“आज नाही तर कधीच नाही”

धनगर समाजाच्या एसटी मागणीसाठी निर्धार

सत्तरी, दि. ११

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा मिळावा, या मागणीसाठी गोवा धनगर समाज सेवा संघ, सत्तरी यांच्या वतीने सुरू असलेल्या कोपरा बैठकांच्या मालिकेतील सहावी बैठक मलपण येथील श्री लइराई देवी धोंड मंडप सभागृहात उत्साहात पार पडली. या बैठकीला महिला, युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक आणि समाजकार्यकर्त्यांसह मलपण परिसरातील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. बैठकीदरम्यान उपस्थितांनी हात उंचावून समाजाच्या एसटी मागणीच्या लढ्याला पाठिंबा दर्शवत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे सचिव श्री. विठोबा खरात, गोवा धनगर समाज सेवा संघ, सत्तरीचे अध्यक्ष श्री. धुळू शेळके, गोमंतक धनगर समाजोन्नती मंडळाचे सहसचिव श्री. जानू वरक, सल्लागार श्री. भारत पिंगळे, धारबांदोडा शाखेचे तालुका अध्यक्ष श्री. दुलबा पटकरे, सचिव श्री. बोमो झोरे, उपाध्यक्ष श्री. नवलो मनपो, वक्ते श्री. भैरु झोरे, सांगे तालुका उपाध्यक्ष श्री. जानू झोरे, गोवा धनगर समाज सेवा संघ, सत्तरीचे माजी सचिव श्री. पवन वरक, विद्यमान सचिव श्री. चंद्रकांत पावणे, कार्याध्यक्ष व संस्थापक श्री. बाबू झोरे, खजिनदार श्री. जानू पिंगळे, ज्येष्ठ नागरिक श्री. मुला वरक, माजी खजिनदार श्री. बाबू पावणे, उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण झोरे, उपकार्याध्यक्ष श्री. प्रशांत मोटे, सहसचिव श्री. सुनील खरवत, सहखजिनदार श्री. विठोबा बोडके, सल्लागार श्रीमती माली यमकर, श्री. साईनाथ ताटे, श्री. अजय शेळके, श्री. लक्ष्मण खरवत आणि श्री. सुरेश पिंगळे यांच्यासह इतर पदाधिकारी व समाजकार्यकर्ते उपस्थित होते.
एसटी मागणीवर मार्गदर्शन
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना श्री. विठोबा खरात यांनी धनगर समाजाच्या एसटी मागणीची सद्यस्थिती, शासनस्तरावर सुरू असलेल्या घडामोडी आणि पुढील संविधानिक लढ्याची दिशा याबाबत मार्गदर्शन केले. समाजाने संयम न गमावता संघटितपणे पुढील लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री. धुळू शेळके यांनी एसटी दर्जा मिळाल्यास समाजाला होणारे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक फायदे स्पष्ट करताना समाजाच्या हक्कासाठी प्रत्येकाने कार्यकर्ता म्हणून सक्रिय होण्याची गरज व्यक्त केली. “बैठकीला येताना आपण समाजबांधव म्हणून येतो; मात्र येथून जाताना हक्काच्या लढ्यासाठी हाडाचा कार्यकर्ता म्हणून बाहेर पडले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
श्री. भारत पिंगळे यांनी एसटी मागणीचा प्रश्न हा केवळ आरक्षणाचा नसून समाजाच्या भवितव्याचा आणि हक्काचा प्रश्न असल्याचे सांगत “आज नाही तर कधीच नाही” असा निर्धार व्यक्त केला. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी समाजाची संघटित ताकद दाखविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. जानू वरक यांनी समाजात एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले, तर श्री. दुलबा पटकरे यांनी संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्यात प्रत्येक गावातील समाजबांधवांचा सहभाग वाढविण्याची गरज व्यक्त केली. श्री. भैरु झोरे यांनी समाजाच्या प्रश्नांवर जनजागृती आणि संघटन मजबूत करण्यावर भर दिला. श्री. जानू झोरे यांनी सांगेसह इतर भागांतील समाजबांधवांनीही ST लढ्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. श्री. बाबू झोरे यांनी संघटित शक्तीच्या माध्यमातून संविधानिक मार्गाने संघर्ष पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
मलपण परिसरातील समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजकार्यकर्त्यांनीही मनोगत व्यक्त करून ST मागणीच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला.
अफवा आणि अपप्रचारापासून सावध राहण्याचे आवाहन
समाजात फूट पाडण्याचे अथवा दिशाभूल करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा अपप्रचाराला बळी न पडता अधिकृत संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या हक्काच्या लढ्यात एकदिलाने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीच्या प्रारंभी श्री. लक्ष्मण झोरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शेवटी संघटनेचे सचिव श्री. चंद्रकांत पावणे यांनी आभार मानले.
“एकजूट – संघर्ष – हक्क” या घोषणेसह तसेच “आज नाही तर कधीच नाही” या निर्धाराने मलपण येथील सहावी कोपरा बैठक उत्साहात संपन्न झाली. पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रम आणि आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला.

  • Related Posts

    झोनिंग आणि वापराच्या बदलाशी संबंधित सर्व भ्रष्ट कायदे रद्द करा.

    मागील लेखात आपण भू-वापराशी संबंधित आरपी २१ (RP 21) च्या विविध तरतुदींवर आणि गावांच्या विकासासंबंधीच्या काही धोरणांवर चर्चा केली आहे.नगर आणि ग्राम नियोजन कायदा १९७४ (Town and Country Planning Act…

    Rent-a-Cab Operators Urge Goa Govt to Reverse 12-Year Permit Renewal Decision

    Porvorim, August 5: RTI activist Sudip Narayan Tamankar has submitted a representation to the Director of Transport, Government of Goa, urging the State Transport Authority (STA) to reconsider and withdraw…

    You Missed

    12/08/2026 e-paper

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 23 views
    12/08/2026 e-paper

    “आज नाही तर कधीच नाही”

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 13 views
    “आज नाही तर कधीच नाही”

    झोनिंग आणि वापराच्या बदलाशी संबंधित सर्व भ्रष्ट कायदे रद्द करा.

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 23 views
    झोनिंग आणि वापराच्या बदलाशी संबंधित सर्व भ्रष्ट कायदे रद्द करा.

    अबब ! ४६.५२ कोटींवरून थेट ७६.५५ कोटींवर

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 20 views
    अबब ! ४६.५२ कोटींवरून थेट ७६.५५ कोटींवर

    उटाचा मेळावा कारापूरात का नको ?

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 12, 2026
    • 21 views
    उटाचा मेळावा कारापूरात का नको ?

    उटा मेळाव्याला परवानगी नाकारली

    • By Gaonkaari
    • ऑगस्ट 11, 2026
    • 17 views
    उटा मेळाव्याला परवानगी नाकारली