
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी प्रकल्प आणि राजकीय विरोधकांना घेतले शिंगावर
डिचोली,दि.१२(प्रतिनिधी)
मये मतदारसंघातील नियोजित आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालयाला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज खुद्द मये गावांत जाऊनच थेटपणे ठणकावले. विकास प्रकल्पांना विरोध करण्याची ही मनोवृत्ती गावाच्या हिताची नाही. ही मनोवृत्ती पुढील पिढ्यांचे जबर नुकसान करणार असल्याचे सांगून, या मनोवृत्तीला बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी मयेवासियांना केले.
मये मतदारसंघात विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत विकास प्रकल्पांना विरोध करणाऱ्यांवर तुटून पडले. गोव्याच्या मुक्तीनंतर गेल्या ५० वर्षांत फक्त भाजपने गोव्याचा विकास केला आहे. पायाभूत सुविधांची गरज आहे. सरकारच्या जमिनीवर गावासाठी लाभदायक ठरेल असे विकास प्रकल्प येत असतील, तर त्याला विरोध करण्यात काय अर्थ आहे? असा सवाल करून, मयेवासियांना सनदा देण्याचे काम फक्त भाजपने केले आहे, हे विसरून चालणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
कुठल्याही गावांत किंवा परिसरात एखादा राष्ट्रीय प्रकल्प उभा राहतो, तेव्हा त्याचा लाभ सभोवतालच्या परिसराला आपोआप होतो. पुढील पिढीच्या भवितव्याचा विचार करूनच हे प्रकल्प आणले जात आहेत. काही लोक केवळ राजकीय विरोधातून या प्रकल्पांना विरोध करत असून, ही मनोवृत्ती राज्यासाठी चांगली नाही, असेही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. शैक्षणिक संस्थांना विरोध करण्याची ही मनोवृत्ती पुढील पिढीचे नुकसान करणारी आहे. आयआयटी, आयआयएम, कायदा महाविद्यालय आदींमुळे विद्यार्थ्यांना पुढील भविष्यकाळात वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेण्याची संधी प्राप्त होणार आहे, असेही यावेळी डॉ. सावंत म्हणाले.
राजकारण निवडणुकीवेळी निश्चित करा. या राजकारणाला कसे प्रत्यूत्तर द्यायचे, हे भाजप जाणून आहे. विकासकामांत मात्र राजकारण करू नका. आत्तापर्यंत काँग्रेसने काय दिवे लावले हे जगजाहीर आहे, आणि आत्ता कुणीतरी फॉरवर्ड आणि बँकवर्ड म्हणून फिरत असतात त्यांनाही जनता ओळखून आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांनाच शिंगावर घेतले.
सत्य जाणून घ्यावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर टीका करण्यापूर्वी सत्य जाणून घ्यावे. विनाकारण लोकांना दोष देऊन आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करू नये, असे प्रत्युत्तर आंतरराष्ट्रीय कायदा महाविद्यालयाच्या विरोधकांनी दिले आहे. मुळात या महाविद्यालयासाठीची नियोजित जागा हा पवित्र चव्हाटा आहे. जिथे जत्रेपूर्वी श्री देवी केळबाय आणि श्री देवी महामाया विसावा घेतात. माशेल येथील श्री देव पिसो रवळनाथ देखील येथे आशीर्वाद देतात. गावातील लोकांसाठी ही जागा पवित्र आणि ऐतिहासिक महत्त्वाची आहे. गावातील पूर्वापार परंपरा आणि धार्मिक रीतिरिवाजांशी निगडीत ही जागा असल्याने तिथे बदल केल्यास त्याचे थेट परिणाम गावाच्या परंपरेवर होणार आहेत. या व्यतिरिक्त, या नियोजित जमिनीवर सुमारे २५ घरे, प्राथमिक शाळा, वाचनालय, स्मशानभूमी, आदिनाथ मठ, पारंपरिक देवाची वाट आणि इतर बारीक सारीक धार्मिक स्थळे आहेत.