गोंय प्रथम चळवळीचा विरोधी पक्षांना इशारा
गांवकारी, दि. २८ (प्रतिनिधी)
सलग तीन कार्यकाळ सत्तेवर असलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी आपसांतील मतभेद आणि राजकीय स्वार्थ बाजूला सारून एकत्र यावे, ही गोमंतकीय जनतेची प्रबळ भावना आहे. मात्र, जनतेच्या या अपेक्षांकडे दुर्लक्ष करून विरोधक आघाडीच्या निर्णयाबाबत वेळकाढूपणा करीत असतील, तर तो जनतेच्या विश्वासाचा भंग ठरेल. त्यामुळे विरोधी पक्षांनी आणखी विलंब न करता आघाडीबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ठाम आवाहन गोंय प्रथम चळळीने केले आहे. विरोधकांना एकत्र येण्यात अपयश आल्यास सामाजिक संघटना आणि जनतेला पर्यायी राजकीय दिशा ठरवावी लागेल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
गोंय प्रथम चळवळीच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते स्वप्नेश शेर्लेकर, गणपत सिद्धये, रूपेश शिंक्रे, डेरीना आरावझो आदी उपस्थित होते.
भाजपच्या गेल्या तीन कार्यकाळांतील कारभाराविरोधात जनतेमध्ये नाराजी असल्याचा दावा करीत, या परिस्थितीत विरोधकांची एकजूट ही काळाची गरज बनली असल्याचे चळवळीच्या प्रतिनिधींनी सांगितले. विरोधी पक्षांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत आघाडीबाबत ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र, ही मुदत जवळ येऊन ठेपली असतानाही विरोधकांकडून कोणत्याही ठोस हालचाली दिसून येत नाहीत. उलट, विरोधी नेत्यांकडून एकमेकांविरोधात केली जाणारी वक्तव्ये जनतेच्या निराशेत अधिकच भर घालत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
विरोधक एकत्र आले नाहीत, तर सामाजिक संघटना पुढाकार घेणार!
विरोधी पक्षांनी आघाडीबाबत पुढाकार घेतला नाही, तर गोंय प्रथम चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक संघटना सर्व विरोधी पक्षांची संयुक्त बैठक बोलावतील, असे स्वप्नेश शेर्लेकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीत प्रत्येक विरोधी पक्षाची आघाडीबाबतची भूमिका आणि प्रामाणिकपणा जनतेसमोर येईल.
या प्रयत्नांनंतरही विरोधकांना एकत्र येण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवता आली नाही, तर सामाजिक संघटना आणि गोमंतकीय जनतेला पुढील दिशा ठरवण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही त्यांनी सांगितले.
गोवा वाचवायचा की पक्षीय स्वार्थ जपायचा?
गोव्यासमोरील गंभीर प्रश्नांचा विचार करता राजकीय पक्षांनी केवळ आपले अस्तित्व, जागावाटप आणि पक्षीय हितसंबंध यांपुरते मर्यादित राहून चालणार नाही. गोव्याचे भवितव्य, पर्यावरण, जमीन, स्थानिकांचे अधिकार आणि पुढील पिढ्यांचे हित या सर्व बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे शेर्लेकर म्हणाले.
राजकीय पक्षांना स्वतःचे हित जपण्याचा अधिकार असला, तरी त्या हितासाठी गोव्याच्या भवितव्याशी तडजोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ‘गोवा प्रथम’ ही केवळ घोषणा न राहता प्रत्येक राजकीय निर्णयाचा आधार बनली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राजकीय पक्षांना केवळ स्वतःचेच हित जपायचे असेल, तर गोमंतकीय जनतेने त्यांच्या पाठीशी का उभे राहावे? गोव्याच्या हितापेक्षा पक्षीय स्वार्थ मोठा मानणाऱ्या पक्षांकडून जनतेने नेमकी कोणती अपेक्षा ठेवायची?”* असा परखड सवालही शेर्लेकर यांनी उपस्थित केला.
गोव्याच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर असताना विरोधकांनी आपापसांतील राजकीय हिशेब मांडत बसण्याऐवजी जनतेसमोर विश्वासार्ह पर्याय उभा करणे आवश्यक आहे. अन्यथा आघाडीच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेचा भ्रमनिरास होऊन त्याचे राजकीय परिणाम विरोधकांनाच भोगावे लागू शकतात, असा इशारा गोंय प्रथम चळवळीने दिला.





