गांवकारी, दि. १४ (प्रतिनिधी)
गोवा विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातींना (एसटी) राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या, रविवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सांगे तालुक्यातील वाडे येथे आदिवासी समाजाच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला आमदार गोविंद गावडे, युनायटेड ट्रायबल असोसिएशन्स अलायन्सचे (उटा) अध्यक्ष प्रकाश वेळीप, विश्वास गावडे यांच्यासह आदिवासी समाजातील अन्य प्रमुख नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
गोव्यातील अनुसूचित जमातींना विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण मिळावे, ही मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी आदिवासी संघटना आणि समाजातील नेत्यांकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येच्या अंदाजासंदर्भातील सरकारी अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिल्यामुळे आरक्षणाच्या प्रक्रियेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राजकीय आरक्षणासाठी पुढील काळात कोणती भूमिका घ्यावी, सरकारकडे कोणत्या मागण्या मांडाव्यात आणि २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कोणती रणनीती आखावी, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आदिवासी समाजातील विविध नेते या बैठकीत एकत्र येणार असल्याने राजकीय आरक्षणाच्या लढ्याला नवी दिशा मिळणार का, याकडे राज्यातील आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.







