मंत्रिपदाची माळ की राजकीय डाव?

मनोहर पर्रीकर यांच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेच्या तुलनेत सावंत यांची शैली पक्षश्रेष्ठींशी अधिक सुसंगत राहण्याची आहे. हीच त्यांची राजकीय ताकद ठरली आहे.
——————————————-
भाजपला सत्ता टिकविण्यासाठी किंवा बहुमताचे आकडे जुळविण्यासाठी इतर पक्षांचे आमदार आयात करण्याची गरज नाही. सरकारच्या कामगिरीवर प्रभावित होऊन विरोधी पक्षांचे आमदार स्वेच्छेने भाजपात दाखल होतात, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अलीकडचे विधान आहे. काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या आठ आमदारांची गेल्या चार वर्षांतील राजकीय वाटचाल पाहिली तर मुख्यमंत्र्यांच्या या विधानात एक वेगळाच अर्थ दडलेला दिसतो. पक्षांतर केलेल्या आठपैकी अवघ्या तीन आमदारांना मंत्रिपद मिळाले, तेही प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर! त्यामुळे भाजपात प्रवेश म्हणजे सत्तेची हमी नव्हे, तर पक्षश्रेष्ठींच्या मर्जीवर अवलंबून राहण्याची अपरिहार्यता, हाच संदेश यातून अधोरेखित होतो.

माजी कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर वर्षभर मंत्रिपद रिक्त ठेवण्याइतकी राजकीय पकड मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी निर्माण केली. आता विधानसभा निवडणुकीला जेमतेम तीन महिने उरले असताना संकल्प आमोणकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घालण्यात आली. मुरगाव तालुक्यात मूळ भाजपचे दाजी साळकर आमदार असतानाही आमोणकरांनाच संधी का, हा प्रश्न स्वाभाविक आहे. हा निर्णय केवळ प्रशासकीय गरजेतून झाला की त्यामागे पक्षांतर्गत सत्तासमीकरणांची नवी मांडणी आहे?

मुरगाव तालुक्यात वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचे राजकीय वर्चस्व आहे. आमोणकरांना मंत्रिपद देऊन या वर्चस्वाला अप्रत्यक्ष आव्हान उभे करण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गुदिन्होंचे एकेकाळचे कट्टर समर्थक कमलाप्रसाद यादव आज त्यांनाच उघड आव्हान देत आहेत. या घडामोडी स्वतंत्र आहेत की एका व्यापक राजकीय रणनीतीचे भाग, याचे उत्तर आगामी काळात मिळेल. मात्र आमोणकरांच्या नियुक्तीमुळे मुरगावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

निलेश काब्राल यांचे उदाहरण तर अधिक बोलके आहे. काँग्रेसमधून आलेल्यांसाठी जागा रिकामी करण्याच्या नावाखाली त्यांना मंत्रिपदाचा त्याग करावा लागला. मग त्यांच्या अपेक्षित राजकीय पुनर्वसनाचे काय झाले? कुडचडेत मुख्यमंत्री समर्थक रोहन गांवस देसाई यांना मिळणारा राजकीय वाव नेमका कोणता संदेश देतो? सावर्डेतही डॉ. गणेश गांवकर यांच्यासमोर संकेत आर्सेकर यांच्या रूपाने नवे आव्हान उभे राहत आहे. या दोन्ही मतदारसंघांतील घडामोडी पाहता पक्षनिष्ठेपेक्षा बदलत्या राजकीय उपयुक्ततेला अधिक महत्त्व मिळत असल्याची भावना बळावते.

भाजपच्या राजकारणात विरोधकांना निष्प्रभ करण्याइतकेच स्वकीयांवर नियंत्रण राखण्याचे डावपेचही महत्त्वाचे ठरतात. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना केंद्रीय नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा लाभल्याचे त्यांच्या सात वर्षांच्या कारकिर्दीतून दिसते. मनोहर पर्रीकर यांच्या स्वतंत्र निर्णयक्षमतेच्या तुलनेत सावंत यांची शैली पक्षश्रेष्ठींशी अधिक सुसंगत राहण्याची आहे. हीच त्यांची राजकीय ताकद ठरली आहे.

संकल्प आमोणकर तीन महिन्यांत किती उल्लेखनीय कामगिरी करतील, यापेक्षा त्यांच्या नियुक्तीमुळे कुणाची राजकीय ताकद वाढणार आणि कुणाचे वर्चस्व कमी होणार, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. मंत्रिपदाची ही माळ एका आमदाराच्या गळ्यात पडली असली तरी तिचे राजकीय काटे अनेकांना टोचण्याची शक्यता आहे.

भाजपातील निष्ठावंतांसाठी मात्र यातून एक अस्वस्थ करणारा संदेश पुढे येतो : पक्षासाठी आयुष्य वेचणाऱ्यांपेक्षा सत्तेच्या समीकरणात उपयोगी ठरणाऱ्यांचे पारडे जड होत असेल, तर निष्ठेची किंमत नेमकी किती? सत्ता टिकविण्याच्या या खेळात विरोधकांपेक्षाही स्वकीयांचे राजकीय भवितव्य अधिक असुरक्षित बनत चालले आहे काय?

  • Related Posts

    अहंकारी नेमका कोण ?

    अहंकार दुखावल्यामुळे अधिकारी बदलला गेला की अधिकारांचा गैरवापर केल्यामुळे त्याची बदली झाली, याचे उत्तर जनतेला मिळायलाच हवे. कारण प्रश्न एका मुख्याधिकाऱ्याचा नाही, तर कायद्याचे राज्य चालणार की राजकीय नेत्यांची मर्जी,…

    कुणीतरी टॉयलेट द्या हो !

    या गरीब कुटुंबाला कोणतेही राजकीय पद नको, मोठी सरकारी योजना नको, कुणाची मेहेरबानीही नको. त्यांना हवे आहे फक्त एक शौचालय! —————————————— राजकीय आरक्षणासाठी गोव्यातील आदिवासी समाज रस्त्यावर उतरतो आहे. आपल्या…

    You Missed

    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2026
    • 16 views
    प्रकाशपर्वातून नव्या गोव्याचा संकल्प !

    08/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 8, 2026
    • 14 views
    08/11/2026 e-paper

    07/11/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 12 views
    07/11/2026 e-paper

    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 22 views
    संकल्प आमोणकर बनले बारावे मंत्री

    मंत्रिपदाची माळ की राजकीय डाव?

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 23 views
    मंत्रिपदाची माळ की राजकीय डाव?

    मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीताला बंदी; उच्च न्यायालयाचा कडक आदेश. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर; नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश

    • By Gaonkaari
    • नोव्हेंबर 7, 2026
    • 21 views
    मध्यरात्री १२ ते पहाटे ६ पर्यंत ध्वनिक्षेपकांवर संगीताला बंदी; उच्च न्यायालयाचा कडक आदेश. ध्वनिप्रदूषण रोखण्याची जबाबदारी दोन्ही जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांवर; नियमभंग करणाऱ्यांची नावे थेट न्यायालयाला कळविण्याचे निर्देश