
ताळगांव शेतजमिनीतील अनधिकृत बांधकाम ? भरारी पथकाने घेतली माघार!
गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)
ताळगांव येथील सर्वे क्रमांक १८६/३ या शेतजमिनीत मातीचा भराव टाकून अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची तक्रार एका स्थानिकाने भरारी पथकाकडे केली. चौकशीदरम्यान, ही जमीन पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्या नावे असल्याचे लक्षात आल्यानंतर भरारी पथकाने कोणतीही कारवाई न करता माघार घेतल्याची घटना घडली.
विटो गोम्स यांनी आपल्या प्रतिनिधीमार्फत भरारी पथक, कृषी खात्याचे तिसवाडी क्षेत्रीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. ताळगावच्या भातशेतीच्या जमिनीवर मातीचा भराव टाकून तिथे कॉंक्रिटचे बांधकाम सुरू असल्याचे त्यांनी तलाठ्याकडे निवेदनाद्वारे मांडले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अलीकडेच दिलेल्या निवाड्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने तक्रारींसाठी अधिकृत मोबाईल क्रमांक जाहीर केले असून, त्यावरही ही तक्रार पाठविण्यात आली. तलाठ्याकडून तक्रारदाराला संपर्क साधून अधिक माहिती घेण्यात आली. मात्र, खंडपीठाच्या आदेशानुसार एका तासात कारवाई करणे अपेक्षित असतानाही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, अशी तक्रारदाराची भावना आहे.
रोहित मोन्सेरात यांच्या नावे जमीन
तक्रार दाखल झालेली जमीन ही पणजीचे महापौर तसेच महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांच्या नावे नोंद आहे. ताळगाव कोमुनिदादच्या नावे असलेल्या या शेतीत केवळ एकच सर्वे क्रमांक त्यांच्या नावे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही जमीन १९९९ साली विकत घेतल्याची नोंद त्यांच्या एका चौदाच्या उताऱ्यावर आढळते. मात्र, रोहित मोन्सेरात हे त्या वेळी केवळ १० वर्षांचे असताना त्यांनी ही जमीन कशी विकत घेतली, असा प्रश्न तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
सरकारच्या भूमिकेवर सवाल
खंडपीठाच्या आदेशानंतरही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाईस टाळाटाळ केल्याचे आरोप होत आहेत. आदेश हा सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू आहे आणि आमदार, मंत्र्यांच्या कुटुंबियांना त्याचा अपवाद आहे का? याबाबत सरकारने खुलासा करावा, अशी मागणी विटो गोम्स यांनी केली आहे.