माणसासम वागणे… हीच प्रार्थना!

प्रत्येकवेळी या धर्मातील लोकांना आपला राष्ट्रवाद, देशप्रेम, बंधुभाव सिद्ध करावा लागत असेल, तर मग या धार्मिक लोकांच्या मनात शत्रुत्वाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे.

“धर्म, जाती, प्रांत, भाषा भेद सारे संपूदे. हीच आमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे.” जेव्हा जेव्हा राज्यात, देशात या सगळ्या गोष्टींवरून वातावरण गंभीर होते, तेव्हा हे गाणे शांतपणे डोळे बंद करून मी ऐकतो. आमच्याच एका समाजगटाच्या समूहात माझ्या सर्वधर्मसमभावाच्या भूमिकेवर सगळेचजण तुटून पडले होते. पहलगामचा दहशतवादी हल्ला स्थानिकांच्या मदतीविना होऊच शकत नाही, असे म्हणून देशातील मुस्लिम समाजावरील राग वेगवेगळ्या माध्यमांतून व्यक्त केला जात होता. अर्थात, ग्रुपवरील काही मोजकेच बांधव खूपच आक्रमक बनले होते. शेवटी वातावरण शांत करण्यासाठी म्हणून मी यूट्यूबवरील या गाण्याची लिंक शेअर केली, तर तिथे हे गाणे फक्त हिंदूंनाच लागू आहे का, असा सवाल करण्यात आला.
देशातील आणि जगभरातील दहशतवादी हल्ले आणि या हल्ल्यांतील दहशतवाद्यांची नावे पाहिल्यानंतर बहुतांश इस्लाम दहशतवाद्यांचाच अधिक भरणा आहे. या परिस्थितीमुळे मुस्लिम धर्मावरच अविश्वास आणि या धर्माचा द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आपल्याकडे तर आणखी काही वर्षांनी मुसलमानांची लोकसंख्या हिंदूंना मागे टाकेल, असा अजेंडा जोरात सुरू आहे. अर्थात, जगभरातील मुस्लिम राष्ट्रांच्या लोकसंख्येत भारतातील मुस्लिम समाजाच्या आकड्याची दखल घेतली जाते. यावरून त्यांच्या वाढत्या आकड्यांची भीती दाखवली जाणे स्वाभाविक आहे. एका ठरावीक समाजाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच जर असा तयार केला जात असेल, तर मग त्या समाजाने वागावे तरी कसे? प्रत्येकवेळी या धर्मातील लोकांना आपला राष्ट्रवाद, देशप्रेम, बंधुभाव सिद्ध करावा लागत असेल, तर मग या धार्मिक लोकांच्या मनात शत्रुत्वाची भावना तयार होणे स्वाभाविक आहे. अगदी देशाची फाळणी आणि स्वातंत्र्यापासून हिंदू-मुस्लिम वाद कमी-अधिक प्रमाणात देशात सुरू आहे.
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी धर्माची पडताळणी करून कसे हिंदूंचे शिरकाण केले, हेच अधिकतर रंगवले जात आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीत तेथील स्थानिक मुस्लिम बांधवांनी आपल्या जीवावर उदार होऊन पर्यटकांचे जीव कसे वाचवले, त्यांना धीर कसा दिला, आपल्या घरात नेऊन त्यांना संरक्षण कसे दिले, या गोष्टी मात्र आपलेच हिंदू लोक आता आपापल्या सोशल मीडियावरून सांगू लागले आहेत. मुख्य प्रवाहातील मीडिया या गोष्टींपेक्षा दहशतवादी आणि त्यांच्या धर्मावरच अधिक जोर देण्याचे काम करत आहे. दहशतवाद्यांचा एक फोटो व्हायरल होत असून त्यात काही स्थानिकांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. हा फोटोचा अद्याप कुणीच अधिकृत पद्धतीने दुजोरा दिला नाही. दहशतवाद्यांची रेखाचित्रे जाहीर झाली आहेत तेवढी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने कठोर पाऊले उचलून पाकिस्तानला जबर इशारा दिला आहे, तसेच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचे स्वागत तर व्हायलाच हवे. पाकिस्तानी दहशतवादी आहेत, हे प्रथमदर्शनी स्पष्ट असल्याने पाकिस्तानला याची सजा मिळायलाच हवी. प्रत्येकवेळी दहशतवादाशी या देशाचा संबंध कसा काय येतो आणि यामुळे या देशाने दहशतवादाला खतपाणी घालण्याचे धोरण स्वीकारले आहे, असाच त्याचा अर्थ होतो. भारताला या लढ्यात अन्य देशांचे सहकार्य मिळायला हवे आणि पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून जाहीर करून आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानचा हा अमानवी चेहरा उघड करायला हवा.
पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र आहे, पण म्हणून आपले मुस्लिम बांधव हे आपले शत्रू आहेत, असे चित्र रंगवण्याचे जे काही प्रकार सुरू आहेत, त्याबाबत काळजी घ्यावी लागेलच. आपल्याच देशात राहून आपल्या देशाविरुद्ध कारवाई करणाऱ्यांना अद्दल घडवायला हवीच, पण म्हणून आपल्या वागण्यातून आपण देशाचे शत्रू तयार होणार नाहीत, याचीही काळजी घेणे अपेक्षित आहे. हा खूप संवेदनशील विषय असल्यामुळे त्याचा योग्य अभ्यास आणि चिंतन करूनच व्यक्त होणे सोयीचे ठरेल.

  • Related Posts

    अरे हे चाललंय काय?

    इतका गंभीर आरोप करूनही सरकार ढीम्मपणे गप्प कसे काय, असा सवाल गोंयकारांना पडला आहे आणि “अरे हे चाललंय तरी काय?” असे विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील बहुचर्चित कॅश फॉर जॉब…

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच आपली यंत्रणा सज्ज ठेवून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारवर अवलंबून राहिल्यास गोंयकारांचा कार्यभाग बुडण्याचीच अधिक शक्यता आहे. गोव्यात कायदा सुव्यवस्था, सामाजिक, आरोग्य, पर्यावरण, व्यवसाय आदी सर्वच स्तरांवर…

    You Missed

    10/11/2025 e-paper

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न नको

    अरे हे चाललंय काय?

    अरे हे चाललंय काय?

    08/11/2025 e-paper

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    दामू नाईक यांचा अभ्यास कच्चा !

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा

    गोंयकारांनीच पुढाकार घ्यावा
    error: Content is protected !!