काँग्रेस ‘जित्ती हाय’ हे एकवोटने दाखवून दिले; आता ती एकजूट हाय, लढती हाय आणि जिंकती हाय, हे सिद्ध करण्याची वेळ काँग्रेस नेतृत्वाची आहे.
काँग्रेस पक्षाच्या एकवोट येथील जाहीर सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ एका सभेला जमलेली गर्दी म्हणून पाहता येणार नाही. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष अजूनही जिवंत आहे, त्याच्यात लढण्याची ताकद आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत तो भाजपसमोर आव्हान उभे करू शकतो, याची ही साक्ष आहे. केवळ तीन आमदारांचे संख्याबळ, तेही प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले, असतानाही काँग्रेसने राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेला उभा केलेला प्रतिसाद बरेच काही सांगून जातो.
गोव्यात भाजपकडे भरभक्कम बहुमताचे सरकार आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यातील काहींवर विरोधात असताना भाजपनेच गंभीर आरोप केले होते. मात्र सत्तेच्या गणितात त्याच नेत्यांचे पक्षात स्वागत झाले. विरोधात असताना दोषारोप आणि सत्तेत आल्यानंतर शुद्धीकरण, या राजकारणातूनही काँग्रेस संपली नाही, हेच तिचे खरे बळ म्हणावे लागेल.
काँग्रेसच्या मर्यादित संख्याबळाची दखल भाजपला घ्यावी लागत असेल, तिच्या प्रत्येक हालचालीवर सत्ताधारी पक्षाला प्रतिक्रिया द्यावी लागत असेल, तर काँग्रेसचे राजकीय अस्तित्व अजूनही कायम आहे, हे स्पष्ट होते. एकवोटची सभा हा त्याचाच संकेत आहे.
मात्र काँग्रेससमोरील खरी लढाई भाजपपेक्षा स्वतःच्या घरातच अधिक कठीण दिसते. अमित पाटकर यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गिरीश चोडणकर यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षासाठी संवेदनशील ठरला आहे. पाटकर यांनी सुमारे साडेचार वर्षे पक्षाची धुरा सांभाळली. त्यामुळे त्यांच्या नाराजीला केवळ वैयक्तिक अहंकाराचे स्वरूप देऊन प्रश्न सोडवता येणार नाही. नेतृत्वबदलापूर्वी त्यांच्याशी पुरेसा संवाद झाला असता, तर आजची परिस्थिती वेगळी असती.
पाटकर यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी कथित संपर्क असल्याची चर्चा काँग्रेसमधूनच होत आली आहे. आता पाटकर या आरोपांना थेट आव्हान देत असतील तर काँग्रेसने आरोपांचे पुरावे द्यावेत किंवा त्यामागील गैरसमज स्पष्ट करावेत. आरोप करून एखाद्या नेत्याला राजकीयदृष्ट्या एकाकी पाडणे हा संघटनात्मक उपाय होऊ शकत नाही.
खर्गे यांच्या सभेच्या दिवशीच शंभरपेक्षा अधिक अधिकृत बीएलएनी राजीनामे दिल्याचा प्रकार काँग्रेससाठी निश्चितच नामुष्कीचा आहे. त्यांना सभेचे निमंत्रण नव्हते, असा दावा केला जात आहे. हे बीएलए पाटकर यांच्या काळात नियुक्त झाले असल्याने या राजीनाम्यांमागे त्यांचा प्रभाव आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो. या घटनेचा राजकीय फायदा भाजप घेणारच.
आज अमित पाटकर काँग्रेससाठी ‘अवघड जागेवरील दुखणे’ ठरत आहेत. मात्र हे दुखणे दाबून ठेवण्यापेक्षा संवादातून दूर करणे गरजेचे आहे. पाटकर निष्क्रिय होते, तर साडेचार वर्षे त्यांच्याकडे पक्षाची धुरा का ठेवली? आणि ते सत्ताधारी नेतृत्वाच्या संपर्कात होते, असे पक्षाचे म्हणणे असेल तर त्याचे पुरावे कुठे आहेत? या प्रश्नांची उत्तरे काँग्रेसने द्यायलाच हवीत.
काँग्रेसमध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षापेक्षा भाजपविरोधातील व्यापक लढा मोठा आहे. एकवोटची सभा आशेचा किरण दाखवते; पण त्या किरणाला विजयाच्या प्रकाशात बदलायचे असेल तर काँग्रेसला आधी अंतर्गत हेवेदावे, अहंकार आणि संशय बाजूला ठेवावे लागतील. काँग्रेस ‘जित्ती हाय’ हे एकवोटने दाखवून दिले; आता ती एकजूट हाय, लढती हाय आणि जिंकती हाय, हे सिद्ध करण्याची वेळ काँग्रेस नेतृत्वाची आहे.








