भाजपातील अस्वस्थता

आता भाजपविरोधात बंडखोरीचे धाडस करणे सोपे नाही, तरीही या बंडखोरीचा उपयोग करून घेण्यात विरोधक सक्षम आहेत काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

“अब की बार, ४०० पार” हा भाजपचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा नारा होता. मात्र हा नारा अखेर फुसका ठरला आणि भाजपला केवळ २४० जागा मिळाल्या. स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापनेचे भाजपचे स्वप्न भंगले. सहजिकच राज्यातील प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी २०२७ मध्ये ३० जागा जिंकण्याची प्रतिज्ञा केली आहे, जी अशाच अवास्तव राजकीय घोषणांचा भाग मानली जाते. २०२२ मध्ये २२ जागांचे लक्ष्य ठेवून भाजप २० जागांपर्यंत मजल मारू शकला. केवळ ३३ टक्के मतांच्या टक्केवारीतून २० जागा जिंकलेल्या भाजपने राजकीय रणनितीचा वापर करून विरोधकांच्या मतविभागणीचा कल्पकतेने उपयोग केला.
आता ही मतविभागणी टाळण्यासाठी विरोधक काय करणार, हे महत्त्वाचे आहे. किंबहुना विरोधकांची भूमिका पाहिल्यानंतर सगळेच विरोधक मतविभागणीची भेट देऊन भाजपचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत की काय, असा संशय निर्माण होतो. काँग्रेसने युतीची भाषा सुरू केली असली तरी त्या भाषेत निर्धार नाही. काँग्रेसने पुढाकार घेऊन त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. काँग्रेस हा सर्वांत मोठा विरोधी पक्ष असून विरोधी पक्षनेतेपद ह्याच पक्षाकडे आहे. आपल्या कार्यालयात बसून विरोधक आपल्याकडे येतील, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. इतर पक्षांनाही काही किंमत आहे, हे दाखवले तर काँग्रेसचे काहीही बिघडणार नाही.
काँग्रेस पक्ष जोपर्यंत ही मोकळीक आणि लवचिकता दाखवणार नाही, तोपर्यंत युतीची चर्चा पुढे जाऊ शकणार नाही. इतरांसाठी ही निवडणूक काही ठरावीक मतदारसंघांपुरती मर्यादित असली तरी काँग्रेससाठी मात्र सत्ता स्थापनेसाठीचा प्रयत्न म्हणून ही निवडणूक लढवावी लागेल. प्रत्यक्षात मैदानावर सराव न करताच शतक झळकवण्याच्या बाता कुणीही मानणार नाही. एखादा खेळाडू सरावातून आपली क्षमता सिद्ध करतो आणि शतकी खेळीचा दावा करतो, तर त्याच्यावर विश्वास ठेवता येतो. पण काँग्रेस आपल्या संघटनात्मक चक्रव्यूहात इतका गुरफटला आहे की राजकीय मैदानावर या पक्षाचा सर्वसामान्य लोकांशी संवाद तुटला आहे.
विरोधक विभागले आहेत म्हणून भाजपसाठी रान मोकळे आहे, असे मानण्याचे कारण नाही. भाजपात महत्वाकांक्षी लोकांचा भरणा झाल्यामुळे अनेकांच्या महत्वाकांक्षेला पारावार राहिलेला नाही. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीवर दावा करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पक्षांतर्गत उमेदवारांची संख्या वाढल्याने तिकीटवाटप भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते. आता भाजपविरोधात बंडखोरीचे धाडस करणे सोपे नाही, तरीही या बंडखोरीचा उपयोग करून घेण्यात विरोधक सक्षम आहेत काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
पक्षाचे संघटनमंत्री बी.एल. संतोष हे ह्यातील अंतर्गत धुसफुस आणि स्पर्धेचा कानोसा घेण्यासाठीच गोव्यात आले आहेत. भाजप संघटनेच्या नेत्यांची आपल्या कामावर चांगली पकड असते. सहसा पक्षनेतृत्वाला फाट्यावर मारून पक्षाविरोधात बंडखोरी करण्याचे धाडस कुणीही करू शकत नाही. बंडखोरी झालीच तर ती पक्षातीलच एखाद्या नेत्याला अद्दल घडवण्यासाठी किंवा धडा शिकवण्यासाठी पक्षानेच रचलेली रणनिती असू शकते.
१५ वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळाबाबत लोकांत नाराजी असणे स्वाभाविक आहे. ही नाराजी दूर करून पुन्हा नव्याने पक्षाला उभारी देण्याचे आव्हान पक्षाच्या नेत्यांसमोर आहे. बी.एल. संतोष यांची ह्या कामात हातोटी आहे. ते भाजपातील अंतर्गत अस्वस्थतेवर नेमका काय उपाय काढतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • Related Posts

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    महाराष्ट्रात १८ टक्के पावसाच्या तुटीच्या पार्श्वभूमीवर ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळी स्थिती जाहीर करण्यात आली. मग गोवा नेमकी कशाची वाट पाहत आहे? केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान २ ऑक्टोबर रोजी गोव्यातील…

    जमीन हडप; जाळे किती खोल ?

    जमीन खरेदी-विक्री करणाऱ्याची चौकशी करून उपयोग नाही. त्या व्यवहाराला आवश्यक कागदपत्रे, परवानग्या किंवा प्रशासकीय मान्यता कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हेही तपासले गेले पाहिजे. गोव्यातील जमीन हडप प्रकरणांची व्याप्ती पाहता…

    You Missed

    30/09/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 20 views
    30/09/2026 e-paper

    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 16 views
    राजकीय आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा

    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 23 views
    शेतकऱ्यांच्या संकटांकडे डोळेझाक ?

    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 26 views
    रमेश तवडकर यांना हायकोर्टाची नोटीस

    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 30, 2026
    • 15 views
    Yash Fadte Clinches PSA Copa Federació 2026 Title in Spain

    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools

    • By Gaonkaari
    • सप्टेंबर 29, 2026
    • 20 views
    Carrying Capacity Study Pending, Yet Tuem Panchayat Clears Houses With Swimming Pools