मेगा प्रकल्पांना गोव्यात थारा नकोच
गांवकारी, दि. १७ (प्रतिनिधी)
नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी विक्री केलेल्या खाजगी जमिनीत सुरू असलेल्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीचे आमदार विरेश बोरकर यांनी कारापूरात धडक देऊन जोरदार डरकाळी फोडली. या आंदोलनाला पाठिंबा देणारे ते पहिले आमदार ठरले आहेत. विश्वजीत राणे यांच्या भीतीपोटी एकही आमदार कारापूरात पोहोचलेला नाही, अशी येथील लोकांची भावना आहे.
राज्यात मेगा प्रकल्पांना अजिबात थारा देता कामा नये. गोव्याचे रक्षण करण्यासाठी सर्व मतभेद विसरून गोंयकारांनी एकत्र येण्याची गरज आहे. कारापूरवासियांना या लढ्यात गोंयकारांनी साथ देणे आवश्यक आहे. आपण कारापूरचा हा विषय घेऊन विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे विरेश बोरकर यांनी सांगितले.
कारापूरातील या जमिनीच्या मालकीचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अनेकांच्या पारंपारिक वाटा बंद करण्यात आल्या आहेत. आपल्या अधिकारांचा गैरवापर करून या प्रकल्पाला वेगवेगळ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
या सरकारला घरी पाठवण्याची गरज
या सरकारला घरी पाठवणे ही काळाची गरज आहे. या सरकारने सर्वच स्तरांवर कायदे व नियम धाब्यावर बसवले आहेत. हे सरकार सुधारेल अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. वादग्रस्त ३९ (ए) कलमाखाली संपूर्ण गोव्याचे रूपांतर करून इथल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचे कारस्थानच या सरकारने रचल्याचा आरोप त्यांनी केला.
स्थानिक लोक आंदोलन करत असताना स्थानिक आमदार हजेरी लावत नाहीत, हे दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली. हा प्रकल्प उभा राहिल्यास अरुंद रस्त्यांमुळे रस्त्याशेजारील घरे पाडण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले. राज्यभरात पाण्याची टंचाई आहे. असे प्रकल्प उभे राहिल्यास स्थानिक लोकांना पाण्यासाठी तहान सहन करावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भू-संरक्षण कायद्याच्या मसुद्यावर चर्चा हवी
विधानसभेत खाजगी विधेयकाच्या रूपात सादर केलेल्या भू-संरक्षण कायद्याच्या मसुद्यावर चर्चा होण्याची गरज आहे. सरकारने तातडीने विधानसभेचे अधिवेशन बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली.
या खाजगी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर कुणाच्या परवानगीने नेमण्यात आले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नारीशक्ती वंदनाची वल्गना करणाऱ्या सरकारला आपला गाव वाचविण्यासाठी मागील १३ दिवस रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या महिलांचा आदर नाही काय, असा प्रश्नही त्यांनी केला.
या लढ्यात आरजीपी आणि आपल्या मतदारसंघातील लोकांचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही त्यांनी जाहीर केले.







