात गुरुपदेश असल्याचे म्हणत होते. मला क्षुल्लक वाटणारी गोष्ट बाबांना अत्यंत महत्त्वाची वाटत होती.
‘आपल्या घरातील भिंतीवरचे कॅलेंडर पाहिलेस ना?’ बाबांनी विचारले. आमच्या लहानपणी जेव्हा घरांच्या भिंती मातीच्या असत, त्या काळात देवादिकांची कॅलेंडरे येत. बहुतेक घरातील भिंतीवर अशी कॅलेंडरे सहज बघायला मिळत. बाबांच्या खोलीत हनुमानाच्या चित्राचे कॅलेंडर होते. त्यात हनुमान आपली छाती फाडून आत विराजमान प्रभू रामचंद्र दाखवतोय असा प्रसंग रंगवलेला होता.
‘त्या चित्रातील प्रसंग हा सीतामाईच्या अशोकवनातील उपदेशाची परिणती आहे,’ बाबा म्हणाले.
ते चित्र आमच्या घरात दोन वर्षांपासून होते, पण मला त्यात काही मोलाचे असेल असे वाटले नव्हते. पण आता मला त्या चित्राविषयी कुतूहल निर्माण झाले. बाबा म्हणाले, ‘चौदा वर्षांच्या वनवासानंतर प्रभू राम अयोध्येत परत आले. ते अयोध्येचा राजा म्हणून राज्य करू लागले. त्यानंतरची ही गोष्ट आहे. एक दिवस सीतामाईने अयोध्येत आलेल्या रामभक्तांना राजवाड्यात बोलावून काही ना काही भेटवस्तू दिल्या. तिने हनुमानालाही एक मौल्यवान मोत्यांची माळ दिली. गंमत म्हणजे ती किमती माळ गळ्यात घालून मिरवायचे सोडून हनुमान त्यातील एकेक रत्न काढून फोडू लागला. त्याचे ते विचित्र वागणे बघून सगळ्यांनाच हसू आले. संजीवनी मूळी ओळखता न आल्यामुळे अख्खा द्रोणागिरी पर्वतच उखडून आणल्याची घटना सगळ्यांना माहीत होतीच. त्यामुळे ही एक माकडचेष्टाच असल्याचे सर्वांना वाटले. सीतामाईने विचारले, ‘हे काय करतोयस हनुमाना?’
हनुमान म्हणाला, ‘माई, या मोत्यांत राम आहे का ते शोधतोय. ज्या गोष्टीत राम आहे, तीच गोष्ट माझ्या उपयोगाची, बाकीचा कचरा घेऊन काय करू?’
त्या उत्तराने सीतामाईचे डोळे वात्सल्याने भरून आले. पण तितक्यात कोणीतरी बोलले, ‘बाहेरच्या वस्तूंत राम शोधतोस, तुझ्या आत राम आहे का?’
मग क्षणाचाही विलंब न करता मारुतीने आपल्याच नखांनी छाती चिरली. त्याच्या हृदयात विराजमान असलेला सीताराम सर्वांना दिसला! मला ते ऐकताना मारुतीला किती दुखले असेल, असा विचार मनात आला.
मी म्हटले, ‘बाबा, खरेच अशी त्याने छाती चिरली असेल का?’ बाबा म्हणाले, ‘असूही शकते. पण पौराणिक गोष्टी या इतिहास म्हणून बघायच्या नसतात. त्यातला भाव बघायचा असतो. मारुतीच्या जीवनात राम ओतप्रोत भरलेला होता. आदर्श भक्ताच्या मनात जागेपणी, झोपताना, अगदी स्वप्नात देखील देव भरलेला असतो. त्याला आपल्या इष्टदेवतेपुढे लौकिक गोष्टींची किंमत अजिबात नसते. आपण जर रामभक्त बनणार असू तर मारुती हा आपला आदर्श असायला हवा. छाती चिरण्यापेक्षा मोत्यांची माळ फोडून बघण्यासाठी प्रचंड वासनाजय मिळवावा लागतो. स्वतःला वेदना देऊन सहन करणारे तुला खूप जण दिसतील. पण पैशाच्या मोहावर, सोन्यानाण्याच्या मोहावर, हिरे-माणकांच्या मोहावर विजय मिळवणे हा खरा चमत्कार आहे. विज्ञान तुला सगळे चमत्कार करून दाखवेल, पण विज्ञान कितीही विकसित झाले तरी वासनाजयाचे तंत्र काही ते निर्माण करू शकणार नाही, त्यासाठी आध्यात्मिकताच हवी!’
– डॉ. रूपेश पाटकर
हनुमानच्या विचारांमध्ये खूप गंभीरता आहे. त्यांच्या शब्दांतून रामाच्या शोधाची तीव्र इच्छा दिसते. “पडत्या फळाची आज्ञा” या म्हणीचा अर्थ खूप सुंदरपणे सांगितला आहे. रानमाणसाच्या कामगिरीबद्दल ऐकून खूप आनंद झाला. प्रसाद गावडे यांच्या प्रयत्नांना योग्य सन्मान मिळाला हे आनंदाचे आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्या कामाला आणखी चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला वाटते का की अशा पुरस्कारांमुळे समाजातील इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल?