सांकवाळ पंचायतीत महिला सशक्तीकरणाची फजिती
मुरगांव,दि.६(प्रतिनिधी)-
मुरगांव तालुक्यातील आणि खुद्द पंचायतमंत्री मॉविन गुदीन्हो यांचे कट्टर समर्थक असलेल्या सांकवाळ पंचायतीत महिला सरपंचपदाच्या नावे पुरूष पंचसदस्यांकडूनच गांवचा कारभार हाकला जात असल्याची गोष्ट समोर आली आहे. रोहीणी देवेंद्र तोरस्कर या सरपंच असूनही पूर्वी उपसरपंच गिरीश पिल्लई आणि आता उपसरपंच डेरिक वालीस हेच कारभार हाकत असल्याची टीका विरोधी गटाने केली आहे.
सरपंच फक्त नावासाठी
सांकवाळ पंचायतीत ११ पंचसदस्य आहेत. या पंचायतीत चार प्रभाग महिलांसाठी राखीव होते तर एका सर्वसामान्य प्रभागातून एक महिला निवडून आल्यामुळे एकूण ५ महिला पंचसदस्य आहेत. रोहीणी देवेंद्र तोरस्कर यांची सरपंचपदी वर्णी लावण्यात आली. मुळात त्यांना कोकणी भाषा येत नाही. त्या मराठी आणि हिंदीतूनच बोलतात अशीही तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सुरूवातीला उपसरपंचपदी असलेले गिरीश पिल्लई हेच पंचायतीचा कारभार हाकत होते आणि आता तीच पद्धत उपसरपंच डेरिक वालीस यांनी पुढे चालू ठेवली आहे.
प्रभारी सरपंचपदाची तरतुद आहे का ?
महिला सशक्तीकरणाच्या मोठ मोठ्या बाता मारल्या जात आहेत. अशावेळी रोहीणी तोरस्कर यांना सरपंचपदाचा कारभार हाकण्यासाठी मदत करण्याचे सोडून अप्रत्यक्ष त्या खुर्चीवर बसून आपला कारभार हाकण्यातच सत्ताधारी पंचायत मंडळाचा डोळा असल्याची टीका विरोधी पंचसदस्य तुळशीदास नाईक यांनी केली. प्रभारी सरपंच म्हणून कायद्यात तरतुद नाही परंतु सरपंचांच्या अनुपस्थितीत प्रभारी सरपंच या नात्यानेच गिरीश पिल्लई यांनी पंचायतीचा कारभार हाकल्याची गोष्टही त्यांनी उघड केली. पंचायतीच्या लेखा अहवालात २०२३-२४ या कार्यकाळातील ३६५ दिवसांत रोहीणी तोरस्कर या ११३ दिवस तर गिरीश पिल्लई यांनी २६२ दिवस सरपंचपदाचा कारभार हाकल्याची नोंद झाली आहे. यावरूनच इथे महिला सशक्तीकरण आणि महिलांसाठी सरपंचपद रिक्त असलेल्या घटनात्मक तरतुदीची थट्टा सुरू असल्याचे स्पष्ट होते.
ग्रामसभांचे आयोजन उपसरपंचांकडूनच
आत्तापर्यंत सांकवाळ पंचायतीच्या ग्रामसभांचे आयोजन हे उपसरपंचांच्या अध्यक्षतेखालीच झाले आहे. विशेष म्हणजे सांकवाळ पंचायतीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीय लोकांचा भरणा झाल्याने इथे मुळ सांकवाळवासीयांचा आकडा कमी बनला आहे. एकूण ११ पैकी फक्त ५ गोमंतकीय पंचसदस्य असून उर्वरीत ६ परप्रांतीय पंचसदस्यांचा समावेश आहे. गेली अनेक वर्षे हे लोक इथे वास्तव करत असल्यामुळे त्यांना हे अधिकार प्राप्त झाले असले तरी पंचायतीत निर्णय घेताना गोव्याचे हीत आणि स्थानिकांचे हीत जपण्याचे सोडून राजकीय दबावाला बळी पडून हे लोक निर्णय घेत असल्यामुळे त्याचे गंभीर परिणाम सांकवाळ गांवावर पडत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.