मडगाव, दि. १२: गोव्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि माजी उद्योगमंत्री अनंत (बाबू) नरसिंह नायक यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा, निःस्वार्थ जनसेवेचा आणि चिरंतन वारशाचा वेध घेणाऱ्या ‘लोकनायक’ या माहितीपटाचा डिजिटल मीडिया प्रीमियर सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. अनंत (बाबू) नरसिंह नायक जन्मशताब्दी सोहळा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही. धेंपे यांनी ही माहिती दिली.
जन्मशताब्दी सोहळा समितीने निर्मित केलेल्या या माहितीपटातून बाबू नायक यांच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक वाटचालीचा मागोवा घेण्यात आला आहे. गोव्याच्या इतिहासातील एका महत्त्वपूर्ण कालखंडाला आकार देण्यात त्यांनी बजावलेली भूमिका, त्यांचे तत्त्वनिष्ठ राजकारण, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचे प्रभावी चित्रण ‘लोकनायक’मधून करण्यात आले आहे.
या माहितीपटाला परमपूज्य श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहेत. बाबू नायक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडण्यासाठी राजकीय, सामाजिक, न्यायिक, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या आठवणी व मुलाखतींचा माहितीपटात समावेश करण्यात आला आहे.
यामध्ये विजयादेवी प्रतापसिंह राणे, न्यायमूर्ती (निवृत्त) फर्दिनो रिबेलो, निर्मला सावंत, अॅड. रमाकांत खलप, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ अधिवक्ता आत्माराम नाडकर्णी, माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस्को सार्दिन, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, कुंकळ्ळीचे माजी आमदार मानू फर्नांडिस, अनिल खंवटे, एम. के. शेख, शिवानंद साळगावकर, ज्येष्ठ पत्रकार राजू नायक, कलाकार साईश पाणंदिकर आणि श्रीनिवास धेंपे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
‘लोकनायक’ माहितीपटाचे प्रकाशन १९ ऑगस्ट २०२६ रोजी प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते बाबू नायक यांच्या वर्षभर चालणाऱ्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी करण्यात आले होते. माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन किशोर अर्जुन यांनी केले आहे. जन्मशताब्दी सोहळा समितीचे निमंत्रक विशाल पै काकोडे यांची माहितीपटाची संकल्पना असून त्यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारीही सांभाळली आहे.
डिजिटल मीडिया प्रीमियरमुळे बाबू नायक यांचे कार्य आणि विचार भौगोलिक सीमांच्या पलीकडे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. विशेषतः नव्या पिढीला त्यांच्या सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा, दूरदृष्टी, तत्त्वनिष्ठा आणि गोव्याप्रती असलेली निष्ठा समजून घेण्याची संधी या माहितीपटातून मिळेल, असा विश्वास श्रीनिवास धेंपे यांनी व्यक्त केला.





