गांवकारी, दि. ८ (प्रतिनिधी) : बंदरनगरी मुरगावचे आमदार तथा नवनियुक्त मंत्री संकल्प आमोणकर यांच्याकडे राज्य सरकारने कृषी खात्याची धुरा सोपविली आहे. विशेष म्हणजे, औद्योगिक आणि बंदर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आमोणकर यांना कृषी खात्यासारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याशिवाय नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार तसेच हस्तकला, वस्त्रोद्योग आणि काथ्या उद्योग या खात्यांचाही कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सल्लामसलत करून गोवा सरकारच्या कामकाज वाटप नियम, १९८७ मधील नियम ४ नुसार या खात्यांचे वाटप केले आहे. यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी ७ नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांना तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
गोव्याच्या कृषी क्षेत्रासमोर शेतजमिनींचे घटते प्रमाण, शेतीकडे तरुणांचा कमी होत चाललेला कल, पडिक जमिनी, सिंचनाच्या समस्या आणि कृषी उत्पादन वाढविण्याची आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत बंदरनगरीतून निवडून आलेल्या आमोणकर यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने त्यांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहणार आहे.
नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खातेही सर्वसामान्य जनतेशी थेट संबंधित आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि ग्राहकांच्या हिताचे संरक्षण या बाबींची जबाबदारीही आता आमोणकर यांच्यावर असेल.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमोणकर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अल्पावधीत या खात्यांमध्ये ते कोणते निर्णय घेतात आणि विशेषतः कृषी क्षेत्रासाठी कोणती ठोस पावले उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





