अप्रतिष्ठेच्या पलिकडे; भंडारी समाज आणि स्व-ओळख

बहुजन समाजाची उभारणी: एकोणीसावे शतक ते मुक्तीनंतरची जाणीव, प्रतिवाद आणि प्रतिपादन

गोवा विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रोफेसर पराग पोरोब यांनी सादर केलेल्या डॉक्टरेट संशोधन प्रबंधात गोव्यातील विविध जातींच्या इतिहासाचा एकोणीसावे शतक ते गोवा मुक्तीनंतरचा आढावा घेतला आहे. या प्रबंधातील भंडारी समाजाशी संबंधीत प्रबंधाचा हा मराठी अनुवाद

१९ व्या शतकाच्या अखेरीस भंडारी समाज म्हणजे ताडीमाडी गाळणारा समाज अशी ओळख होती. हा समाज गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पश्चीम किनारपट्टीजवळ पसरला होता. या समाजाला शुद्र म्हणून उल्लेखला जात होता आणि त्यावरून समाजधुरीणांच्या मनांत अनेक प्रश्न तयार होत होते. भंडारी समाज विविध पोटजातींमध्ये विभागला गेला होता. कित्ते, हेतकरी, शिंदे, गवाड, थाले, शेशवंशी आणि मोरे. कित्ते आणि हेतकरी जे बहुसंख्य होते ते कोकण किनारपट्टीवर वसले होते, इतरांची संख्या कमी होती. या पोटजाती देखील एका समान जातीत ओळखल्या जात नव्हत्या. त्यातही त्यांच्या पारंपारिक तथा अनुषांगिक व्यवसायांवरून त्यांची विभागणी झाली होती. बहुसंख्य भंडारी हे समाजात मान नसलेल्या किंवा कमीपणा समजल्या जाणाऱ्या ताडीमाडी गाळण्याच्या तसेच या व्यवसायासाठी भाडेपट्टीवर माड घेण्याचा व्यवसाय करत होते.
या काळात ह्याच समाजातील काही लोक अन्य व्यवसायात प्रवेशकर्ते झाले होते आणि आर्थिक प्रगतीमुळे ते सुधारित म्हणून ओळखले जाऊ लागले होते. गोव्यात भंडारी समाजातील सगळ्यात मोठी जात म्हणजे हेतकरी आणि त्यांची पोंय- कापे अशी विभागणी झाली होती. हे प्रामुख्याने माडापासून ताडी काढणे आणि त्यापासून दारू तयार करणे तसेच इतर शेतीसंबंधीत व्यवसायात होते.
एकोणीसाव्या शतकात जेव्हा मुंबईसारख्या शहरात सामाजिक स्तरावर जाती व्यवस्थेला महत्व आणि मान प्राप्त होऊ लागला होता तेव्हा तिथे स्थित काही भंडारी बांधवांनी व्यापार, वसाहती प्रशासन, छपाई आणि प्रकाशन व्यवसायात चांगल्यापैकी जम बसवला होता. मराठी छपाईत गणपत कृष्णाजी यांचे महत्वाचे योगदान राहीलेले आहे. ते जातीने भंडारी होते. १८४० साली त्यांनी तांत्रिक अविष्कारांसह मराठी छपाई विकसीत केली. पहिले पंचाग प्रकाशीत करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे आणि त्यामुळे त्यांचा लौकिकही होता. दुसरे व्यक्तीमत्व म्हणजे तुकाराम तात्या पडवळ जे मुंबईतील एका यशस्वी भंडारी कुटुंबातून आले होते आणि ते युरोपीअन कंपनीसाठी लंडनमध्ये व्यवसाय करत होते. १८६१ साली पडवळ यांनी जातीभेद विवेकसारा हे पुस्तक लिहीले जे प्रामुख्याने ब्राह्णेत्तर जातींवरील पहिली टीका म्हणून ओळखली जाते. त्यांनी जात शुद्धीकरण याच्यावर प्रहार केला आणि जातनिहाय सामाजिक एकीकरणावर टीका केली. या घडामोडींचा भंडारी समाजाच्या प्रगतीवर मात्र काहीच दृश्य परिणाम झाल्याचे दिसले नाही.
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्थ मुंबई सरकारने १८७८ चा अबकारी कायदा दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला जो भंडारी समाजाच्या व्यवसायावर आणि उत्पन्न स्त्रोतावर दूरगामी परिणाम करणारा ठरणारा होता, त्याविरोधात भंडारी समाजाच्या एकीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. या कायद्याद्वारे माडांवर अतिरीक्त कर लादण्यात आला होता तसेच माडापासून दारू निर्मितीवरही अनेक निर्बंध जारी करण्यात आले होते. या व्यवसायात नव्याने दाखल झालेल्या श्रीमंत व्यवसायिकांना लाभ मिळवून देऊन पारंपारिक दारू निर्मिती करणाऱ्यांवर हे संकट ठरणार होते. दारू निर्मितीचे व्यापारीकरण ब्रिटीश सरकारने केल्यामुळे त्यात दारू व्यवसायात प्रामुख्याने असलेल्या पारसी समाजाला मोठा फायदा झाला होता. पारसी लोकांचे दारूनिर्मिती व्यवसायावर वर्चस्व होते. या नव्या बदलातून भंडारी समाजाचे या व्यवसायातील अस्तित्व धोक्यात येण्याच्या भितीने हा समाज एकवटला. त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. आंग्ल-पोर्तुगीज करार-१८७८ अंतर्गत गोव्याचा दारू व्यवसाय मुंबई अबकारी कायद्याअंतर्गत चालू होता. यामुळे गोव्याची दारू ब्रिटीश इंडियात विकण्यास निर्बंध जारी करण्यात आले तसेच रत्नागिरी आणि कारवार येथील माडाच्या ताडीपासून दारू निर्मिती करण्यासंबंधी लागू असलेल्या कर आकारणीत समानता आणण्यात आली. गोव्यातील दारू निर्मिती करणाऱ्यांवर आणि विशेष करून भंडारी समाजातील व्यवसायिकांवर याचा मोठा परिणाम झाला. माडांवरील कर टप्प्याटप्याने वाढत गेला आणि त्याचा परिणाम म्हणून गोव्यातील भंडारी ज्ञातीबांधवांनी निदर्शने करून वसाहती राज्याची अधिकारिणी स्वीकारण्यास नकार दर्शवला. या व्यतिरीक्त १९०९ साली मागास जमातींच्या हीतार्थ सामुहीक प्रतिनिधीत्वाच्या विषयावरून मुंबईत भंडारी समाजाच्या एकीकरणाच्या चळवळीला बळकटी प्राप्त होत होती. यातून मुंबई विधीमंडळ आणि नगरपालिकांत राखीवता प्राप्त होणार होती.
एकोणीसाव्या शतकाचा शेवट आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी भंडारी समाजाच्या मानसिकतेत बदल घडत होता. भंडारी समाजातीलच विविध पोटजातींचे एकीकरण करण्याची गरज त्यांना वाटु लागली. १८९० साली कित्ते भंडारी एक्यवर्धक मंडळी या भंडारी समाजाच्या तत्कालीन मुंबईतील संघटनेने एकीकरणासाठी आवाहन केले. ही संघटना सिताराम केशव बोळे या ब्राह्णेत्तर सुधारकाने स्थापन केली होती. त्यात मतभिन्नता होतीच. कित्ते जातींच्या एकीकरणाचे मुख्य लक्ष्य या संघटनेचे असले तरी हळूहळू एकीकरणाचे हे वारे भारताच्या पश्चीम किनारी पट्ट्यात पोहचले. भंडारी समाजातील दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेले तिसरे व्यक्ती म्हणजे बोळे, जे अबकारी खात्यात निरिक्षक होते. परंतु नंतर त्यांनी आपले सर्वस्व भंडारी समाजाच्या उद्धाराकरिता वेचले. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भंडारी समाजाचे एकीकरण आणि प्रगती यासाठी स्थापन केलेल्या भंडारी शिक्षण परिषदेचे ते संस्थापक सदस्य होते. १९१३ साली मुंबईत पहिली भंडारी शिक्षण परिषद त्यांनी भरवली. बोळे हे आधुनिक मुंबई सुतगिरणी कामगार संघटनेचे नेतेही होते. १९२९ साली मुंबईच्या पर्यायी सरकारने त्यांना सुतगिरणी कामगारांची एकजुट केल्यामुळे मुंबई विधीमंडळात प्रतिनिधीत्व दिले होते. यावेळी गिरणी कामगार चळवळीसह ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृशता हटाव चळवळीलाही पाठींबा देत होते.
भंडारी समाजाला नवी ओळख हवी होती आणि त्याची जिज्ञासा त्यांच्यात होती आणि त्यातून समाजाच्या एकीकरणाचा विचार घोळत होता. एकोणीसाव्या शतकात जेव्हा ब्रिटीश सरकारने भारतात दारूवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तो व्याख्याने आणि आणि राजकीय भाषणांचा विषय बनू लागला. दारू सेवन आणि प्रतिष्ठा याबद्दलच्या सामाजिक कल्पना बदलू लागल्या होत्या. या चळवळीला भारतात आणि पोर्तगीज गोव्यातही महत्व मिळू लागले. एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस दारूबंदीच्या मागणीला गोव्यात गती प्राप्त होऊ लागली. तोपर्यंत उच्चवर्गातील लोक दारूचे सेवन करणे प्रतिष्ठेचे समजत होते. दारूचा प्रसार हा धार्मिक जीवनाला बाधक ठरू शकतो, अशी धारणा तयार झाली होती. उच्चवर्ग समाजात दारूला प्रतिष्ठा होती. ते सुशिक्षित आणि बहुतांश वाचक होते आणि त्यामुळे दारूबंदीच्या विषयावरून लिखाण करणे मासिकांसाठी कठीण बनले होते.
१९२७ सालच्या सातव्या काँग्रेसो प्रोव्हेनशीएलमध्ये हा विषय चर्चेला आला होता. पोर्तुगीजांच्या गोवा वसाहतीत दारूमुळे उदभवलेल्या प्रश्नांवर चर्चा झाली. या वारंवार चर्चेतून दारू ही समाजासाठी घातक, अनैतिक आणि धोक्याची अशी धारण जोर धरू लागली. याचा परिणाम असा झाला की पारंपारिक दारू निर्मीती व्यवसायात असलेल्या भंडारी समाजावर त्याचा विपरित परिणाम झाला आणि त्याचे पर्यावसान हा समाजाकडे अनादर पद्दतीने पाहण्यात झाले. या एकूणच परिस्थितीत समाजाच्या नव्याने एकीकरणाचे प्रयत्न सुरू झाले. एतिहासिक दृष्ट्या भंडारी हा शुद्र समाज म्हणून ओळखला जात होता. त्यांच्या सामाजिक स्थानाबाबत मतभिन्नता होतीच. तोपर्यंत भंडारी समाजाची वेगळी प्रतिमा तयार होत होती. पहिल्या प्रथम त्यांनी त्यांच्या जातीच्या उत्पत्तीबद्दल असलेल्या समजालाच आव्हान दिले. संस्कृतमध्ये या जातीला मंदारक म्हणजे मद्याची निर्मिती करणारा समाज असे होते, त्यालाच त्यांनी आक्षेप घेतला. भंडारी हे नाव भंडार या शब्दापासून आले, ही संकल्पना त्यांनी पुढे केली. भंडाराचे रक्षणकर्ते अशी नवी ओळख तयार करून त्यांनी हा समाज क्षत्रिय असल्याचा दावा करायला सुरूवात केली. या अनुषंगाने सखाराम हरी गोलतकर यांनी भंडारी जातीचा इतिहास हे मराठी पुस्तक १८९० ते १९०९ या काळात लिहीले. गोलतकर हे भंडारी समाजात जन्मलेले आणि मुंबईत स्थायिक झालेले होते. ते इतिहासाचे अभ्यासक होते. त्यांनी इतिहास संशोधनातून भंडारी समाजाची ओळख बदलण्याचा प्रयत्न केला. भंडारी समाजाच्या जात ओळखीला इतिहासाची साक्ष कमी आणि सामाजिक जीवनाचा आधार जास्त होता. गोलतकर यांनी याला वेगळा आयाम देताना भंडारींचे क्षात्रतेज जागवून या जातीला मराठ्यांच्या बरोबरीने आणण्याचा प्रयत्न केला. याबाबतीत गोलतकर यांनी एतिहासिक घटनांच्या बारकाव्यांचा अभ्यास केला. संस्कृत श्लोक, सुभाषिते, इतिहास, वसाहत साहित्य या सर्वांचा त्यांनी आधार घेतला. भंडारींची उत्पत्ती बहुगुण याच्यापासून झाली इथेच त्यांनी बोट ठेवले. शिवशंकराच्या घामाच्या थेंबापासून भंडारीचा जन्म झाला ही आख्यायिका होती. शिवशंकाराने बहुगुणाला पाणी आणण्यासाठी पाठवले. त्याने पाण्याचे स्त्रोत काय असे विचारले, तेव्हा शंकाराने माड निर्मिला. त्या माडचे नारळ आण असे त्यांनी सुनावले. बहुगुणा याच्याशी संबंधीत देवी पार्वतीशी संबंधीत एक आख्यायिका आहे. तीने बहुगुणाला माडाची ताडी काढून उदरनिर्वाह करण्याचा श्राप दिला होता. भंडारी समाजाला क्षत्रिय म्हणण्यात उच्चवर्णिय आणि विशेष करून क्षत्रिय मराठ्यांकडून हरकत घेतली जाणार हे ते ओळखून होते. त्यांनी यासंबंधी नवा इतिहास लिहीला ज्यात उत्तर भारतावर जेव्हा रजपूतांचे वर्चस्व होते, रजपूतांनी डेक्कनवर विजय मिळवला आणि त्यात भंडारींच्या पराक्रमाचा उल्लेख त्यांनी केला. भंडारी हे रजपूतांचे वारस असल्याची नवी ओळख त्यांनी तयार केली. जे शूरवीर होते. रजपूतांचे वारसदार म्हणून मराठ्यांचीही ओळख होती. गोलतकर यांनी भंडारींची उत्पत्ती रजपूतांशी दाखवली आणि गोवा हे त्यांचे आदिस्थान असल्याचा दावा केला. हे करत असताना त्यांनी कदंब राजघराण्याशीही भंडारींचा संबंध जोडला. ज्यांची उत्पत्ती ही देखील शंकराच्या घामाच्या थेंबापासून बहुगुणा प्रमाणेच झाल्याची आख्यायिका होती.
केवळ भंडारींच्या क्षात्रतेजाचा नव्हे तर एतिहासिक संदर्भांचाही त्यांनी शोध लावला. या सगळ्यांचा आधार घेऊन भंडारी हे मराठा असल्याच्या मुद्दा ठासून सांगितला गेला. शिवाजी महाराजांपासुन भंडारींना सैन्याची पार्श्वभूमी आहे. हेतकरी भंडारी हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते. १६६० मध्ये तत्कालीन आरमाराचे प्रमुख हे वसईचे ‘मायाजी भाटकर ‘ ऊर्फ ‘मायनाक भंडारी’ होते.
सतराव्या शतकात ब्रिटीश आणि पोर्तुगीज सैन्यात भंडारी होते. १६७२-७३ साली ब्रिटीशांनी भंडारी दल स्थापन केला होता. १७२८ साली चौल किल्ल्यावरील सैन्यात २३४ भंडारी सैनिक होते. एकोणिसाव्या शतकात भंडारी हे मराठाच होते, असा दावा घट्ट झाला होता. यामुळेच कदाचित एस.एम. एडवर्ड यांनी भंडारी हे मराठा होते असा उल्लेख केलेला आढळतो. केवळ उदरनिर्वाहासाठी भंडारींना ताडीमाडी व्यवसाय करावा लागला. त्यांच्या व्यवसायाचा संबंध त्यांच्या जातीशी लावणे अयोग्य आहे, असेही मत तयार झाले होते. गोलतकरांचा हा दावा भंडारींना प्रेरणादायक ठरला. भंडारींना शिवाजी महाराजांशी त्यांचा असलेला संबंध अधोरेखीत करण्यात आला. भंडारी समाजाच्या बैठका, परिषदा आदींत गोलतकरांचे हे दावे प्रामुख्याने उल्लेखले जात होते.
मुंबईतील भंडारी समाजाच्या या एकजुटीचा विस्तार हळूहळू गोव्यातही होऊ लागला. पणजी शहरांतून भंडारींच्या एकजुटीची चळवळ सुरू झाली. १८४३ साली पणजीचे नागरीकरण झाले आणि त्यात नव्या लोकांचे स्थलांतरण झाले. तिथे नवी घरे, सरकारी इमारती उभ्या राहील्या. पणजीचा विस्तार होत गेला तशी पणजीतील माडांची संख्या कमी झाली. दारूविक्रीवर कर संकलनासाठी नवे नवे निर्बंध लागू होऊ लागले. हळूहळू पणजीतील भंडारी बांधवांनी इतर व्यवसायात लक्ष घालायला सुरूवात केली. त्यात गंवडी, सुतार, कंत्राटदार, व्यापार आदी व्यवसाय स्वीकारले. बाबलो मसणो नाईक वळवईकर या भंडारी बांधवाने गोव्यातील भंडारी समाजबांधवांना एकत्र आणून त्यांचा विकास आणि प्रगतीसाठी कार्य सुरू केले. १९२० साली जास्तीत जास्त कर भरणाऱ्या ९० लोकांत त्यांचा समावेश होता. माडावरील कर वाढतच होता, परंतु पणजी सभोवतालचे भंडारी लोक हे अन्य उदरनिर्वाहाचा पर्याय नसल्याने प्रामुख्याने माडाच्या ताडीचा पारंपारिक व्यवसायावरच अवलंबून होते. विसाव्या शतकाच्या प्रारंभी जे भंडारी आर्थिक दृश्ट्या विकसीत झाले होते, त्यांनी भंडारींच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू केले. कोकणातील भंडारी समाजाच्या एकजुटीचा आदर्श घेऊन त्यांनी हे काम सुरू केले होते. मालवण येथे १८९२ साली भंडारींसाठी शाळा सुरू केली होती. रावजी रामजी गंगा नाईक यांनी १९०९ साली मुंबईतून भंडारी विहारी हे मासिक सुरू केले होते. या मासिकामुळे विसाव्या शतकात भंडारी एकत्र आले. याच प्रेरणेतून पणजीत १९१० साली श्री पांडुरंग प्रासादिक विद्याभवनची स्थापना करण्यात आली. शिक्षणातून समाजाचा उद्धार असे ध्येय ठेवण्यात आले. बाबलो मसणो नाईक वळवईकर आणि लक्ष्मण काशिनाथ खर्डे यांचे महत्वाचे योगदान यात होते, जे या संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव होते. या संस्थेच्या स्थापनेनिमित्त गोलतकर यांच्या साहित्याचा आणि भंडारींच्या क्षात्रतेजाच्या इतिहासाचा उल्लेख केला जात होता.
विसाव्या शतकात तोपर्यंत शिक्षणाचे महत्व अधोरेखीत झाले होते. १९११ साली श्री पांडुरंग प्रासादिक विद्याभवन संस्थेने मराठी ग्रंथालय आणि १९३० साली प्राथमिक मराठी शाळा सुरू केली. यावेळी त्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागले. त्यांनी पणजीतील भंडारी बांधव तसेच पणजी बाहेरील अन्य समाजाच्या लोकांकडूनही रोख आणि पुस्तकांच्या रूपात देणग्या मिळवल्या. १९१३ साली श्री शांतादुर्गा प्रासादिक संगीत नाटक मंडळी यांनी जिथे कुंभारजुवेतील भंडारी आणि खारवी समाज बांधवांचा समावेश होता त्यांनी निधी संकलनासाठी नाट्य प्रयोगाचे आयोजन केले. सुरूवातीच्या काही काळात पणजीतील भंडारी बांधवांना एकत्र आणण्यात श्री पांडुरंग प्रसादिक विद्यभवन संस्थेने यश मिळवले.
१९१३ साली मुंबईत भंडारी शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली. पश्चिम किनार पट्टीतील भंडारी समाजाला एकत्र आणण्याचे ध्येय त्यांनी उराशी बाळगले. या परिषदेला गोव्यातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी हजर होते. लक्ष्मण काशिनाथ खर्डे यांनी गोव्यातील भंडारींचा मागासलेपणा आणि शिक्षणाचा अभाव प्रामुख्याने मांडला. १९२० साली भंडारी एकजुटीच्या चळवळीला चालना मिळाली. १९२१ साली वारंवार माडाच्या करात वाढ झाल्याने भंडारी समाजाने आंदोलन छेडले. हे आंदोलन वाढले आणि सरकारला माघार घेण्यास या आंदोलनाने भाग पाडले आणि पहिल्यांदाच भंडारी समाजाची एकजुट अधोरेखीत झाली. १९२४ साली बाबलो मसणो नाईक वळवईकर हे वेंगुर्ला येथे आयोजित भंडारी शिक्षण परिषदेला हजर राहीले. या परिषदेत गोव्यात पोर्तुगीज सरकारने मागास घटकांसाठी मराठी शाळा सुरू करावी, असा ठरावही मंजूर केला. या परिषदेत गोव्यात भंडारी समाजाला एकत्र आणण्यासाठी सामाजिक चळवळ उभी करण्याचाही ठराव समंत करण्यात आला. या परिषदेला मुंबईतील प्रमुख भंडारी नेते हजर होते. गोव्यात नव्या संस्था स्थापन करण्याबाबत या परिषदेत चर्चा झाली. १९२४ साली बोळे आणि आनंदराव सुर्वे हे बेळगांवला आले होते. काँग्रेसच्या वार्षिक संमेलनाला जे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झाले होते. त्यांना गोव्यात येण्याचे आमंत्रण देण्यात आले. १९२४-२५ मध्ये गोव्यात आल्यानंतर त्यांचा सत्कारही करण्यात आला. बाबलो मसणो नाईक वळवईकर यांच्या नेतृत्वाखाली भंडारी समाजाचे चार गट एकत्र आले होते. त्यांनी क्षत्रिय भंडारी समाजाची स्थापना केली. यावेळी गोलतकर यांचीही गोवा भेट झाली आणि त्यांची भंडारी समाजाच्या इतिहासावर व्याख्याने आयोजित करण्यात आली. मालवण भंडारी हायस्कूलचे सर्वेक्षक आणि भंडारी शिक्षण परिषदेचे सरचिटणीस रघुनाथ व्ही. कांबळी यांनी पहिल्या गोमंतक क्षत्रिय भंडारी संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या घडामोडीतून रूद्रेश्वर प्रासादिक भंडारी शिक्षणोतेजक समाज, श्री शिवाजी विद्यालय, गोमंतक भंडारी संघ आणि अखिल गोमंतकीय क्षत्रिय भंडारी संघ १९२५ साली स्थापन करण्यात आला. शिक्षणाचा प्रसार आणि भंडारी शिक्षण परिषदेच्या कार्यासाठी या संस्था स्थापन करण्यात आल्या.
१९२६ साली पणजी येथे तेरावी तीन दिवसीय भंडारी शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे दोन हजार प्रतिनिधी या परिषदेला हजर राहीले. शिक्षणातूनच समाजाचा उद्धार होणार असल्याचा संदेश या परिषदेतून देण्यात आला. सुर्वे यांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले तर भंडारी समाजाचे अनेक धुरीण या परिषदेला हजर होते. दुसऱ्या दिवशी पोर्तुगीज गव्हर्नर हजर राहीले आणि भंडारी समाज शिक्षणाचा प्रसार करत असल्याबद्दल गौरवोद्रार काढले. भंडारी समाजाचे मागासलेपण दूर करण्याबरोबरच भंडारी समाजाला मराठा ओळख प्राप्त व्हावी यावर जोर देण्यात आला. समाजसुधार आणि मंदिरांतील अधिकारांच्या विषयावर बरीच गरमागरम चर्चा झाली. समाजाच्या स्वतंत्र ओळखीसाठी समाजबांधवांचे मंदिर असणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त झाले. पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिरावर गौड सारस्वत समाजाने केलेल्या दाव्याला बाबलो मसणो नाईक वळवईकर यांनी आव्हान दिले. भंडारी बांधवांना या देवस्थानचे गांवकार तथा महाजन घोषित करण्यात आले.
या घटनांतूनच इतिहासाची कशी छेडछाड झाली तो विषयही चर्चेला आला. हा प्रदेश भंडारी समाजाचे मुळ आहे, परंतु धार्मिक अत्याचारांमुळे भंडारींना प्रदेश सोडून जावे लागले. हरवळे येथील श्री रूद्रेश्वर हे भंडारी समाजाचे दैवत असून त्यान्वये या समाजाला एक वेगळी ओळख प्राप्त झाली.
भंडारी समाजाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत शिवाजी महाराजांचा इतिहास हा केंद्रबिंदू होता. केवळ शिवाजी महाराजांची नाटकेच नव्हे तर शिवजयंती उत्सवही साजरा करण्यात आला. १९२७ साली पणजी येथे क्षत्रिय भंडारी समाजातर्फे त्रिशतकोत्तर शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव तीन दिवस साजरा करण्यात आला. श्री पांडुरंग प्रसादिक विद्यभवन ते बाबलो मसणो नाईक वळवईकर यांच्या घरापर्यंत शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. भंडारी समाजाची मराठा ओळख अधोरेखीत करण्यासाठीचा हा प्रयास होता. या संस्थांमुळे भंडारी समाजात शिक्षणाचा प्रसार होण्यात मदत झाली. मराठी शिक्षणाचा पणजीतील समाजबांधवांना लाभ झाला मात्र इतर भागातील समाजबांधव अजूनही वंचित राहीले होते. सुशिक्षित भंडारी समाज बांधवांना प्रशासनात प्रवेश मिळायला लागला होता. गौड सारस्वत समाजात याबाबत चलबिचलता सुरू झाली कारण प्रशासनांत त्यांचे वर्चस्व होते. जमीनदारी आणि ग्रामीण अर्थकारणावर सारस्वतांचे वर्चस्व होते, पण त्यांच्याकडून इतर मागास समाजाचा मागासलेपणाचा डाग पुसून टाकण्यासाठी विशेष प्रयत्न केले नाहीत आणि म्हणूनच ते टीकेचे कारण ठरले होते.

  • Related Posts

    युवकांना व्यक्त व्हावंच लागेल

    गोव्यात सध्या नोकरीसाठी रोख देण्याच्या प्रकरणांमध्ये बरीच वाढ होत असल्याने तो चिंतेचा विषय ठरला आहे. अनेक बेरोजगार तरूण सरकारी नोकरीच्या आशेने या तथाकथित दलालांच्या जाळ्यात अडकून लाखो रूपयांना गंडवले गेले…

    महिना किमान फक्त १०० रूपये…

    “गांवकारी ” या स्वतंत्र पत्रकारितेच्या प्रयोगाला आपली भक्कम साथ मिळाली तर लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल हे निश्चित. आपण खरोखरच यासाठी आम्हाला साथ देणार आहात का ?…

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    You Missed

    21/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    21/12/2024 e-paper

    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 8 views
    खबरदार ! सनबर्नबद्दल गैर बोलाल तर…

    ऑर्डर.. ऑर्डर…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 21, 2024
    • 7 views
    ऑर्डर.. ऑर्डर…

    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 5 views
    तुची डोळे उघड न्यायदेवते…

    20/12/2024 e-paper

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 6 views
    20/12/2024 e-paper

    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?

    • By Gaonkaari
    • डिसेंबर 20, 2024
    • 8 views
    राजेश नाईक यांचा ‘गॉडफादर’ कोण ?
    error: Content is protected !!