बांबोळीतील धेंपो महाविद्यालयात नांदी संमेलन; ऐतिहासिक शंभराव्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ९९ संमेलनांचे आयोजन
गांवकारी, दि. २९ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शतकमहोत्सवी पर्वाची नांदी गोव्यातही घुमणार आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी बांबोळी येथील धेंपो महाविद्यालयात विशेष नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. जानेवारी २०२७ मध्ये पुण्यात होणाऱ्या ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ९९ नांदी संमेलने आयोजित करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून मराठी साहित्य चळवळ अधिक व्यापक करण्याबरोबरच विविध भागांतील साहित्यिकांना राष्ट्रीय व्यासपीठाशी जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी दिली.
पणजी येथे गुरुवारी आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा तरुण भारतचे समूह संपादक डॉ. किरण ठाकूर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात २८ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाची व्याप्ती केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता देशभरातील मराठी भाषिकांना त्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून विविध राज्यांत नांदी संमेलने आयोजित केली जात आहेत. गोव्यातील संमेलनानंतर १५ नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे नांदी संमेलन होणार आहे.
साहित्यिकांना राष्ट्रीय व्यासपीठाशी जोडण्याचा प्रयत्न
नांदी संमेलनांचा उद्देश केवळ मुख्य साहित्य संमेलनाचे निमंत्रण देणे एवढाच नसून स्थानिक साहित्यिकांशी थेट संवाद साधणे, त्यांच्या साहित्यिक कार्याची दखल घेणे आणि त्यांना राष्ट्रीय साहित्य चळवळीत सक्रिय सहभागी करून घेणे हा आहे. कवी, लेखक, कथाकार, शिक्षक, ग्रंथपाल, पत्रकार तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे.
गोव्यातील साहित्यिकांना शंभराव्या साहित्य संमेलनातील परिसंवाद, चर्चासत्रे आणि अन्य साहित्यिक उपक्रमांमध्ये अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. साहित्य क्षेत्रातील सर्व घटकांना समान संधी मिळावी, यासाठी विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले.
मराठी साहित्य संमेलनांची परंपरा ही केवळ साहित्यिकांच्या भेटीगाठींची नसून भाषिक अस्मिता, साहित्य संवर्धन आणि सामाजिक-सांस्कृतिक विचारमंथनाची आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर या संमेलनांच्या माध्यमातून विचारमंथन झाले आहे. मराठी भाषेचे भवितव्य अधिक समृद्ध करण्यासाठी साहित्य संस्था, शासन आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
मराठीच्या संवर्धनासाठी संस्थांना बळ द्या : डॉ. किरण ठाकूर
गोव्यात मराठी भाषेच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थांना आवश्यक सहकार्य व आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज डॉ. किरण ठाकूर यांनी व्यक्त केली. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी विविध संस्थांच्या कार्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. नांदी संमेलनांच्या माध्यमातून साहित्यिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याची संधी उपलब्ध होत असून, महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक केंद्रांनाही या साहित्य चळवळीशी जोडण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
१०१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोव्यात व्हावे : रमेश वंसकर
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतरचे १०१ वे संमेलन गोव्यात आयोजित करण्यात यावे, अशी अपेक्षा गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी व्यक्त केली. यासंदर्भात साहित्य संमेलनाच्या नेतृत्वाशी प्राथमिक चर्चा झाली असून, गोव्याला यजमानपद मिळावे यासाठी सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
गोव्याला मराठी साहित्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. येथील साहित्यिकांनी मराठी साहित्यविश्वात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. या योगदानाची राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक दखल घेतली जावी आणि गोव्यातील नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी १०१ वे साहित्य संमेलन गोव्यात होणे महत्त्वाचे ठरेल, असे वंसकर यांनी सांगितले.
गोव्यातील आगामी नांदी संमेलनामुळे राज्यातील मराठी साहित्य चळवळीला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





