नवनिर्वाचित सरपंच योगेश पेडणेकर यांच्यासमोर पहिल्याच ग्रामसभेत आव्हान
……………………………………………………………
गांवकारी, दि. ३० (प्रतिनिधी)
कारापूर-सर्वण येथील प्रस्तावित हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाला बजावलेली कामबंदी नोटीस पंचायत संचालकांनी रद्दबातल ठरवल्याने गावात पुन्हा असंतोष उफाळून आला आहे. पंचायत संचालकांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देण्याची मागणी रविवार, १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत जोर धरण्याची शक्यता आहे. या संदर्भात ग्रामसभेत ठराव मांडण्याची तयारी सुरू असून, त्यामुळे कारापूर-सर्वणची ग्रामसभा पुन्हा वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.
कारापूर येथील हाऊस ऑफ अभिनंदन लोढा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी तब्बल १६१ दिवस आंदोलन केले होते. दरम्यान, ग्रामपंचायतीने प्रकल्पाला कामबंदी नोटीस बजावल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, कंपनीने या नोटिशीविरोधात पंचायत संचालकांकडे अपील दाखल केले होते. या अपिलावर निर्णय देताना पंचायत संचालक दशरथ रेडकर यांनी पंचायतीची कामबंदी नोटीस रद्दबातल ठरवली.
या निर्णयामुळे प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. मात्र, पंचायत संचालकांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी प्रकल्पविरोधी ग्रामस्थांनी दर्शवली आहे. ग्रामसभेतही याच मागणीवरून जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, पंचायत संचालक दशरथ रेडकर हे लवकरच निवृत्त होणार असून, निवृत्तीपूर्वी त्यांनी कंपनीच्या बाजूने निर्णय दिल्याची टीका प्रकल्पविरोधी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या निर्णयाच्या वेळेबाबतही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरपंच योगेश पेडणेकर यांची पहिलीच कसोटी
कारापूर-सर्वण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अलीकडेच योगेश पेडणेकर यांची निवड झाली आहे. रविवार, १ नोव्हेंबर रोजी होणारी ग्रामसभा त्यांच्या अध्यक्षतेखालील पहिलीच ग्रामसभा ठरणार आहे. लोढा प्रकल्पाचा संवेदनशील विषय पुन्हा ऐरणीवर आल्याने नव्या सरपंचांसमोर पहिल्याच ग्रामसभेत मोठे आव्हान उभे राहिले आहे.
पंचायत संचालकांच्या आदेशाविरोधात न्यायालयीन लढा उभारण्याबाबत ग्रामसभा कोणती भूमिका घेते, पंचायत मंडळ ग्रामस्थांच्या मागणीला कसा प्रतिसाद देते आणि प्रकल्पाविरोधातील पुढील आंदोलनाची दिशा काय ठरते, याकडे आता संपूर्ण कारापूर-सर्वण परिसराचे लक्ष लागले आहे.





